अबब! पेरू 650 तर डाळिंब 325 रुपये किलो?
Featured

अबब! पेरू 650 तर डाळिंब 325 रुपये किलो?

Sarvmat Digital

राहुरी फॅक्टरी (वार्ताहर)- दुय्यम दर्जा असलेले पेरू 625 रुपये तर दुय्यम दर्जा असलेले डाळिंब 325 रुपये किलो? कुठल्याही शेतकर्‍याने हरकून जावे, असे हे फळांचे दर आहेत. मात्र हे दर भारतातील नसून कॅलिफोर्नियातील एका फळाच्या दुकानावरील दुय्यम दर्जाच्या फळांचे आहेत. आणि हे चित्र टिपले आहे, नुकताच कॅलिफोर्निया येथील शेती विषयक दौरा करणारे पिंपळगाव येथील शेतकरी प्रा. सतीश राऊत यांनी…

सध्या महाराष्ट्रातील विशेषतः अहमदनगर जिल्ह्यातील पेरू व डाळिंब या फळांच्या पडलेल्या भावामुळे शेतकरी पुरते हैराण झाले आहेत. नफा तर सोडा पण बागांच्या मशागतीची रक्कम सुद्धा पदरी पडत नाही. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी परिसरात मोठ्या प्रमाणात या फळांचे उत्पन्न घेऊन पदरी निराशा पडत आहे. योग्य बाजारपेठ व ग्राहक उपलब्ध नसणे हे एक कारण, अशी परिस्थिती होण्यास कारणीभूत आहे. सध्या शिर्डी येथे विमान सेवा सुरू झाली असल्याने त्याद्वारे परिसरातील शेतकर्‍यांनी माल परदेशात पाठवला तर किमान प्रतिकिलो शंभर रुपये पदरात पडले तरी शेतकर्‍यांच्या कष्टाचे चीज होईल.

आफ्रिकेतील केनिया, नायजेरिया, टांझानिया तसेच अमेरिकेतील मेक्सिको सारख्या देशांनी परराष्ट्रामधील बाजारपेठां मध्ये आपले पाय घट्ट रोवले आहेत. भारतात सर्व काही असून सुद्धा केवळ शेतकर्‍यांविषयी उदासीन धोरणामुळे सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या करणारा देश म्हणून आपली प्रतिमा निर्माण झाली आहे. कोणत्याही पक्षाच्या सरकारने शेतीमाल निर्यातीचे सूत्रबद्ध नियोजन न केल्याचा हा परिपाक आहे. वास्तविक पाहता जगातील सर्वात उत्कृष्ट फळे पिकवणारी जमीन, कष्टकरी शेतकरी, योग्य हवामान, अब्जावधी रुपयांचे सुविधा घेणारी विद्यापीठे असे सर्व काही असूनही ग्रामीण महाराष्ट्र उद्ध्वस्त होत आहे. ही वस्तुस्थिती कोणी नाकारू शकत नाही. शिर्डी विमानतळाच्या परिसरातील शेतकर्‍यांना काय लाभ मिळेल हे नक्की सांगणे कठीण असले, तरी या परिसरातील शेती माल विशेषतः फळे परदेशी निर्यात करण्यासाठी विशेष पुढाकार घेऊन निर्यात सुरू केल्यास या परिसरातील शेतकर्‍यांना निश्चित अच्छे दिन येतील अशी भावना प्रा. सतीश राऊत यांनी व्यक्त केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com