राज्याच्या सत्तेत नगर जिल्ह्याचा वाटा मोठा
Featured

राज्याच्या सत्तेत नगर जिल्ह्याचा वाटा मोठा

Sarvmat Digital

अंकुश काकडे : राष्ट्रवादीच्या नूतन आमदारांचा सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन सहा आमदारांचा सोमवारी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्याच्या विधानसभेत नगर जिल्ह्यातून निवडून गेलेले सहाही आमदार सर्वात तरुण असून राज्याच्या सत्तेत नगरचा वाटा मोठा असल्याचे प्रतिपादन पक्षाचे निरिक्षक अंकुश काकडे यांनी केले.

नगरला राष्ट्रवादीभवनमध्ये आयोजित सत्कार समारंभात काकडे बोलत होते. जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी प्रस्ताविक केले. जिल्ह्यात पक्ष स्थापनेपासून एवढ्या मोठ्या प्रमाणात पक्षाला यश मिळाले नसल्याचे त्यांनी नमूद केले. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे आतापासून सर्वांनी एकत्र काम केल्यास येणार्‍या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड यांनी पक्षाने जिल्ह्यातील यशाची दखल घ्यावी तर जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी उत्तर जिल्ह्यात पक्षाचे नेहमी कमी ताकद लेखली गेलेली आहे. मात्र, आता खर्‍याअर्थाने उत्तेरीत कार्यकर्त्यांना सत्तेच्या माध्यमातून संधी द्यावी, अशी मागणी केली.

सत्काराला उत्तर देतांना आ. प्राजक्त तनपुरे म्हणाले, निवडणुकीच्या आधी मी शांत होतो ही एक राजकीय खेळी होती. लोकसभेच्या निकालानंतर सर्वांनाच नैराश्य आले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत काही राजकीय डाव टाकले. त्यामुळे विजय सुकर झाला. यासाठी राहुरी, पाथर्डीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. आ. आशुतोष काळे यांनी निवडणुकीपूर्वी आजारपण आणि अन्य कारणामुळे फार फिरता आले नाही. मात्र, कार्यकर्ते प्रचंड फिरत होते. कोपरगाव मतदारसंघात खूप संघर्ष करावा लागला. उमेदवारांची संख्या वाढल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आणि अटीतटीच्या लढतीत विजय मिळाल्याचे सांगितले. आ. संग्राम जगताप यांनी आज पक्षाचे सहा आमदार आहेत, उद्या दहा आणि त्यानंतर 12 ही होतील. त्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करावे. शहरातील अनेक कामे मार्गी लावायचे असून सीना सुशोभिकरणासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.

आ. नीलेश लंके यांनी तालुक्यातील सर्व सत्ता ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून सामान्य माणसांनी स्वत:च्या औषध उपचाराचे पैसे निवडणुकीसाठी वर्गणी म्हणून दिले. यामुळेच विजय संपादन करता आला. सत्ता स्थापन झाल्यानंतर सभागृहाबाहेर आल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साहेब तुम्ही शिवसेनेतून मला काढून टाकले पण माझ्याच मताने तुमचे सरकार आले असल्याचे त्यांना सांगितल्याचा अनुभव सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.

आ. किरण लहामटे यांनी जिल्ह्यात 12 विरुध्द शून्यचे उलटे झाले. याचे श्रेय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाच आहे. विधानसभेसाठी मी स्वत:हून उमेदवारी मागितली नाही. पण पक्षाने मला उमदेवारी देऊन ताकद दिली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी मतदारांनी एक लाख 10 हजार रुपयांची मदत मला झोळी करून दान म्हणून दिली. यापूढे पाच वर्षात राज्यातील 65 आदिवासी मतदारसंघात राष्ट्रवादी विस्तारासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

निरीक्षक काकडे यांनी पाच वर्षातील भाजपची जुलमी राजवट उलथविण्यात नगर जिल्ह्याचा वाटा मोठा आहे. मात्र, या विजयाचे श्रेय ऐकट्या शरद पवार यांनाच आहे. ज्यांनी पवारांना अडचणीच्या काळात पाठ दाखविली. त्यांना मतदारांनी निवडणुकीत पाठ दाखविली. यापुढील काळात जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करण्यात येतील. यासाठी पक्षाचे नेते ध्येय धोरण ठरवतील. पक्षाला अडचण असतांना पक्षाच्या मागे तन-मन आणि धनाने उभे राहण्याचे आवाहन काकडे यांनी यावेळी केले.

सत्कारार्थी आमदारांचे उशिरा आगमन
हा सत्कार समारंभ दुपारी 12 वाजता सुरू होणार होता. मात्र, सत्कार करण्यात येणार्‍या आमदारांना येण्यास उशीर झाला. सर्वात प्रथम आ. प्राजक्त तनपुरे आले. त्यानंतर आ. आशुतोष काळे, मग आ. संग्राम जगताप, त्यानंतर आ. नीलेश लंके आणि शेवटी कार्यक्रम अर्धा संपल्यावर आमदार किरण लहामटे आले. यामुळे कार्यक्रम रेंगाळला.

नगर शहराची ओळख निर्माण करा
सत्कार समारंभात आमदार दिलीप वळसे यांनी नगर शहराची ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी शहरातील ऐतिहासिक संदर्भ असणार्‍या भुईकोट किल्ल्याचा विकास करावा. त्याच सोबत नगर शहराचा विकास करताना रस्ते, स्वच्छतेवर भर द्यावा, जेणे करून पर्यटकांना या ठिकाणी आकर्षित करण्यात येऊन नगर शहराची ओळख निर्माण होईल, असे सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com