एक लाख स्वाक्षरींचे पत्र दिले जिल्हाधिकार्‍यांना
Featured

एक लाख स्वाक्षरींचे पत्र दिले जिल्हाधिकार्‍यांना

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

संविधान प्रेमी : सीएए व एनआरसीला विरोध

नाशिक । प्रतिनिधी

शहरातील संविधानप्रेमी नाशिककरांच्या वतीने सीएए व एनआरसी आणि एनपीआरच्या विरोधात शहरातील विविध भागात सह्यांची मोहीम राबविण्यात आली. त्यात एक लाख नाशिककरांनी स्वाक्षरी करत या कायद्याला विरोध केला. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या मार्फत सरन्यायाधीश शरद बोबडे यांना पत्र पाठविण्यात आले.

संविधानप्रेमी नाशिककर समितीकडून स्वाक्षरीचे पत्र देऊन सीएए कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी समितीचे पदाधिकारी उपस्थितीत होते. शहरातील संविधान प्रेमी नाशिककरांच्या वतीने शहरात मोहीम राबवत नागरिकांच्या सीएए व एनआरसी आणि एनपीआरच्या विरोधात जवळपास एक लाख स्वाक्षरी घेण्यात आल्या. यामध्ये सर्वधर्मीय पुरूष, महिला व तरुणांनी स्वयंस्फुर्तीने भाग घेतला. त्याचबरोबर, शुक्रवारी शहरातील सर्वच मशिदींमध्ये टेबल लावून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

केंद्र सरकार देशाच्या संविधानाला बदलण्याचा प्रयत्न करीत असल्याने संविधानप्रेमी नाशिककरांच्या वतीने एक लाख सह्यांचे पत्र देशाचे मुख्य न्यायाधीश यांना पाठविण्यात येणार आहे. तसेच सीएए व एनआरसीमुळे होणार्‍या दुष्परिणामाबद्दल संविधानप्रेमी लोकांमध्ये सतत जनजागृती करीत आहे. यामुळे सतत आंदोलनाला पाठिंबादेखील वाढत आहे. संविधान प्रेमी नाशिककरांकडून शहरातील ईदगाह मैदानावर व बडी दर्गाहच्या प्रांगणात ‘शाहीन बाग’च्या समर्थनार्थ एक दिवसीय महिलांचे ठिय्या आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनालाही महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच, संविधान प्रेमी नाशिककरांकडून मागील काही दिवसांपासून शहरातील विविध भागातून जमा करण्यात आलेल्या नागरिकांच्या एक लाख सह्यांचे पत्र सरन्यायाधीश शरद बोबडे यांना जिल्हाधिकार्‍यांमार्फेत सुपुर्द करण्यात आले.

Deshdoot
www.deshdoot.com