एनआरसी कायदा संमत करणारे मोदी व शहा हे कठपुतली – डॉ. नवले
Featured

एनआरसी कायदा संमत करणारे मोदी व शहा हे कठपुतली – डॉ. नवले

Sarvmat Digital

अकोले (प्रतिनिधी) – एनसीआर कायदा संमत करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा हे कठपुतली आहेत, त्यांच्या मागे आरएसएसचा हात असल्याचा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे प्रदेश सरचिटणीस कॉ. डॉ. अजित नवले यांनी केला. अकोले तालुक्यातील मुस्लीम बांधव, सर्व पुरोगामी संघटना व अनेक राजकीय पक्षांच्या वतीने, केंद्र सरकारने जो घटनेविरोधी कायदा (नागरिकत्व सुधार कायदा) संसदेच्या दोन्ही सभागृहांत पास केला, त्या कायद्याच्या विरोधात तसेच येणार्‍या एनआरसी कायद्याच्या विरोधात काल मंगळवारी सकाळी तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला होता.

यावेळी कॉ. डॉ. नवले बोलत होते. या प्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सोन्याबापू वाकचौरे, संपतराव कानवडे, निखिल जगताप, मराठा सेवा संघाचे दिलीप शेणकर, कॉ. खंडू वाकचौरे, अरुण रूपवते, सोमनाथ नवले, अ‍ॅड. के. बी. हांडे, पाटीलबा सावंत, शांताराम संगारे, लक्ष्मण नवले, शाहिद फारूकी, हुसेन मंसूरी, सरफराज शेख, मैनू शेख, मुस्ताक तांबोळी, दिलावर शेख, अन्सार पठाण, नाजिम शेख, हाफिज मौजूद, हाफिज इस्माईल खान पठाण, डॉ. असिफ, मोहसीन शेख, सगीर पठाण, अयाज खतीब, बिलाल शेख, परवेज शेख आदी उपस्थित होते.
डॉ. नवले म्हणाले, देशात भांडवलदारांचे खिसे भरली जातात. गोरगरीब जनतेचे प्रश्न सोयीस्कर मागे पडले आहेत. जातीय धर्मांधावर आता चर्चा होणार नाही. बेरोजगारी व रोजगाराची चर्चा होत नाही.

वेळेला भारतीय नागरिकत्वाचा मुद्दा पुढे आणला आहे. कोणत्याही जाती धर्मासाठी नाही तर माणुसकीसाठी सर्वांना एकत्रित यावे लागेल. त्यात मानवतेचा विजय होईल व सैतांनाचा नाश होईल हा आपल्या देशाचा इतिहास आहे. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंदराव पानसरे, कलबुर्गी यांना दिवसाढवळ्या गोळ्या घातल्या जातात. तरी आम्ही बोलत नाही, शांत बसतो. आरएसएसवाले धर्मांधतेचे शिक्षण देत आहेत. आपल्या भावी पिढ्यांना आपल्याला धर्मांधतेचे शिक्षण यापुढील काळात घ्यावे लागेल. अकोलेत एका जाती धर्माचा मोर्चा न निघता सर्व पुरोगामी विचारांच्या लोकांचा मोर्चा काढला ही बाब कौतुकास्पद आहे. सैतांनाच्या फौजेचा पराभव करण्यासाठी माणूस म्हणून सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे.

प्रारंभी शहरातील महाराजा लॉन्स येथून मोर्चेकरी हातात निषेधाचे फलक घेत तहसील कार्यालयावर पोहोचले. प्रवेशद्वाराजवळच पोलिसांनी मोर्चा अडविला. नंतर तेथेच मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मीनानाथ पांडे, जि. प. चे माजी अध्यक्ष अशोक भांगरे, भाकपचे अ‍ॅड. शांताराम वाळुंज, प्रा. विलास नवले, आरपीआयचे विजय वाकचौरे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश सचिव डॉ. संदीप कडलग, माजी सरपंच संपतराव नाईकवाडी, दलित पँथरचे चंद्रकांत सरोदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादा पाटील वाकचौरे, सुरेश खांडगे, अयाज शेख, कासम मणियार यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन आरिफ तांबोळी यांनी केले. यावेळी मोर्चेकर्‍यांच्या वतीने तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देण्यात आले. पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे, उपनिरीक्षक दीपक ढोमणे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

संविधान बचाव, देश बचावच्या घोषणांनी तहसील परिसर दुमदुमून गेला होता. मोर्चेकर्‍यांच्या खिशाला केंद्र सरकारच्या एनसीआर कायद्याविरुद्ध काळ्या फिती लावण्यात आल्या होत्या. मोर्चा संपल्यावर तहसील कार्यालयात पोहोचलेले आमदार डॉ. किरण लहामटे यांनाही मोर्चेकर्‍यांनी निवेदन सादर केले.

Deshdoot
www.deshdoot.com