निर्मळ पिंपरी नाक्यावरील टोलवसुली थांबवा
Featured

निर्मळ पिंपरी नाक्यावरील टोलवसुली थांबवा

Sarvmat Digital

औरंगाबाद खंडपीठाचे राज्य सरकारला आदेश; महामार्ग दुरूस्तीच्या सूचना

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- नगर मनमाड महामार्गावर कोल्हार-कोपरगाव मार्गावरील निर्मळ पिंपरी नाक्यावर सुरू असलेली टोल वसुली 12 डिसेंबर पासून बंद करावी. दुरवस्था झालेल्या महामार्गाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वतः पूर्ण करावे. येणारा सर्व खर्च सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून वसूल करावा. त्याबाबतचा अहवाल आठ दिवसांत न्यायालयात सादर करावा, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे व न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या पीठाने राज्यशासनाला दिले असल्याची माहिती अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर व अ‍ॅड. अजिक्य काळे यांनी दिली. न्यायालयाच्या या निर्णयाचे याचिकाकर्ते शिवसेना शिर्डी शहरप्रमुख सचिन कोते व शिवसैनिकांनी स्वागत केले आहे.

कोल्हार कोपरगाव दरम्यान नगर-मनमाड महामार्गाची झालेली दुरवस्था व सुरू असलेली टोलवसुली याविरोधात शिवसेनेने आंदोलन छेडले होते. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक अपघात झाले होते. यामध्ये काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. तरीसुद्धा सुप्रीम कंपनी कोल्हार कोपरगाव दरम्यानचा टोल वसूल करीत आहे. रस्त्याची दुरवस्था व पडलेले खड्डे याची सर्वस्वी जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग व सुप्रीम कंपनीची असून त्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. याबाबद शिर्डी शिवसेना शहर प्रमुख सचिन पाराजी कोते यांनी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती.

या याचिकेची सुनावणी सोमवार 9 डिसेंबर रोजी झाली. न्यायमूर्ती प्रसन्न वराळे व न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी नगर मनमाड महामार्गावर कोल्हार कोपरगाव दरम्यान सुरू असलेली टोल वसुली 12 डिसेंबर पासून बंद करावी. दुरवस्था झालेल्या महामार्गाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वतः पुर्ण करावे. येणारा सर्व खर्च सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून वसुल करावा. त्याबाबतचा अहवाल आठ दिवसात न्यायालयात सादर करावा असे आदेश राज्यशासनाला दिले. काही दिवसांपूर्वी खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह शिवसैनिकांनी टोलनाक्यावर आंदोलन केले होते.

न्यायालयाच्या या निकालाचे राहता तालुका शिवसेनेच्या वतीने शिर्डीतील शिवालय कार्यालयाबाहेर फटाके फोडून स्वागत करण्यात आले. हा न्याय सर्व साईभक्तांसाठी समर्पित केला असल्याची भावना सचिन कोते यांनी व्यक्त केली. यावेळी शिवसेना नेते कमलाकर कोते, राहता तालुका प्रमुख संजय शिंदे, राहुल बनकर, उपतालुका प्रमुख अक्षय तळेकर, उपशहरप्रमुख सुयोग सावकारे, शहर संघटक अमोल गायके, विरेश गोंदकर, चंद्रकांत गायकवाड, रविंद्र सोनवणे, जयराम कांदळकर, पुंडलिक बावके, सोमनाथ महाले, मच्छिंद्र गायके, अनिल पवार, महिंद्र कोते, सागर जगताप, हरीराम राहणे, नवनाथ विश्वासराव आदीसह शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर व अ‍ॅड. अजिंक्य काळे यांनी काम पाहीले.

सदर याचिकेबाबत आमच्याकडे कोणतीही माहिती नसून आजपर्यंत आम्हाला न्यायालयाच्यावतीने अथवा याचिकाकर्त्यांच्यावतीने कोणतीही नोटीस देण्यात आली नाही. आम्हाला सदर प्रकरण सोशल मीडियाच्या माध्यमातून माहित झाले असून याप्रकरणी आम्ही न्यायालयात आमची बाजू मांडणार आहोत.
– जहिर शेख, महाव्यवस्थापक सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com