क्रीडाक्षेत्रात लक्षवेधी तंत्रज्ञान

क्रीडाक्षेत्रात लक्षवेधी तंत्रज्ञान

वैयक्तिक संगणक आणि पीसी संस्कृतीच्या क्रांतीनंतर अस्तित्वात आलेलं नवतंत्रज्ञान सर्वव्यापी बनलं असताना एखाद्या खेळाची विश्वचषक स्पर्धा कशी मागे राहील? जीवनाचे अनेक पैलू व्यापणार्या सेलफोन, संगणक आणि इंटरनेटमुळे आता या विश्वचषक स्पर्धा नवतंत्रज्ञानाच्या दृष्टीनेही खास ठरत आहे. यापूर्वीच्या कोणत्याही क्रीडास्पर्धेत न दिसलेले तंत्रज्ञानाचे आविष्कार तसंच काही व्यावहारिक उपयोग आता पहायला मिळत आहेत.

 डॉ. दीपक शिकारपूर

कोणताही खेळ खेळण्यासाठी तंत्राची गरज असते पण आजकालच्या जगात खेळात तंत्रज्ञानाचीही गरज मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली आहे. सामन्याप्रसंगी मानवी निर्णयांना असणार्या मर्यादा लक्षात घेऊन अचुकतेशी पाठशिवणी खेळण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते. तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे जगातल्या अब्जावधी लोकांच्या जीवनामध्ये आपण फार वेगाने बदल घडताना पहात आणि अनुभवत आहोत. या सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानांमध्ये माहिती आणि संवादाचं तंत्रज्ञान (इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी) सर्वात आघाडीवर आहे. या सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानांमध्ये माहिती आणि संवादाचं तंत्रज्ञान (इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी) सर्वात आघाडीवर आहे. यामुळे, पूर्वी असलेलं, अंतराचं बंधन आता नाहीसं झालं आहे आणि आज सर्वांना सर्व प्रकारची माहिती मिळू शकते तसंच परस्परांशी गतिशील संवादही होऊ शकतो. अशा प्रकारे सर्व जग जोडलं जाऊन ‘ग्लोबल व्हिलेज’ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली आहे. वैयक्तिक संगणक आणि पीसी संस्कृतीच्या क्रांतीनंतर घरोघरच्या मातीच्या चुलींची जागा आता संगणकाने घेतली आहे. आज, बहुसंख्य नागरिकांना, संगणकाशिवाय आयुष्याची कल्पनाही करता येणार नाही. हे तंत्रज्ञान आता सर्वव्यापी असून आपल्या जीवनात त्यांनी प्रवेश केला आहे. मग एखाद्या स्पर्धेची विश्वचषक स्पर्धा कशी मागे राहील? जगातील सर्वात लोकप्रिय खेळ असलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धा जगभरात सर्वात लोकप्रिय. त्यासंबंधीच्या विविध प्रकारच्या बातम्या वृत्तपत्रांचे रकाने भरतात. अशा स्पर्धांसाठी आवश्यक त्या इमारतींचं बांधकाम, रस्ते आणि वाहतूक नियंत्रण, तिकिटविक्री, प्रायोजकांची धोरणं आणि मागण्या इत्यादीबाबत दररोज काही तरी नवीन घडत रहातं. प्रत्येकाच्या जीवनाचे काही पैलू व्यापणार्या सेलफोन, संगणक आणि इंटरनेटमुळे अवघ्या जगाचं लक्ष वेधणारी ‘फिफा’सारखी विश्वचषक स्पर्धाही नवतंत्रज्ञानाच्या दृष्टीने अनुभवण्याजोगी ठरते. यापूर्वीच्या कोणत्याही क्रीडास्पर्धेत न दिसलेले तंत्रज्ञानाचे आविष्कार तसंच काही व्यावहारिक उपयोग अशा वेळी अनुभवायला मिळतात.

