पाचेगाव परिसरात मजूर टंचाईमुळे रब्बी पिकांना आणखी विलंब
Featured

पाचेगाव परिसरात मजूर टंचाईमुळे रब्बी पिकांना आणखी विलंब

Sarvmat Digital

दर वाढवूनही मजूर मिळेनाच

पाचेगाव (वार्ताहर) – यंदा परतीच्या पावसाने खरीप पीक जवळपास वाया गेले असले तरी पाचेगाव परिसरात रब्बीसाठी शेती कामांना वेग आला आसून गहू, हरभरा, कांदा पेरणी व लागवडीला गती मिळाली आहे. कांदा व ऊस क्षेत्र वाढले असून मजुरांची कमतरता भासू लागली आहे. प्रतिदिन मजुरीसाठी महिलांना दोनशे ते अडीचशे रुपये तर पुरुषांना तीनशे ते चारशे रुपये मोजावे लागत असून शेतमालकांना कुटुंबातील सदस्यांसह शेतात राबण्याची वेळ आली आहे.

शेतीची कामे ट्रॅक्टर व आधुनिक पद्धतीने केली जात असली तरी कांदा लागवड, खुरपणी व औषध फवारणीसाठी मनुष्यबळाची गरज अपरिहार्य ठरते. या भागातील काही मजूर वीटभट्टी तर काही ऊस तोडणीसाठी बाहेरगावी गेलेले असल्याने मजुरांचा तुटवडा झाला आहे. मजूर कमी असल्याकारणाने या भागात कांदा रान बांधणीसाठी तीन ते साडेतीन हजार रुपये तर कांदा लागवडीसाठी नऊ ते साडेनऊ हजार रुपये मोजण्याची वेळ आली आहे. ऊस लागवडीसाठीही चार ते साडेचार हजार रुपये मोजण्याची वेळ येत आहे.

कपाशी वेचणीसाठी बारा ते तेरा रुपये दर प्रति किलोला मोजावा लागत आहे. परतीच्या पावसामुळे आधीच रब्बीला विलंब झाल्यामुळे शेतकर्‍यांनाही ही वाढीव मजुरी देण्यावाचून पर्याय राहिलेला नाही. ज्यांना दोन ते तीन एकर जमीन आहे ते कुठूनतरी प्रयत्न करुन मजूर उपलब्ध करुन हा मोठा दर देऊन आपली शेतीची कामे उरकून घेत आहेत. मात्र ज्यांना पाच ते दहा एकर क्षेत्र आहे त्यांची अधिक मजुरी देण्याची तयारी दाखवूनही पुरेसे मजूर उपलब्ध करण्यास दमछाक होताना दिसत आहे.

शेतकरी रोज सकाळी वेगवेगळ्या मजुरांच्या टोळ्यांकडे चकरा मारताना दिसत आहेत. मजूर मात्र उद्या किंवा परवा दिवशी येऊ असे आश्वासन देत आहेत. मजुरांअभावी रब्बी पिके लांबणीवर पडू लागल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. मागील दोन वर्षे दुष्काळच्या छायेत गेली. यंदा परतीच्या पावसाने रब्बीची खात्री दिली पण मजुरांअभावी रब्बी पेरण्या लागवडीची कामे उरकताना शेतकर्‍यांच्या नाकीनऊ येत आहेत.

मजूर मागेल तो दर द्यायला आम्ही तयार आहोत तरी मजूर वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे शेतीच्या विविध लागवडीसाठी विलंब होत आहे. उशिराने होणार्‍या लागवडीमुळे उत्पादन देखील कमी होईल, असे चित्र या भागात पवहावयास मिळत आहे. पाणी परिस्थिती यंदा चांगली असली तरी मजुरांच्या टंचाईमुळे शेतकर्‍यांची दमछाक होत आहे. आधुनिक काळ असला तरी शेतीच्या काही कामांना मनुष्यबळाशिवाय पर्याय नाही.
-भगीरथ पवार, शेतकरी, पाचेगाव.

मला वडिलोपार्जित 10 एकर क्षेत्र आहे. मजूर टंचाईमुळे ऊस लागवडीसाठी उशीर होत चालला होता. त्यामुळे चार एकर ऊस लागवड मी व कुटुंबातील सदस्यांनी घरच्या घरी केली. सर्वच शेतकर्‍यांची शेतीकामे एकाचवेळी आल्यामुळे मजूर टंचाई भासत आहे.
-सुभाष तुवर, शेतकरी, पाचेगाव.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com