‘निसर्ग’चा नेवाशाच्या काही भागाला फटका; झोपडीसह 10 घरे व 25 एकर केळी पिकाचे नुकसान
Featured

‘निसर्ग’चा नेवाशाच्या काही भागाला फटका; झोपडीसह 10 घरे व 25 एकर केळी पिकाचे नुकसान

Dhananjay Shinde

सार्वमत

नेवासा (तालुका प्रतिनिधी) – बुधवार दि.3 जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा फटका नेवासा तालुक्यालाही बसला असून तालुक्यातील 10 घरे व एका झोपडीसह जवळपास 25 एकर (9.80 हेक्टर) केळी पिकाचे नुकसान झाले आहे.

तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी दिलेल्या माहिती नुसार नेवासा तालुक्यातील काही भागात निसर्ग चक्री वादळाचा प्रभाव दिसून आला. तालुक्यातील वांजोळी, लोहगाव, भेंडा बुद्रुक, वडाळा येथील 10 घरे व एका झोपडीचे वादळाने नुकसान झालेले आहे. त्यात 2 कच्च्या घरांचे 100 टक्के तर 8 पक्क्या घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. त्याचबरोबर सोनई, निंभारी, अंमळनेर व धनगरवाडी येथील साडेचोवीस एकर (9.80 हेक्टर) क्षेत्रातील केळी पिकाचे नुकसान झालेले आहे.

भेंडा बुद्रुक येथे नेवासा-शेवगाव रस्त्यावरील व्यापारी बाजार पेठेतील मोटार सायकल गॅरेज व इतर दुकांनावर वादळाने रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास गुलमोहराचे झाड पडले. झाड पडल्याने दुकानांचे किरकोळ नुकसान झााले आहे. हे झाड अर्धे रस्त्यावर आल्याने ग्रामपंचायत व व्यापार्‍यांनी तातडीने जेसीबीच्या साह्याने बाजूला काढून घेतले. येथे वादळ व पावसाने ऊस पिकाचेही मोठे नुकसान झालेले आहे.

कुकाणा येथील पाटबंधारे वसाहतमधील विश्रामगृहा जवळील झाड जोराच्या वार्‍यामुळे मोडून पडले. त्यामुळे विजेच्या तारा तुटल्या आहेत. या चक्री वादळाने कुठेही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.

ऊस पिकाचेही पंचनामे करावेत…

तीन दिवसांपासून सुरू असलेला वादळी पाऊस व बुधवारी झालेल्या निसर्ग चक्री वादळ यामुळे भेंडा जिल्हा परिषद गटासह संपूर्ण नेवासा तालुक्यात ऊस पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्याकडे केली आहे.
– दत्तात्रय काळे जिल्हा परिषद व नियोजन समिती सदस्य

Deshdoot
www.deshdoot.com