पेरू व डाळिंब फळांचे भाव पडल्याने शेतकरी चिंतातूर
Featured

पेरू व डाळिंब फळांचे भाव पडल्याने शेतकरी चिंतातूर

Sarvmat Digital

बागांसाठी केलेला खर्चही पदरी पडत नसल्याची शेतकर्‍यांची व्यथा

राहाता (तालुका प्रतिनिधी)– भाव पडल्याने पेरू व डाळिंब उत्पादक अडचणीत सापडले असून अवकाळी पावसाने नुकसान होऊनही पंचनामे झाले नाहीत तसेच नुकसान भरपाई मिळणार की नाही ही चिंता खात असतानाच भाव कोसळल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.

पेरू व डाळिंब पिकाचे आगार समजल्या जाणार्‍या राहाता तालुक्यातील या फळ पीक उत्पादकांना गेल्या पाच वर्षापासून विविध संकटांना सामोरे जाण्याची वेळ येत आहे. चार वर्षे दुष्काळ व पाण्याच्या टंचाईमुळे फटका बसला तर यावर्षी उशिरा पाऊस झाल्याने बागा लेट फुलल्या. ऐन बहारात असताना अवकाळी पावसाने या बागांचे मोठे नुकसान झाले. फूल, कळी गळून गेली. सरकारने वार्‍यावर सोडले. पावसाच्या नुकसानीतून या पिकांना वगळले असताना जो थोडा फार माल झाडावर होता तो काढणीला आल्यावर बाजारभाव कोसळल्याने व बदलत्या हवामानामुळे मालाची प्रतवारी टिकत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

पेरू हंगाम यावेळी अडीच महिने उशीरा सुरू झाला. त्यामुळे गुजरात, मध्यप्रदेश येथून मोठी मागणी येथील पेरू व डाळिंबाला असते मात्र तेथील पेरू सुरू झाल्याने तसेच आवक वाढल्याने बाजारभाव गडगडले. मुंबईत महानगरपालिकेकडून पेरू विक्रेते व फेरीवाल्यांवर होणार्‍या कारवाईमुळेही काही प्रमाणावर विक्रीवर परिणाम झाला. तसेच गेल्या पंधरा दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे कच्चा माल पक्का झाल्याने मंदीत आणखी भर पडल्याचे व्यापारी सांगत आहेत. मागील महिन्यात सहाशे रुपये दर असलेला पेरू आता कॅरेटला अवघा तिनशे रुपयावर आल्याने बागांवर केलेला लाखो रुपयांचा खर्चही वसूल होताना दिसत नाही. महागडी औषधे, वाढलेली मजुरी याचा ताळमेळ लागत नाही. पिवळ्या पेरूलाही विविध कंपन्यांकडून योग्य दर मिळत नाही. त्यामुळे पेरू उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

सततच्या अवकाळी पावसामुळे लाख मोलाचे डाळिंब पीक होत्याचे नव्हते केले. तयार होत आलेले फळ या पावसामुळे खर्डी रोगाने खराब झाले. प्रत घसरल्याने बाजारपेठेत या फळाला मागणीच नाही. त्यामुळे मातीमोल भावात डाळिंब विकावे लागत आहेत. जे चांगल्या प्रतिचे फळ आहे त्यालाही मागणी कमी. बाहेरील राज्यातील डाळिंब सुरू झाल्याने मागणी घटली. हे पीक घेताना आतापर्यंत लाखो रुपये खर्च झाले. रासायनीक खते, महागडी औषधे यांचे पैसेही या उत्पन्नातून वसूल होत नाही तर या कमी प्रतीच्या मालाला कोणी घेतच नाही. प्रोसीसींग कंपन्याही कमी दरात मागणी करताना दिसत आहेत. त्यामुळे डाळिंब उत्पादकांनाही यावर्षी मोठा फटका बसला आहे.

सरकारने पेरू व डाळिंब उत्पादकांना अवकाळी पावसाच्या नुकसानीत समावेश करून तातडीने मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. तसेच ज्या शेतकर्‍यांनी पेरू व डाळिंब पिकांचे विमे भरले आहेत अशा कंपन्यांनी वेळीच नुकसान भरपाई देण्यास भाग पाडावे. दरवर्षी शेतकर्‍यांना विमा नुकसान देताना विमा कंपन्यांचा अनुभव चांगला नाही. सरकारने यात लक्ष घालण्याची गरज आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com