जीवघेण्या स्वातंत्र्याच्या निमित्ताने…
Featured

जीवघेण्या स्वातंत्र्याच्या निमित्ताने…

Balvant Gaikwad

पराग वाळिंबे

अमेरिका म्हणजे जगातलं सर्वाधिक प्रगत राज्य आणि अवघ्या विश्वावर राज्य करण्याची या देशाची क्षमता असल्याचं चित्र गेली अनेक वर्षं आपल्याला पहायला मिळत आहे. कोरोनाचं संकट गडद होत गेलं तसतसं मात्र या देशाबाबतचं चित्र आणि एकूणच समज बदलत गेला. इथे कोरोनाने थैमान घातलं आणि हजारो बळी गेले हे अवघ्या जगाला माहीत आहे. मात्र एवढं बलशाली, सुशिक्षित आणि उच्च तंत्रज्ञानाने परीपूर्ण राष्ट्र असं एकाएकी व्याधीला बळी कसं पडत गेलं असा प्रश्न जगात अनेकांना पडला. याचंही उत्तर नेहमीच्या चौकटीतच दिलं जाऊ शकतं.

मात्र इथल्या मुक्त जीवनशैलीने आम्हा भारतीयांनाही चकीत केलं आहे. भारतात बेशिस्तपणाचे, अस्वच्छतेचे आणि पुरेशी काळजी न घेतल्याने या व्याधीला बळी पडत असलेल्यांचे अनेक किस्से ऐकायला मिळत आहेत. या संदर्भात मोठा जनआक्रोश असल्याचंही ऐकायला मिळत आहे. मात्र इथे अमेरिकेतही चित्र असंच आहे. इथेही ही व्याधी मोठ्या प्रमाणात पसरण्याला लोकांचा स्वभाव कारणीभूत असल्याचं स्पष्टपणे पहायला मिळत आहे. सरकारी पातळीवरुन आणि इतर विविध माध्यमांमधून या व्याधीचा प्रसार होण्याला चीन कारणीभूत असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. तो खरा असेलही; पण स्वातंत्र्याच्या भ्रामक कल्पनांमुळे इथला त्रास वाढला, हे ही निर्विवाद सत्य आहे. इथे भारतातल्यासारखं वातावरण नसलं तरी लोकांना रोखण्यात प्रशासन कमी पडत आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. लॉकडाऊनच्या निमित्ताने भारतात कर्फ्यूचं वातावरण पहायला मिळणं लोकांच्या अंगवळणी पडू शकतं, पण इथे स्वातंत्र्यावरचा असा घाला लोकांना मंजूर नाही.

कोरोनाची सुरूवात होत असताना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काहीसे गाफिल राहिले. ही व्याधी आशिया खंडापुरती मर्यादित राहील, अमेरिकेपर्यंत पोहोचणार नाही, असं वाटल्यामुळे फारशा उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यातच अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक होत असल्यामुळेही ट्रम्प यांचं कोरोनाकडे दुर्लक्ष झालं. अमेरिकन सरकारने ठोस निर्णय घेतले नाहीत. त्याऐवजी सगळं त्या त्या राज्यांच्या प्रशासनावर सोडून दिलं आणि कोरोना प्रकरण हाताबाहेर गेलं. न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, शिकागो, न्यू जर्सी अशा लोकसंख्येचं आणि गर्दीचं प्रमाण अधिक असणार्या भागांमध्ये कोरोना पसरत गेला. सध्या इथे वसंत ऋतू आणि उन्हाळा आहे. या काळात अमेरिकन्स भटकंतीला बाहेर पडतात, जीवनाचा आनंद लुटतात. म्हणूनच समुद्रकिनार्यांवर गर्दी होत असल्याचं चित्र दिसतं. कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर सुरूवातीच्या काळात इथल्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं.

मात्र आता ही भीती बर्याच अंशी कमी झाली आहे. वॉलमार्टसारखी मोठी दालनं सुरू आहेत. ऍमेझॉनवरून वस्तूंची खरेदी सुरू आहे. जॉर्जियात कोरोनाचं प्रमाण बरंच कमी आहे. लोक व्यायामाला बाहेर पडतात. इथल्या रेस्टॉरंट्समध्ये गर्दी पहायला मिळते. दुकानंही उघडी आहेत. सोशल डिस्टन्सिंगचं बर्यापैकी पालन होतं. इथल्या लोकांनी स्वत:चे नियम स्वत:च ठरवले आहेत. लोक काळजी घेतात. पण बाहेर पडणार्यांची संख्याही बरीच जास्त आहे. सरकारी कार्यालयं बंद आहेत तसंच खासगी कार्यालयांमधले कर्मचारीही घरून काम करत आहेत. लॉकडाउनच्या नावाखाली आपल्यावर बंधनं लादू नयेत, असं इथल्या लोकांंचं म्हणणं आहे. आता अर्थव्यवस्था रूळावर यावी यासाठी व्यवहार सुरू करण्याची मागणी इथे होत आहे. अर्थात इथेही पोलीसांची सक्ती आहेच. समुद्रकिनार्यांवर गर्दी करणार्यांना दंडुक्याचा धाक दाखवला जातो.