सर्वप्रथम अशा भल्या मोठ्या स्पर्धांवर अतिरेक्यांच्या हल्ल्याचं सावट असतं. संगणकीय आणि इलेक्ट्रॉनिक दळणवळणावर ‘सायबर-हॅकर्स’चा हल्ला होण्याची शक्यता जास्त असते. वेबसाइट्स ‘हॅक’ झाल्यामुळे संपूर्ण नेटवर्कमध्येच प्रचंड गोंधळ निर्माण होऊ शकतो. परंतु असं काहीही होऊ नये, असा भरवसा ही तांत्रिक बाजू सांभाळणार्या कंपनीने देणं अपेक्षित असतं. अशा वेळी जबाबदारी घेणारी कंपनी स्वतःच शेकडो हॅकर्सना कामावर ठेवते. सर्वसंमतीने हॅकिंग करणार्या अशा तंत्रज्ञांना ‘एथिकल हॅकर्स’ म्हणतात. ते खरे चोर नसतात तर हॅकर्सचा हल्ला कशा प्रकारे होऊ शकेल याबाबत विविध कल्पना लढवून आणि तशा शक्यता स्वतःच निर्माण करून त्या दृष्टीने ‘सिस्टिम’ सुरक्षित बनवणं हे त्यांचं काम असतं. स्पर्धेच्या ठिकाणचे निकाल दाखवणारे स्कोअरबोर्डस, खेळाडूंना तसंच प्रेक्षकांना पुरवली जाणारी सामन्यांची वेळापत्रकं, नेटवर प्रसिद्ध केली जाणारी अधिकृत परिपत्रकं अशांसारख्या ठिकाणी विशेष काळजी घेण्याबाबत या कंपन्यांना विशेष ला ठेवावं लागतं.

संशयास्पद संगणकीय हालचाली दर्शवणारी लाइन एक-सहस्त्रांश सेकंदात ‘ब्लॉक’ करून पोलिसांना तसं कळवण्यासाठी ही यंत्रणा सज्ज असावी लागते. दोन वर्षांपूर्वी ‘फिफा’ विश्वचषक फूटबॉल स्पर्धेच्या वेळी ही अनुभूती मिळाली, बरं का.एका नव्या तंत्रज्ञानाचा वापर या स्पर्धेमध्ये केला गेला. या स्पर्धेत वापरण्यात आलेल्या आदिदास टेलस्टार 18 बॉलमध्ये चीप लावण्यात आली. त्या चीपला मोबाईल फोन कनेक्ट करता येईल अशी सोय पण केली गेली. अधिकृत प्रेक्षकांसाठी फॅन आय डी कार्ड निर्माण केली गेली. (ज्यातल्या चिपद्वारे प्रेक्षकांची माहिती साठवली जाऊ शकते.) संकटसमयी याचा वापर केला जाईल. व्हिडिओ असिस्टंट रेफ्री सिस्टीम या तंत्राद्वारे विविध दिशातून (ड्रोन कॅमेर्याद्वारे) चलतचित्रण बघून मॅच रेफ्री खास भूमिका निभावणार होता. गोल, पेनल्टी, फाऊल, रेड कार्ड देणं यासंदर्भात मैदानावरील पंचाने चुका केल्यास तो त्या सुधारू शकतो. 4 के अल्ट्रा हायडेफिनेशन व्हर्च्युअल रिऍलिटी व्हिडीओ तंत्रज्ञान वापरल्याने स्पष्ट हाय रिझोल्युशन चित्रीकरण करता येतं. टीव्ही वा स्मार्टफोनवर सामना बघणार्या प्रेक्षकांचा यासाठी विचार केला गेला.

हे काम बरंच गुंतागुंतीचं, विस्तृत क्षेत्रावर पसरलेलं असल्याने अतिशय जिकिरीचं होतं यात शंकाच नाही. हा पसारा कुशलतेने हाताळण्यासाठी, स्पर्धास्थानाजवळच एक खास संगणक आणि माहिती-तंत्रज्ञान केंद्र उभारलं गेलं. प्रत्येक विभागाचं कंत्राट बाहेरच्या संस्था किंवा कंपन्यांना देण्यात आलं. अशा स्पर्धांच्या काळात इंटरनेटवर खूपच ओझं पडतं. जाता जाता चटकन स्कोअर पाहणार्यांची संख्या तर वाढतेच परंतु सध्या प्रत्येकाच्याच हाती स्मार्टफोन्स दिसू लागल्याने हँडसेटवरून ‘लाइव्ह स्ट्रीमिंग व्हीडिओ’ म्हणजे थेट प्रक्षेपण पाहणार्यांची संख्या विलक्षण वाढते. हे लक्षात घेऊन रशियन सरकारने इंटरनेटची क्षमता वाढवण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलली. प्रथम विशिष्ट मर्यादेपलिकडे ‘डेटा डाउनलोडिंग’वर बंधनं लावण्याचा (डेटा कॅपिंग) विचार झाला. परंतु व्यावहारिक अडचणी आणि ग्राहकांच्या भावनात्मक प्रतिक्रियांचा विचार करून तो सोडून देण्यात आला.

