नेहरू मार्केटचे बांधकाम तातडीने करावे
Featured

नेहरू मार्केटचे बांधकाम तातडीने करावे

Sarvmat Digital

भाजी विक्रेते संघटना व बचाव कृती समितीचे निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी) – नऊ वर्षांपूर्वी पाडलेले नगरमधील नेहरू मार्केट अत्याधुनिक पद्धतीने उभारून गाळेधारक व ओटेधारकांची व्यवस्था करण्याच्या मागणीसाठी चितळे रोड हातगाडी व भाजी विक्रेता संघटना आणि नेहरू मार्केट बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांना निवेदन दिले. यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार असल्याचे द्विवेदी यांनी शिष्टमंडळास सांगितले.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय झिंजे, कृती समितीचे अध्यक्ष वसंत लोढा, नगरसेवक दत्ता कावरे, सामाजिक कार्यकर्ते शाकिर शेख, शरद मडुर, सोमनाथ चिंतामणी, श्रीदेवी अरोगोंडा, अनीस शेख, राजेंद्र राऊत, अदिनाथ गिरमे, मुन्ना बागवान, भागचंद कोकाटे, रामा केळकर यांच्यासह नेहरू मार्केटचे गाळेधारक व ओटेधारक उपस्थित होते.

2010 मध्ये चांगल्या अवस्थेत असलेले नेहरू मार्केट जमीनदोस्त करण्यात आले. नेहरू मार्केट पाडताना पुन्हा त्या जागेवर भाजी मार्केट व शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु गेल्या नऊ वर्षामध्ये नेहरू मार्केटच्या उभारणीचे काम सुरू झाले नाही. नेहरू मार्केटच्या उभारणीसाठी दोन्ही संघटनांनी वारंवार आंदोलने, निवेदन देऊन शासनस्तरावर पाठपुरावा केला.

2013 मध्ये झालेल्या आंदोलनात तत्कालीन पालकमंत्री, आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. यावर अद्याप कार्यवाही झालेली नसून, नाईलाजास्तव नेहरू मार्केटचे गाळेधारक व ओटेधारकांना रस्त्यावर भाजी विक्रीस बसावे लागत आहे. दिल्लीगेट ते नेता सुभाष चौक दरम्यान वाहतुकीची मोठी कोंडी होत असून, नेहरू मार्केट उभारून भाजी विक्रेत्यांचा प्रश्न सोडविल्यास हा रस्ता मोकळा होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

शिष्टमंडळाने नेहरू मार्केटचा संपूर्ण इतिहास सांगून, शासन नेहरू मार्केट उभारणीसाठी अनुदान देत नाही. महापालिकेकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याचे जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावर जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी नेहरू मार्केटचे काम खाजगीकरणातून पूर्ण केले जाऊ शकत असल्याचे स्पष्ट करीत यासाठी लवकरच निविदा काढण्याचे आश्वासन दिले. ताबडतोब नेहरू मार्केट उभारणीबाबत कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com