‘तब्लीग’ची किंमत मोजावी लागतेय, पुन्हा असे घडू नये याची काळजी घ्या – शरद पवार
Featured

‘तब्लीग’ची किंमत मोजावी लागतेय, पुन्हा असे घडू नये याची काळजी घ्या – शरद पवार

Dhananjay Shinde

मुंबई – जगभर कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये झालेल्या तब्लीग-ए-जमातच्या कार्यक्रमात राज्यातील हजारो लोक सहभागी झाले होते यातून काही लोकांनी कदाचित कोरोना रोगाला बरोबर घेवून प्रवास केल्याचे नाकारता येत नाही. त्यामुळे त्यानंतर हा रोग फैलावतो की काय असे चित्र दिसत आहे. असे काही समारंभ असतात त्यामध्ये अनेक लोकांचा सहभाग असतो परंतु आजची परिस्थिती लक्षात घेता पथ्य पाळली पाहिजेत मात्र तब्लिगीने हे पथ्य पाळले नाही त्यामुळे याची किंमत मोजावी लागत आहे अशी भीती व्यक्त करतानाच पुन्हा असं घडता कामा नये याची काळजी घ्या असे आवाहनही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी केले.

त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिसर्‍यांदा देशातील जनतेशी संवाद साधला आणि रामनवमीच्या शुभेच्छा देताना कोरोना रोगाच्या विरोधात लढण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. 8 एप्रिल 2020 रोजी मुस्लिम बांधवांचा कब्रस्तानमध्ये एकत्रित जावून हयात नसलेल्या नातेवाईकांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. मात्र हे स्मरण घरात बसूनच करा. नमाजही घरातच बसून करा. ही वेळ किंवा प्रसंग एकत्रित बाहेर जाण्याचा नाही. त्यामुळे निजामुद्दीनमध्ये जे घडले ते घडू देवू नका याची खबरदारी घ्या असे सांगतानाच 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण श्रध्देने करण्याचा दिवस आहे. देशभरातून लोक एकत्र येत असतात आणि हा सोहळा दीड महिना चालतो. यावेळेला हा सोहळा साजरा करायचा हा प्रसंग आहे का? हा सोहळा पुढे न्यायचा विचार शक्य आहे का? हे गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. सामुदायिक एकत्र आलो तर नवीन संकटाला सामोरे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाबासाहेबांचे स्मरण करुया. त्यांच्या योगदानाची आठवण ठेवून या सोहळ्यात बदल करण्याचा जाणकारांनी विचार करावा असे आवाहन शरद पवार यांनी यावेळी केले.

अजून लोक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे कोरोना रोगाचे रुग्ण वाढत आहेत. दैनंदिन गरजा असतात. त्यामध्ये भाजीपाला, धान्य याची गरज आहे. परंतु याची कमतरता नाही असे सरकारकडून सांगण्यात आले होते. शिवाय किराणा दुकाने 24 तास उघडी ठेवली आहेत. मात्र त्याच्या वेळा ठरवाव्यात. परंतु धान्य मिळणारच नाही ही भूमिका घेवून गर्दी किंवा साठेबाजी करु नका असे आवाहन शरद पवार यांनी केले.

सरकारने व पोलीस, आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन तंतोतंत करावे. मात्र त्याची अंमलबजावणी काहीजण करत नाहीत. त्यामुळे पोलिसांना कारवाई करावी लागते आणि त्यामुळे पोलिसांसोबत संघर्ष होतो आहे हे योग्य नाही. ते टाळूया. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, नर्सेस व पोलीस दलाचे लोक धोका पत्करुन अहोरात्र मेहनत करत आहेत त्यांचा सन्मान करा. त्यांना पुर्णपणे सहकार्य करा. पोलिसांसोबत वादविवाद नकोत असे सांगतानाच जे वैद्यकीय क्षेत्रातील लोक ओपीडी किंवा दवाखाने बंद करुन आहेत त्यांनी तसे करु नये लोकांना सुविधा द्या अशा सूचनाही शरद पवार यांनी दिल्या.

तरुणांना वाचन करण्याचा सल्ला – तरुणांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. दहा दिवस झाले, दोन आठवडे झाले. लॉकडाऊन वाढेल की काय. परंतु मी कालपासून गीत रामायण ऐकतोय. गदीमा आणि सुधीर फडके यांचं संगीत ऐकल्यावर मनापासून समाधान मिळत आहे. नव्या पिढीने वाचन संस्कृती जतन व वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवा. मराठीत अनेक पुस्तके वाचनीय आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनदर्शन, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परिवर्तन लिखाण, विठ्ठलराव शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख, यशवंतराव चव्हाण, या महान व्यक्तींचे जीवनदर्शन लिखाण वाचा. वैज्ञानिक दृष्टिकोन मजबूत होईल यावर आधारित लिखाण वाचन करा. आपला व्यक्तीगत ज्ञानसाठा वाढविण्यासाठी प्रयत्न करावा. सतत वाचा, ज्ञानसंपादीत सुसंवाद ठेवा. सुट्टीच्या कालावधीचा आस्वाद घ्या आणि स्वतःचं व्यक्तीमत्व घडवण्याचा प्रयत्न करा असा मोलाचा सल्लाही शरद पवार यांनी दिला.

Deshdoot
www.deshdoot.com