श्रीरामपूर सभापती पदाचा वाद जिल्हाधिकार्‍यांकडे
Featured

श्रीरामपूर सभापती पदाचा वाद जिल्हाधिकार्‍यांकडे

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

‘व्हीप’ डावलल्याने सभापती संगीता शिंदेंना अपात्र करा

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – पंचायत समितीच्या सभापती सौ. संगीता सुनील शिंदे यांनी काँग्रेस पक्षाचा ‘व्हिप’ डावलून पक्षाचे उमेदवार पराभूत केले. त्यामुळे कायद्यानुसार त्यांना अपात्र ठरवून त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी काँग्रेसच्या गटनेत्या डॉ. वंदना ज्ञानेश्‍वर मुरकुटे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे केली आहे. पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सौ. संगीता शिंदे यांनी उपनगराध्यक्ष करण ससाणे गटाची साथ सोडली. त्यांनी माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील, माजी आ. भानुदास मुरकुटे, माजी सभापती दीपक पटारे यांच्या महाआघाडीला साथ दिली. त्यांनी बंडखोरी केल्याने सभापतिपदी शिंदे तर उपसभापतिपदी बाळासाहेब तोरणे यांची निवड करण्यात आली. शिंदे यांच्या बंडामुळे काँग्रेसच्या सभापतीपदाच्या उमेदवार डॉ. वंदना मुरकुटे व उपसभापतीपदाचे उमेदवार विजय शिंदे हे पराभूत झाले. त्यामुळे मुरकुटे यांनी स्थानिक स्वराज्य संस्था अपात्रता कायद्यानुसार सभापती शिंदे यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे.
या अर्जात म्हटले आहे की, 16 फेब्रुवारी 2017 रोजी झालेल्या निवडणुकीत सौ. संगीता शिंदे या दत्तनगर पंचायत समितीच्या गणातून इतर मागासवर्गीय महिला या प्रवर्गातून काँग्रेस पक्षाकडून निवडून आल्या. निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे वंदना मुरकुटे, संगीता शिंदे, विजय शिंदे, अरुण पाटील नाईक हे 4 सदस्य निवडून आले. त्यांनी 8 मार्च 2017 रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे गटनोंदणी केली. गटनेतेपदी सौ. संगीता शिंदे यांची निवड करण्यात आली होती. गटनेते पदाची कर्तव्य संगीता शिंदे यांनी पार पाडली नाही. म्हणून मुरकुटे, विजय शिंदे, अरुण नाईक या तीन सदस्यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब साळुंके यांच्याकडे तक्रार केली. श्री. साळुंके यांनी दि. 26 डिसेंबर रोजी बैठक बोलावली. पण त्या बैठकीस शिंदे हजर राहिल्या नाहीत. त्यानंतर गटनेते पदावरुन त्यांना दूर करुन मुरकुटे यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे तशी नोंदणी करण्यात आली.
काँग्रेसने सभापती पदासाठी वंदना मुरकुटे, उपसभापती पदासाठी विजय शिंदे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे चारही सदस्यांवर व्हिप बजविण्यात आला. शिंदे यांच्या घरावर व्हिप चिटकविण्यात आला. त्यानंतर संगिता शिंदे यांनी मतदानापूर्वी विरोधी महाआघाडीचे दिपक पटारे यांचे प्रस्तावक म्हणून सही घेतली. त्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुध्द हात वर करुन मतदान केले. त्यामुळे पक्षाचे मुरकुटे व शिंदे हे दोन उमेदवार पराभूत झाले.
संगिता शिंदे यांनी काँग्रेस पक्षाशी प्रतारणा केली. विरोधात मतदान केले. व्हिपचा अनादर केला. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी अर्जात करण्यात आली आहे. मुरकुटे यांच्यावतीने अ‍ॅड. राहुल करपे, सुशील पांडे, तुषार आदिक, वैभव गुगळे हे काम पहात आहेत.

वंदना मुरकुटे यांच्या तक्रारीत तथ्य नाही

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – काँग्रेसचा अधिकृत गटनेता मीच असून पंचायत समितीच्या नुकत्याच झालेल्या सभापती व उपसभापती निवडणुकीत सभापतिपदी सौ. संगीता शिंदे यांच्या झालेल्या निवडीवर सौ. वंदना मुरकुटे यांनी केलेल्या तक्रारीमध्ये तथ्य नसल्याचे सभापती सौ. शिंदे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे घेतलेल्या लेखी हरकतीत म्हटले आहे. संगीता शिंदे यांनी घेतलेल्या लेखी हरकतीत त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेसच्यावतीने पंचायत समितीच्या निवडणुकीत पाच वर्षांसाठी माजी आमदार स्व. जयंतराव ससाणे यांनी बैठकीत जाहीर करून कायदेशीररित्या जिल्हाधिकार्‍यांसमोर ओळख परेड करून गटनोंदणी करून गटनेतेपदी मला नेमलेले असताना डॉ. वंदना मुरकुटे यांनी पक्षाची कुठलीही बैठक न घेता, माझ्या खोट्या सह्या करून शासनाची व माझी फसवणूक केली आहे. पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाची निवड ही कायद्यानुसार झाली आहे. अडीच वर्षे मुदत संपल्यानंतर दि. 7 जानेवारी 2020 ही निवडणूक झाली. त्यापुर्वी काँग्रेसच्या पंचायत समितीच्या गटनेता या अधिकाराने दि. 6 जानेवारी 2020 रोजी पक्षाच्या निवडून आलेल्या उमेदवारांच्या घराच्या दर्शनी भागावर ‘व्हीप’ बजावल्याचे पत्र लावलेले आहे. त्या बाबतचे फोटो काढून ठेवले आहेत. तसेच निवडणुकीच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमक्ष पुन्हा ‘व्हीप’ बजावला आहे. तसेच दि. 7 जानेवारी 2020 रोजी च्या दै. सार्वमत या वृत्तपत्रात जाहीर ‘व्हीप’ बजावला होता. त्याप्रमाणे निवडणुकीत नियमाप्रमाणे सभापती म्हणून माझी निवड करण्यात आली.
केवळ पदाच्या हव्यासापोटी डॉ. वंदना मुरकुटे यांनी खोटे कागदपत्रे तयार करून, पक्षादेश डावलून उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच इतर सदस्यांवर बेकायदेशीररित्या खोटा ‘व्हीप’ बजावल्याने सर्वांची दिशाभूल केली. या निवडणुकीत पराभूत झाल्याने केवळ द्वेशातून जिल्हाधिकारी यांच्या कडे माझ्या निवडी विरुध्द हरकत दाखल केली. त्यामुळे वंदना मुरकुटे यांची हरकत फेटाळून मला न्याय मिळावा, अशी मागणी सभापती संगिता शिंदे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com