Featured

आव्हानातही शोधली संधी !

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

लॉकडाऊनच्या काळात जग जणू थांबले आहे. परंतु याही काळात आपल्या कार्यशैलीत बदल करून मंदीच्या काळातही चांगला व्यवसाय करणारे काही लोक आहेत. उत्पन्न घटल्यामुळे चिंतेत असलेल्या प्रत्येकाला असे स्टार्टअप्स प्रेरणादायी आहेत. आव्हानांचे रूपांतर संधीत करणे आपल्याला शिकावेच लागेल आणि गरजेप्रमाणे बदल घडविण्याची कला आत्मसात करावीच लागेल, असा संदेश या मंडळींनी जगाला दिला आहे. विशेष म्हणजे, या प्रक्रियेत खेड्यापाड्यातील लोकही मागे राहिलेले नाहीत.

अभिजित कुलकर्णी, उद्योगक्षेत्राचे अभ्यासक

लॉकडाऊनमुळे सर्वांचेच नुकसान झाले आहे. परंतु काही मंडळी अशी आहेत ज्यांनी या कठीण परिस्थितीतही धीर सोडला नाही. या संकटाचेसुद्धा त्यांनी संकटात रूपांतर केले. नवनवीन प्रयोग त्यांनी केले आणि ते यशस्वीही झाले. अनेक ब्रँड मोठे होण्यामागील कारण त्यांनी ओळखलेली गरज हे होते. लॉकडाउनच्या काळात काही लोक गरज ओळखून पुढे जात आहेत. 36 वर्षीय समिक सरकार त्यापैकी एक. कोरोनाच्या संकटापूर्वी ते आपला तयार कपड्यांचा व्यवसाय ऑनलाइन करून मोठा फायदा मिळवत होते. परंतु लॉकडाउनमुळे त्यांचा व्यवसाय ठप्प झाला. काम बंद झाल्यामुळे तेही घाबरले. परंतु असे बदल काही संधीही घेऊन येतात, हे ओळखून त्यांनी मास्कची विक्री सुरू केली. या व्यवसायातून ते आता चांगली कमाई करीत आहेत. ‘तजोरी’ या लाइफस्टाइल ई-कॉमर्स स्टार्टअपच्या 36 वर्षीय सहसंस्थापक मानसी गुप्ता आणि त्यांचे पती अंकित वाधवा यांनीही त्यांच्या व्यवसायात बदल घडवून आणला.

ज्या प्लॅटफॉर्मवरून आतापर्यंत त्यांनी फूटवेअर, कपडे आणि दागिन्यांची विक्री केली, त्याच प्लॅटफॉर्मवरून लॉकडाउनच्या काळात त्यांनी सॅनिटाइझर, हँडवॉश आणि फेसमास्कची विक्री सुरू केली. त्यासाठी कच्च्या मालाची खरेदी, उत्पादनाची परवानगी, पुरवठा करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी पासची व्यवस्था करणे यासारखी अनेक आव्हाने होती. परंतु नवे काम सुुरू करण्यासाठी आम्ही तयार होतो आणि त्यात यशस्वीही झालो, असे मानसी गुप्ता सांगतात.

