शहरी नक्षली आणि काँग्रेस अफवा पसरवत आहे – मोदी
Featured

शहरी नक्षली आणि काँग्रेस अफवा पसरवत आहे – मोदी

Dhananjay Shinde

नवी दिल्ली – राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि नागरिकता दुरुस्ती कायद्याबाबत (सीएए) नक्षली आणि काँग्रेस चुकीची माहिती पसरवत असून या देशातील मुस्लिमांना डिटेंशन कॅम्पमध्ये पाठवले जाईल असे खोटे पसरवण्यात येत आहे. देशाला उद्ध्वस्त करण्याचा हा प्रयत्न आहे. एनआरसी आणि सीएए या दोन्ही कायद्याचा देशातील मुस्लीमांशी काहीएक संबंध नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मोदींनी हा कायदा वाचून पाहण्याचे आवाहनही यावेळी केले. दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांसह सुधारित नागरिकत्व कायद्याचा विरोध करणार्‍यांचा व हिंसाचार करणार्‍यांचा चांगलाच समाचार घेतला. दिल्लीतील 1734 अवैध वसाहती वैध करण्यासाठीच्या मुद्द्यावर भाजपाकडून रामलीला मैदानात धन्यवाद सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.

नागरिकता दुरुस्ती कायद्याविरोधात (सीएए) देशभर संताप उसळला आहे. मोदी यांनी रामलीला मैदानावरुन देशातील मुस्लिमांना या कायद्यामुळे असुरक्षित वाण्यावरून थेट संदेश दिला. विरोधकांवर खोटा प्रचार केल्याचा आरोप करत त्यांनी स्पष्टपणे सांगितले की जे पेपर-पेपर, प्रमाणपत्र-प्रमाणपत्राच्या नावाखाली मुस्लिमांची दिशाभूल करीत आहेत. त्यांनी गरीबांच्या हितासाठी योजनांचे लाभार्थी निवडताना लक्षात ठेवले पाहिजे, कागदावर निर्बंध लावले नाहीत. नक्षली आणि काँग्रेस चुकीची माहिती मुस्लिमांना देत असल्याची टिका त्यांनी केली.

देशातील आजच्या परिस्थितीत सर्वात जुन्या पक्षाचे नेते केवळ कायद्यावरून उपदेश देत आहेत. शांततेसाठी दोन शब्द सांगायला कोणी तयार नाही. हिंसाचार थांबवण्यास एकहीजण सांगत नाही, याचाच अर्थ या हिंसाचारास तुमची मुकसंमती आहे असा होतो व देश हे सर्व पाहत आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेससह विरोधकांना उद्देशुन यावेळी म्हटले. त्यांनी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जींवरही टीका केली. ते म्हणाले, आज ममता बॅनर्जी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात कोलकाताहून थेट संयुक्त राष्ट्र संघात पोहचल्या आहेत. याच ममता दीदी काही दिवसांपूर्वी बांगलादेशमधून येणार्‍या शरणार्थ्यांना आपण मदत करायला हवी अशी भूमिका घ्यायच्या. तसेच त्यांनी संसदेत अध्यक्षांसमोर येऊन कागद फेकायच्या. मात्र आता याच ममता दीदी सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करत आहेत.

ममतादीदी तुम्ही अफवा का पसरवतं आहात? यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यासह अशोक गेहलोत, कम्यूनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. पाकिस्तानातील अल्पसंख्यांकाना असुरक्षित वाटल्यास, त्यांच्यावर अत्याचार झाल्यास त्यांना सन्मानानं भारतात घ्या, असं महात्मा गांधींनी म्हटलं होतं. काँग्रेसला माझं ऐकायचं नसेल, पण त्यांनी किमान गांधींनी सांगितलेली गोष्ट तरी ऐका असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला. तसेच पाकिस्तानातील अल्पसंख्यांकाना भारताचं नागरिकत्व देण्याची भूमिका मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान असताना मांडली होती. मग आम्ही त्यापेक्षा काय वेगळं करतोय?, असा सवाल देखील नरेंद्र मोदींनी यावेळी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले, नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा, कोणाचं नागरिकत्व रद्द करण्यासाठी नव्हे, तर लोकांना नागरिकत्व देण्यासाठी आणला गेला आहे. या कायद्याच्या माध्यमातून पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील अल्पसंख्यांकांना नवे आयुष्य मिळेल. हा कायदा लागू करून पाकिस्तानला संपूर्ण जगासमोर तोंडावर पाडण्याची संधी आपल्या हातात होती. त्यांच्या देशात अल्पसंख्यांकावर सुरू असलेले अत्याचार जगासमोर मांडता आले असते. परंतु आमच्या विरोधकांनी ती वाया घालवली. कारण विरोधकांना देश नव्हे तर पक्ष महत्त्वाचा वाटतो. दरम्यान फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी मोदी यांनी या सभेद्वारे दिल्लीकरांना मोठी आश्वासने दिली. त्या दिल्ली निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले.

देशाची संपत्ती जाळू नका
मोदींना देशाच्या जनतेने निवडले हे जर तुम्हाला आवडत नसेल, तर तुम्ही मोदींना नाव ठेवा, मोदींचा तिरस्कार करा. मोदीचा जेवढा विरोध करायचा तेवढा नक्की करा, एवढच नाहीतर मोदीचा पुतळा जाळायचा असेल तर तो देखील जाळा, परंतु देशाची संपत्ती जाळू नका. असे म्हणत गरिबाच्या झोपड्या, वाहनं जाळू नका. गरिबांना मारून तुम्हाला काय मिळणार? असा संतप्त सवाल त्यांनी केला. दरम्यान आ्ंदोलनादरम्यान पोलीसांवर होणार्‍या हल्ल्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

दलित नेत्यांचा विरोध चुकीचा
‘हा कायदा नेमका काय आहे, नेमकी दुरुस्ती काय आहे याचा अभ्यास न करता देशातील दलितांचे काही नेतेही या वादात पडले आहेत. ज्यांच्यावर शेजारी देशांमध्ये धार्मिक अत्याचार झाले अशांना संरक्षण देणार हा कायदा आहे. पाकिस्तानातून आलेले शरणार्थी हे अधिकतर दलित समाजाचे आहेत. आजही पाकिस्तानात दलितांना गुलामीचे जीवन जगावा लागत आहे. त्यांना चहा ही कपासह विकत घ्यावा लागतो. त्यांच्या मुलींवर अत्याचार होतात. त्यांच्याशी बळजबरीने लग्न केले जाते आणि बळजबरीने त्यांचे धर्मांतर केले जाते.’ असेही मोदी म्हणाले.

उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
जे मुख्यमंत्री म्हणतात हा कायदा लागू करणार नाही, त्यांनी आपल्या मुख्य महाधिवक्त्यासोबत थोडी चर्चा करा. राज्य असे करू शकते की नाही हे विचारा. मुख्यमंत्री असं बोलून स्वतःचे हसे करून घेत आहेत, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणार्‍या इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांना फटकारलं आहे.

Deshdoot
www.deshdoot.com