कोणत्याही मॅचच्या शेवटच्या दोन-पाच उत्कंठावर्धक मिनिटांमध्ये खेळ पाहणार्यांची संख्या अचानक हजारो-लाखोंनी वाढत असल्याने थोडाफार घोटाळा अपेक्षितच असतो. परंतु मुळात इंटरनेटची क्षमता वाढवण्याबाबत तसंच शहरामध्ये हजारो नवीन ‘वाय-फाय हॉटस्पॉट’ उभारण्यासाठी ब्रॉडबँड आणि मोबाईल फोन नेटवर्कच्या पुरवठादारांनी सहकार्य केल्यामुळे नेट ‘स्लो’ होण्याची परिस्थिती होणार नाही असा दिलासा आयोजक देतात. आजकाल फुटबॉलच नव्हे तर इतर अनेक खेळ तंत्रज्ञानाची मदत घेताना दिसत आहेत.

सांघिक खेळाप्रमाणेच वैयक्तिक क्रीडाप्रकारातही तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अचूकता मिळवली जात आहे. ऍथलीटच्या पोषाखाशी निगडीत आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक बाबी सूकर झाल्या आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर हायटेक ऍथलीट शुजमुळे सरावातलं सातत्य तसंच एकूण कामगिरीचा अंदाज घेण्यातल्या चुका टाळणं शक्य होऊ शकतं. या शुजद्वारे खेळाडूचा हार्ट रेट समजणं शक्य होतंच. शिवाय, विशिष्ट शूजमध्ये असलेलं ‘झायलीटॉल’ हे रसायन पायांना येणारा घाम नियंत्रित करून पाय थंड आणि कोरडे ठेवण्याचं काम करतं. त्यामुळे खेळ आणि तंत्रज्ञानाची सांगड घालून नियमांना धक्का न लावता उत्तम परफॉर्मन्स देणं शक्य होतं.

जगातल्या प्रत्येक मोठ्या इव्हेंटमध्ये काही तरी वैशिष्ट्य राखण्याचे प्रयत्न संयोजक करतातच. स्वतःची खाजगी रेडिओ प्रक्षेपण केंद्रं आणि यंत्रणा असणारी स्पर्धा म्हणून अलिकडच्या बड्या स्पर्धा प्रसिध्दी पावतात. सर्वसाधारण संवादमाध्यम म्हणून एअरवेव्हने चालवलेलीच रेडिओ यंत्रणा वापरली जाते परंतु संयोजन समितीचं स्वतंत्र नेटवर्क असतं. संगणकीय आणि त्या संबंधित संवादमाध्यमांबाबत थोडी-फार माहिती असणार्यांनी ‘क्लाउड काँप्युटिंग’ हा शब्दप्रयोग ऐकला असेल.

इंटरनेटसंबंधीच्या विविध सोयी-सुविधा आणि त्यासंबंधीची उपकरणं स्वतः विकत न घेता सर्व माहिती आपल्या मालकीच्या एका आभासी ‘स्टोअर रूम’मध्ये ठेवायची आणि हवी तेव्हा वापरायची किंवा शेअर करायची असं या संकल्पनेचं अगदी ढोबळ मानाने वर्णन करता येईल.

सध्या संगणकविश्वात क्लाउड कॉँप्युटिंगची जबरदस्त हवा आहे. मोठ्या प्रमाणात पाच आठवडे चालणार्या या क्रीडा महोत्सवासाठी लाखो पर्यटक, क्रीडारसिक येतात. त्यांच्या दिमतीला त्या प्रमाणात अधिक वाहनं असतात. त्यामुळे वाहतूक व्यवस्थादेखील पूर्ण क्षमतेने वापरली जाणार. एकंदरीत काय, तर कोणताही मोठा इव्हेंट यशस्वी होण्यामागे नवतंत्रज्ञानाचा (आणि त्याचा योग्य वापर करून घेणार्या तंत्रज्ञांचा तसंच प्रशासकांचाही मोठा वाटा असतोच.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com