बंगळुरू येथील ‘क्योर डॉट फिट’ या फिटनेस फर्मला लॉकडाउनमुळे आपल्या जिम आणि आरोग्य क्लिनिक बंद करावी लागली. त्यावेळी या फर्मने व्हर्च्युअल योगा क्लासेस सुरू केले तसेच किराणा मालाची घरपोच विक्री सुरू करून बाजारपेठेत नाव कायम ठेवण्यास प्राधान्य दिले. भांड्यांच्या एका उत्पादकाने लॉकडाउनच्या काळात आपल्या व्यवसायाची रूपरेषाच बदलून टाकली. हरियानाचे राहुल बजाज हे सोनीपत येथे भांड्यांचे उत्पादन करतात. लॉकडाउनमुळे जेव्हा कारखान्यातील काम कमी झाले, तेव्हा ते स्टीलपासून हँडवॉश स्टेशन तयार करण्याच्या कामात गुंतले. त्यांच्या भांड्यांच्या कारखान्यात चारशे कामगार कार्यरत असून, लॉकडाउनमुळे त्यांना आपल्या नोकरीची काळजी वाटू लागली. तेव्हा बजाज यांनी सर्व कर्मचार्‍यांशी विचारविनिमय सुरू केला आणि त्यातून फूट पॅडलवर चालणार्‍या हँड्स-फ्री वॉश स्टेशनची कल्पना पुढे आली. आता परिस्थिती अशी आहे की, अशा 850 हँड वॉश स्टेशनची ऑर्डर त्यांना मिळाली असून, आणखीही नव्या ऑर्डर मिळतच आहेत. आता ते सेन्सर आधारित सॅनिटाइझर डिस्पेन्सर आणि शू-सॅनिटाइझर अशी उपकरणे तयार करण्याच्या कामाला लागले आहेत. लॉकडाउन समाप्त झाल्यानंतर लोकांची जीवनशैली कदाचित पहिल्यासारखी नसेल. अनेक गोष्टी बदललेल्या असतील. खाण्यापिण्याच्या सवयींमध्येही कदाचित बदल झालेले असतील. आगामी काळात कदाचित भारतीय जडी-बूटी आणि वनौषधींना जगातून मागणी वाढण्याची शक्यता आहे. डेहराडूनमध्ये राहणारे हर्षित सचदेव यांनी भविष्यातील ही संधी ओळखली आहे. डोंगरी मिठापासून स्टार्टअप सुरू करणार्‍या हर्षित यांनी आता डोंगरी वनौषधींच्या उत्पादनाच्या शक्यता पडताळून पाहायला सुरुवात केली आहे. आगामी काळात रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी वनौषधी उत्पादनांना मागणी वाढेल, अशी त्यांना खात्री आहे. पहाडी आले, लसूण पेस्ट, हर्बल चहा, काढा, भंगजीरा तेल यांसह अनेक उत्पादने ते आता तयार करीत आहेत. काशीपूरच्या भारतीय व्यवस्थापन संस्थेने संशोधन पथकातील काही संशोधक हर्षित यांना याकामी मदतही करीत आहेत.

काळाची गरज ओळखून अनेक कंपन्यांना वर्क फ्रॉम होम संस्कृतीचा स्वीकार करावा लागला. काही कंपन्यांना आपल्या कामाची शैलीही बदलावी लागली. त्याच वेळी चित्रपट आणि नाटकांच्या तिकिटांची ऑनलाइन विक्री करणार्‍या ‘बुक माय शो’ या कंपनीने इन्स्टाग्रामवरील लाइव्ह क ार्यक्रमांच्या प्रमोशनचे काम सुरू केले आहे. त्याचप्रमाणे अनेक कंपन्या ग्राहकांशी संपर्क कायम राखण्याच्या हेतूने काळाच्या गरजेनुसार नवीन बदल घडवून आणू लागल्या आहेत. ‘थ्रिलोफिलिया’ या पर्यटन क्षेत्रातील स्टार्टअपचे संस्थापक अभिषेक डागा आणि चित्रा गुरनानी यांनाही आपल्या व्यवसायाची चिंता वाटू लागली आणि त्यांनी ‘व्हर्च्युअल टूर’ची संकल्पना शोधून काढली.

