निसर्ग वादळ उद्या धडकणार – सर्वाधिक फटका महाराष्ट्राला ; एनडीआरएफची नऊ पथके तैनात
Featured

निसर्ग वादळ उद्या धडकणार – सर्वाधिक फटका महाराष्ट्राला ; एनडीआरएफची नऊ पथके तैनात

Dhananjay Shinde

सार्वमत

पुणे – अरबी समुद्रात तयार झालेल्या निसर्ग वादळाचा सर्वाधिक फटका मुंबईसह महाराष्ट्राला बसणार आहे. गुजरातसह शेजारील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात नुकसान अधिक होईल, अशी शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. हे वादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर उद्या (2जून) धडकणार आहे.

दरम्यान, या अंदाजाची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. त्यापाठोपाठ सर्व राष्ट्रीय यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची नऊ पथके महाराष्ट्रात पाठवण्यात आली. करोनाच्या संकटाला सामोरे जात असताना राज्या समोर हे नवीन आव्हान उभे राहीले आहे.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकांमध्ये तीन मुंबईत, दोन पालघरमध्ये आणि ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात प्रत्येकी एक पथक पाठवण्यात आले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, निसर्ग वादळ येत्या काही दिवसांत तीव्र स्वरूप धारण करेल. महाराष्ट्राचा उत्तरेकडील किनारा आणि गुजरातमध्ये हे वादळ धडकेल. रायगड जिल्ह्यातील हरीहरेश्‍वर आणि दमण यांच्यामध्ये तीन जून रोजी या वादळाचा फटका बसेल.

हवामान खात्याचे महासंचालक मृत्यूंजय मोहपात्रा म्हणाले, हे वादळ सध्या मुंबईपासून 690 किमीवर आहे. या वादळाने सखल भागात पुराचे पाणी घुसू शकते. वार्‍याच्या वेगामुळे झाडे आणि विजेचे खांब कोसळू शकतात.
महाराष्ट्राच्या किनारावर्ती भागात दोन जूनला जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू होईल. त्याची तीव्रता तीन जूनला अधिक वाढेल. तीन जूनला 20 सेंटीमिटरपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे.

सध्या असणारा कमी दाबाचा पट्टा मंगळवार सकाळपर्यंत वादळात परावर्तीत होईल. त्यामुळे तीन तारखेला सायंकाळी अथवा रात्री तुफान येईल, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले या वादळामुळे 90 ते 105 किमी वेगाने वारे वाहतील असा अंदाज आहे. याबाबत केंद्र आणि राज्य सरकारला सर्तकतेची सूचना देण्यात आली आहे. अरबी समुद्रात वादळाची स्थिती निर्माण झाली आहे. सिंधूदूर्ग, रत्नागिरी, ठाणे, रायगड मुंबई आणि पालघरला या वादळाचा सर्वाधिक फटका बसेल, असा आमचा अंदाज आहे.

दोनशे मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस – निसर्ग वादळ मंगळवारी(2जून) आणि बुधवारी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात फिरकु नये. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वार्‍याचा वेग प्रचंड वाढला आहे. हे वारे केरळात दाखल होण्यापुर्वी याचा वेग 65 ते 70 टक्के राहणार आहे. पण हेच वारे गुजरातकडे जाताना त्याचा वेग 90 ते 100 किमी होऊन त्याचे रूपांतर चक्रीवादळात होईल. या वादळामुळे 204.5 मीमी पर्यंत पाऊस होण्याची शक्यताा हवामान खात्याने वर्तवली आहे.

तब्बल 129 वर्षांनंतर…
1891 नंतर पहिल्यांदाच अरबी समुद्रामध्ये महाराष्ट्राच्या किनारी प्रदेशात चक्रीवादळाची स्थिती तयार झाली आहे. यापूर्वी 1948 आणि 1980 मध्ये दोनदा असा कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. पण त्यावेळी सुदैवाने परिस्थिती बदलल्याने वादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागाला धडकलेनसल्यामुळे मोठे संकट टळले होते. त्यामुळे आता देखील अशीच आशा व्यक्त केली जात आहे की, हे वादळ महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टी भागाला न धडकता पुढे निघून जाईल. मुंबई आणि गुजरात किनारपट्टीच्या भागात वादळाला तोंड देण्यासाठी म्हणावी तशी तयारी नसते. म्हणूनच 48 तासांपेक्षा कमी वेळात या वादळाचा सामना करताना बराच त्रास होण्याची शक्यता आहे. ते देखील अशावेळी की जेव्हा महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यातील प्रशासन हे करोनाशी लढा देण्यात व्यस्त आहे.
अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाच्या पट्ट्याचे जर चक्रीवादळामध्ये रुपांतर झाले तर त्याचे नाव ‘निसारगा’ असे असेल. दरम्यान, या वादळाला अद्याप तरी अधिकृत नाव देण्यात आलेले नाही.

Deshdoot
www.deshdoot.com