नेवासा तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरुच
Featured

नेवासा तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरुच

Sarvmat Digital

स्थानिक गुन्हे शाखा करते काय ? नागरिकांचा सवाल

नेवासा (तालुका प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असताना छोट्या मोठ्या धाडी टाकून मोठ्या-मोठ्या कारवाया केल्याचा आव आणणारी जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) आहे कुठे आहे? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

गेल्या अनेक महिन्यापासून नेवासा तालुक्यातील सर्वच गावांसह भेंडा-कुकाणा परिसरात मंदिरातील दानपेट्या फोडणे, शेतकर्‍यांच्या केबल, स्टार्टर आणि विहिरीतील पाणबुडी पंप चोरी, दुचाकी मोटारसायकल,चारचाकी वाहने चोरी, मोबाईल शॉपी, सराफ दुकाने, किराणा दुकाने फोडण्याचा चोरांनी उच्छाद मांडला आहे. दोन महिन्यात 100 हून अधिक शेतकर्‍याच्या मोटारी, केबल चोरी गेले आहेत. कुकाणा येथील अभिजित लुनिया यांच्या चारचाकी गाड्यांची चोरीचाही अद्याप तपास नाही.

चार वर्षांपूर्वी आणि दुसर्‍यांदा याच नोव्हेंबर महिन्यात पुन्हा नागेबाबा मंदिर दानपेटीच्या चोरीचाही अद्याप तपास नाही. यामुळे पोलिसांच्या भूमिकेकडे जनता संशयाने पहात आहे. भेंडा परिसरात दोन महिन्यांपासून चोरट्यांनी धुमाकुळ घातलेला असताना छोट्या-मोठ्या धाडी टाकून मोठ्या-मोठ्या कारवाया केल्याचा आव आणणारी एलसीबी आहे कुठे? असा सवाल भेंडा शेतकर्‍यांनी उपस्थित केला आहे.

असा आहे एलसीबीचा उद्योग…!
जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे नियंत्रणाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) नावाचे एक विशेष पथक आहे. यासाठी एक स्वतंत्र पोलीस निरीक्षक व स्वतंत्र पोलीस कर्मचार्‍यांचा फौजफाटा तैनात आहे. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचार्‍यांवर बंदोबस्त, गुन्ह्यांचा तपास, कोर्ट समन्स यासारखी एक ना अनेक कामे असतात त्यामुळे गुन्ह्याचे तपासाकडे दुर्लक्ष होते. मात्र एलसीबी ही एक स्वतंत्र यंत्रणा असल्याने जिल्हातील गुन्ह्यांचा तपास एलसीबीने लावणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात जनतेला एलसीबीचा वेगळाच अनुभव असल्याचे दिसून येते. गुन्ह्याच्या तपास आणि चौकशीच्या नावाखाली कोणालाही उचलून गाडीत घालायचे आणि धमकावयाचे आणि खरे गुन्हेगारांकडे दुर्लक्ष करायचे असे काम सध्या एलसीबीचे सुरू असल्याची माहिती आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांनी यात लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com