असेच प्रयत्न खेडोपाडीही होताना दिसत आहेत. लॉकडाउनमुळे शेतकर्‍यांना आपल्या मालाची विक्री करण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध होईनाशी झाली आहे. कर्नाटकच्या कोलार जिल्ह्यातील होन्नासेट्टीहळ्ळी गावातील शेतकर्‍यांची अशीच परिस्थिती आहे. येथून दरवर्षी सुमारे 350 कोटी रुपयांच्या टोमॅटोची विक्री होते. परंतु यावर्षी तेथील शेतकर्‍यांना टोमॅटोची विक्री करण्यासाठी बाजारपेठच उपलब्ध झाली नाही. तयार टोमॅटो सडू लागण्याची भीती होती आणि कष्टासह गुंतवणूक पाण्यात जाण्याची धास्ती शेतकर्‍यांना होती. अशा वेळी तेथील ग्रामविकास संघटनेचे सदस्य एम. व्ही. एन. राव यांनी अनोखी शक्कल लढवून शेतकर्‍यांना दिलासा मिळवून दिला आहे. राव यांनी गावातील काही शेतकर्‍यांना टोमॅटोचे उन्हात सुकविलेले काप आणि लोणचे तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर ते शेतकर्‍यांकडून टोमॅटोची खरेदी करू लागले. गावातील सुमारे 49 कुटुंबे सध्या टोमॅटोवर प्रक्रिया करून विविध पदार्थांचे उत्पादन करीत आहेत. राव यांच्या म्हणण्यानुसार, सध्या ही उत्पादने घरगुती वापरासाठी आहेत. परंतु पुढील काळात मोठ्या प्रमाणावर ही उत्पादने बाजारात आणण्याची संधी आहे. त्यातून गावातील लोकांना उत्पन्नाचे साधन मिळेल. या एका स्टार्टअपमुळे त्याच्याशी संबंधित सर्व शेतकर्‍यांना योग्य उत्पन्न मिळत आहे. रोजगार मिळत आहे आणि पिकाची नासाडी टळली आहे. बेंगळुरू येथील ‘लॉग नाइन मटेरियल’ या स्टार्टअपचे अक्षय सिंघल यांनी कोरोना ओव्हनची निर्मिती केली आहे.

कोणत्याही पृष्ठभागावरील जीवाणू आणि विषाणूंना हा ओव्हन मारू शकतो असा त्यांचा दावा आहे. यूव्हीसी दिव्याने युक्त या ओव्हनच्या चेंबरमध्ये कोणतीही वस्तू किंवा मास्क ठेवल्यास त्या वस्तू सॅनिटाइझ होतात. हा ओव्हन दहा मिनिटांत विषाणूंना मारू शकतो, असा त्यांचा दावा आहे. क्षणभर अशी कल्पना करा की, तुमच्या गाडीलाही कोरोना विषाणूंपासून संरक्षण मिळाले तर..? ही कल्पना प्रत्यक्षात उतरविली आहे ड्रूम्स या भारतीय स्टार्टअपने. ‘कोरोना शील्ड’ हे त्यांच्या उत्पादनाचे नाव आहे. या संकल्पनेअंतर्गत कारवर मायक्रोबियल कोटिंग केले जाते. त्यामुळे गाडीच्या पृष्ठभागावर विषाणू टिकू शकत नाहीत. या प्रक्रियेत मायक्रोब शील्ड तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे तंत्रज्ञान कार सॅनिटाइझ करून मायक्रो-ऑरगॅनिजमची वाढ रोखण्यास मदत करते. एकदा कारला असे कोटिंग केले तर ते चार महिने टिकेल, असा या स्टार्टअपचा दावा आहे.

कोरोनाच्या प्रभावकाळातच केरळमधील ‘असिमोव रोबोटिक्स’ या स्टार्टअपने ऑफिस आणि अन्य सार्वजनिक ठिकाणांच्या प्रवेशद्वारावर उभ्या राहणार्‍या रोबोची निर्मिती केली आहे. हातांची स्वच्छता आणि आरोग्याप्रती जागरूकता निर्माण करण्याचे काम हा रोबो करणार आहे. याखेरीज रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये (विलगीकरण कक्ष) भोजन आणि औषधे घेऊन जाण्यासाठी हे रोबो तैनात केले जात आहेत.थोडक्यात, येणारा काळ बदललेला असेल; परंतु हा बदल आपल्याला नवे रस्ते शोधण्यासाठी प्रेरणा देणाराही ठरणार आहे. बदल स्वीकारून जो स्वतःच्या व्यवसायात बदल करेल, त्याला व्यवसाय तोट्यात जाण्याची भीती नसेल.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com