इथे काहींनी कोरोनाला गंभीरपणे घेतलं आहे. मात्र अनेकांना या आजाराची भीती वाटत नाही. लोक हिंडत आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लोकांनी नियमांचं पालन करायला हवं, हे इथेही अनेकांच्या लक्षात येत नाही, हा कदाचित काही भारतीयांसाथी दिलासा ठरावा! अमेरिकेत कोविड-19 च्या प्रसाराला सुरूवात झाल्यानंतर फ्लोरिडामध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. मात्र एप्रिलच्या मध्यात इथले समुद्रकिनारे नागरिकांसाठी खुले करण्यात आल्यानंतर फक्त अर्ध्या तासात प्रचंड गर्दी उसळल्याचं पहायला मिळालं. माणसं कुटुंबकबिल्यासह श्वानांना घेऊन फिरायला आली होती. अनेक दिवसांच्या बंदिवासातून सुटका झाल्याचा आणि मोकळा श्वास घ्यायला मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहर्यावरून ओसंडून वाहत होता. या दरम्यान सामाजिक दुराव्याचं अजिबात पालन झालं नाही. समुद्रकिनार्यांवर गर्दी लोटल्यानंतर उत्साहाने बेभान झालेली माणसं कोरोना विषाणू आणि या महामारीमुळे लागू झालेले नियम पूर्णपणे विसरून गेल्याचं दिसून आलं. देशभरातल्या विविध राज्यांमध्ये आंदोलनांची तीव्रता वाढत होती. या सगळ्याला ट्रम्प यांचा पाठिंबा होता. लोकांना कोणत्याही परिस्थितीत बाहेर पडायचं होतं, फिरायचं होतं. कोरोना ही फार मोठी समस्या नाही. या आजाराला फार मोठं केलं जात असल्याचंही काहींनी म्हटलं. अशा आशयाचे फलकही आंदोलनांमध्ये पहायला मिळाले. भटकंतीच्या निमित्ताने लोक एकत्र येत राहिले आणि प्रादुर्भाव वाढत राहिला.

आमच्या परिसरातही लोक व्यायामासाठी, चालण्यासाठी बाहेर पडतात. इथल्या मेक्सिकन रेस्टॉरंटमध्ये बर्यापैकी गर्दी होत असते. सार्वजनिक ठिकाणी लोक एकत्र येत आहेत. लोकांच्या मनातली कोरोनाची भीती बरीच कमी झाली आहे. कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी बाहेर पडत आहेत. देशातल्या समुद्रकिनार्यांवर या विद्यार्थ्यांनीच गर्दी केली होती. न्यूयॉर्कमध्ये भुयारी मार्गही गाड्यांनी भरून गेल्याचं चित्र होतं. फ्लोरिडामधल्या समुद्रकिनाार्यांवर या विद्यार्थ्यांनी खूप मजा केली. मला कोरोना झाला तर झाला, कोरोनाच्या भीतीमुळे मी आजचा क्षण वाया घालवू शकत नाही. कोरोना माझा आनंद हिरावून घेऊ शकत नाही, अशी मस्तवाल भाषा अनेकांच्या तोंडी होती. इथल्या कोरोनाबाधितांमध्ये तरुण, प्रौढ, ज्येष्ठ अशा सर्व वयोगटातल्या माणसांचा समावेश आहे. अस्थमा किंवा इतर आजार असणार्यांसह निरोगी लोकांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोनाबाधितांची आणि मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. मात्र बेफिकिरी काही कमी होताना दिसत नाही. या काळात न्यूयॉर्कमधली परिस्थिती अत्यंत भयानक होती. दिवसभरात 700 ते 800 रुग्णवाहिका रस्त्यांवरून धावताना दिसायच्या. अमेरिकेची शान असणार्या या महानगरात सैन्याला पाचारण करावं लागलं. कोरोना नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. नागरिकांना फोनवरून सूचना देण्यात आल्या. अजूनही अशा सूचना पाठवल्या जातात. कोरोनासंसर्गाच्या काळात कोणती काळजी घ्यावी, परिसराला कोरोनामुळे किती धोका आहे, कोरोना रुग्णांची संख्या किती आहे अशा प्रकारची माहिती दिली जाते. सुरूवातीच्या काळात युरोपमधून अमेरिकेत येणार्या प्रवाशांवर बंदी घालण्याबाबत ट्रम्प यांनी सूचना दिल्या होत्या. मात्र यातही सावळा गोंधळ दिसून आला. अमेरिकन नागरिकांसह परदेशी नागरिकांनाही अमेरिकेत प्रवेश देणार नसल्याचं त्यांची म्हटलं होतं. यामुळे विमानतळांवर गर्दी झाली. कोणतीही तपासणी न झालेले रुग्ण कोरोनाचे वाहक ठरले आणि हा आजार अमेरिकेत पसरत गेला.

Deshdoot
www.deshdoot.com