शाळांना फी वाढ न करण्याचे निर्देश

शाळांना फी वाढ न करण्याचे निर्देश

सार्वमत

मुंबई – करोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळं आर्थिक संकट निर्माण झालेले असताना राज्य सरकारने पालकांना दिलासा दिला आहे. येत्या शैक्षणिक वर्षासाठी फी वाढ न करण्याचे निर्देश राज्य शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. तसे परिपत्रक जारी करण्यात आली आहे.

राज्यात सध्या लॉकडाउन सुरु असल्याने काही शैक्षणिक संस्था पालकांना विद्यार्थ्यांची फी भरण्याची सक्ती करीत आहेत. याबाबत राज्याच्या शिक्षण विभागाकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. या तक्रारांची दखल घेत शासनाने सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना विद्यार्थी आणि पालकांकडून शाळेची चालू वर्षाची व आगामी वर्षाची फी जमा करण्याबाबत सक्ती करु नये, असे निर्देश दिले आहेत.

परिपत्रकात काय म्हटले आहे –
-पालकांच्या सोईसाठी शाळांनी शैक्षणिक वर्ष 2019-20 आणि 2020-21 या काळातील शिल्लक फी एकाच वेळी न घेता मासिक किंवा त्रैमासिक पद्धतीने जमा करण्याचा पर्याय पालकांना उपलब्ध करुन द्यावा.
-शैक्षणिक वर्ष 2020-21साठी कोणतीही फी वाढ करु नये.
-शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी जर काही शैक्षणिक सुविधांचा वापर करावा लागला नाही तसेच त्यासाठीचा खर्च कमी होणार असेल तर पालकांच्या कार्यकारी समितीमध्ये (ईपीटीए) ठराव करुन त्याप्रमाणे योग्य प्रमाणात फी कमी करावी.
-लॉकडाऊनच्या काळात गैरसोय टाळण्यासाठी पालकांना ऑनलाइन फी भरण्याचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा.
-वरील आदेश सर्व बोर्डाच्या, सर्व माध्यमांच्या व पूर्व प्राथमिक ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी लागू असतील.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com