थकित कर वसुलीसाठी आयुक्त द्विवेदी आक्रमक
Featured

थकित कर वसुलीसाठी आयुक्त द्विवेदी आक्रमक

Sarvmat Digital

मोठे थकबाकीदार झळकणार फ्लेक्सवर, नळजोडही तोडण्यात येणार

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेताच जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कर वसुलीवर लक्ष केंद्रीत केले असून, थकबाकीदारांची नावे फ्लेक्सवर झळकविण्यापासून, मालमत्ता जप्त करणे, नळकनेक्शन तोडणे आदी कारवाई करण्याचे आदेश दिले.

द्विवेदी यांनी मंगळवारी महापालिकेत बैठक घेतली. यामध्ये थकित कराबाबत त्यांनी आढावा घेतला. सुमारे 282 कोटींची थकित बाकी कागदोपत्री दिसत असली तरी न्यायालयीन वादात अडकलेली थकित रक्कमही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे न्यायालयीन अडचण येणार नाही, अशी थकित रक्कम तातडीने वसूल करण्याचे आदेश त्यांनी दिले. आतापर्यंत 36 कोटींची वसुली झालेली असून, पुढील मार्चअखेरपर्यंत 38 कोटींचे उद्दिष्ट द्विवेदी यांनी प्रभाग समिती कार्यालयांना दिले.

वसुलीची मोहीम कठोरपणे राबविताना त्यासाठी लोकांना माहिती मिळावी म्हणून ध्वनिक्षेपकावरून अनाउन्समेंट करण्याचे सांगण्यात आले आहे. यासाठी काही रीक्षा आणि सध्या महापालिकेच्या दारोदार फिरत असलेल्या घंटागाड्यांचा वापर करण्यात येणार आहे. तसेच मोठ्या थकबाकीदारांची यादी शहरात चौकाचौकांत फ्लेक्सद्वारे झळकवतानाच ही यादी चित्रपटगृहामध्येही झळकविण्याचे सांगण्यात आले आहे.

शहरातील चार प्रभाग समित्यांना वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये सावेडी प्रभाग समितीला बारा कोटी, बुरूडगाव प्रभाग समितीला दहा कोटी, शहर व झेंडीगेट प्रभाग समितीला प्रत्येकी आठ कोटी रुपये उद्दिष्ट देण्यात आले आहे. मार्चअखेरपर्यंत इतर कामे करतानाच वसुलीवर प्रभाग अधिकार्‍यांनी सर्वाधिक लक्ष केंद्रीत करण्याचेही सांगण्यात आले आहे.

शास्तीमाफी यावर्षी नाहीच
कर वसुलीची मोहीम तीव्र झाल्यानंतर नगरसेवकांतून लगेच शास्ती माफीचा आग्रह धरला जातो. शास्तीमध्ये माफी देण्याचा अधिकार आयुक्तांकडे आहे. चालू आर्थिक वर्षात ही माफी मिळालेली नाही. त्यामुळे आता ही माफी मिळावी, असा आग्रह नगरसेवकांचा असतो. त्यानुसार मागणीचे पत्रकही निघू लागले आहेत. मात्र यापूर्वी अनेकदा शास्तीमाफी देऊनही मोठ्या थकबाकीदारांनी त्याचा लाभ घेतलेला नाही. त्यामुळे प्रशासन यावर्षी शास्ती माफी देण्याच्या मानसिकतेत नाही. आगामी काळात यासाठी किती दबाव येतो, यावरच शास्तीमाफीचा निर्णय अवलंबून असेल.

Deshdoot
www.deshdoot.com