‘सीएए’च्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी संघटनांचा नगरमध्ये मोर्चा
Featured

‘सीएए’च्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी संघटनांचा नगरमध्ये मोर्चा

Sarvmat Digital

खा. डॉ. विखे यांच्यासह आरएसएस, विहिंप, शिवसेनेचा सहभाग

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर शहरामध्ये बुधवारी (दि. 25) सकाळी दहा वाजता नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पुढाकारातून भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चाद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या मोर्चात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, भाजप, शिवसेना आदींसह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

गांधी मैदानातून सकाळी दहा वाजता मोर्चास सुरूवात झाली. चितळे रोड, चौपाटी कारंजा, जुनी कोर्ट गल्ली, वाडिया पार्क, बस स्थानक, पुणे रोडमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला. यावेळी मोर्चेकर्‍यांनी भारत माता की जय, वुई सपोर्ट सीएए अशा जोरदार घोषणा दिल्या. शेकडो नागरिकांनी तिरंगा ध्वज व घोषवाक्याचे फलक हातात घेतले होते. शांततेत व शिस्तीत हा मोर्चा मार्गस्थ झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.

यावेळी खा. डॉ. सुजय विखे म्हणाले, भारतीय नागरिक या कायद्याचे समर्थन करत आहेत. जे हिंसा करत दंगल घडून आणत आहेत ते खरे भारतीय नाहीत. ते घुसखोर आहेत. विरोधकांना या देश हिताच्या कायद्याचे ज्ञान कमी आहे. विरोधकांनी लोकसभेत व राज्यसभेत झालेल्या भाषणाचा अभ्यास करावा. या कायद्याचा गैरसमज दूर होण्यासाठी डिबेट होणे गरजेचे आहे.

शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अनिल राठोड म्हणाले, स्वातंत्र्याच्या 80 वर्षांनंतर भारतात प्रथमच अत्यंत मोठे निर्णय घेतले जात आहेत. काश्मीर प्रश्न, राम मंदिर व आता या नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी होत आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न या कायद्यामुळे पूर्ण होणार आहे.

सर्व हिंदूंनी एकत्र येऊन या कायद्याचे समर्थन करावे व देश विघातक शक्तींना विरोध करावा. राष्ट्रीय स्वयंमसेवक संघाचे प्रांत संपर्क प्रमुख राजाभाऊ मुळे म्हणाले, महात्मा गांधी यांनी देशास स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच या कायद्याची मागणी केली होती. तसेच 2003 मध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे या कायद्याची मागणी केली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी सुरू केल्याने देशात परिवर्तनाची नांदी झाली आहे.

यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोेणे, काँग्रेसचे धनंजय जाधव, चंद्रकांत काळोखे यांनी कायद्याच्या समर्थनार्थ भाषणे केली. सभेचे सूत्रसंचालन सचिन राऊत यांनी केले. रुद्रेश आंबाडे यांनी आभार मानले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक डॉ. रवींद्र साताळकर, शांतीभाई चंदे, माजी खासदार दिलीप गांधी, वसंत लोढा, भाजप जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, सुवेंद्र गांधी आदींसह भाजप, शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेनेचे नेते एकीकडे नागरिक संशोधन कायद्यावर टीका करत असतानाच त्याच पक्षाचे उपनेते अनिल राठोड यांनी कायद्याला समर्थन देण्याची भूमिका घेत मोर्चात सहभाग घेतला. काँग्रेस कायद्याविरोधात आंदोलन करत असताना काँग्रेस नगरसेविका सुप्रिया जाधव यांचे पती काँग्रेसचे माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनीही मोर्चात सहभाग घेऊन कायद्याला समर्थन दिले.

Deshdoot
www.deshdoot.com