बोगस मतदानाला बसणार आळा; मोबाईल नंबर जोडणार मतदार नोंदणी क्रमांकास
Featured

बोगस मतदानाला बसणार आळा; मोबाईल नंबर जोडणार मतदार नोंदणी क्रमांकास

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

नाशिक । प्रतिनिधी

राष्ट्रीय मतदार पडताळणी मोहिमेअंतर्गत देशभरात मतदारांची घरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. बीएलओवर या मोहीमेची जबाबदारी आहे. मतदारांचे मोबाईल नंबर, आधार, पॅनकार्ड, जन्मदाखल्यांसह अत्यावश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करत पडताळणी करावी लागणार आहे. त्यामुळे भविष्यात बोगस मतदानाला आळा बसेल. बीएलओंच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी 10 बीएलओंमागे एक सुपरवायझर नेमण्यात आला आहे.

मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रमाअंतर्गत दुबार, स्थलांतरीत, मृत्यू झालेल्या मतदारांची नावे कमी करणे, अठरा वर्ष पूर्ण झालेल्या नवमतदाराच्या नावांचा समावेश केला जात आहे. काही ठिकाणी बोगस नोंदणी केली जाते. त्यामुळे आयोगाने या सर्वच बाबींवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु केले आहे. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून आता प्रत्येक मतदारांचा मोबाईल नंबर त्याच्या मतदार नोंदणी क्रमांकास जोडला जाणार आहे. त्यावरच त्याला मॅसेजही दिले जातील. त्यामुळे एक व्यक्ती एकच ठिकाणी आपले नाव नोंदवू शकेल.

एका नंबरला एकच खाते उघडता येईल. त्याचे लॉगीन आयडी, पासवर्डही त्याला तयार करावे लागेल. त्यावरच वन टाईम पासवर्ड (ओटीपी) येईल. त्यानंतर त्याला लॉगींन करता येईल. त्यामुळे एकापेक्षा जास्त नावांना हा नंबर वापरता येणार नाही. आयोगाने सुरु केलेल्या या उपक्रमात सर्वच मतदारांनी स्वत:हून पुढे येत पडताळणी करुन घेण्याचे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.

मतदार पडताळणीचा सुरु करण्यात आलेल्या मोहीमेंतर्गत बीएलओंनी प्रत्येक घरी जाऊन प्रत्येक मतदाराची पडताळणी करावयाची आहे. शिवाय आयोगाने ठरवून दिलेल्या फॉरमॅटमध्ये त्यांची माहिती भरुन नंतर कुटुंब प्रमुखांची स्वाक्षरी घेणे बंधनकारक केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com