Thursday, April 25, 2024
Homeनगरपुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर वर्षभरात 58 ठार

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर वर्षभरात 58 ठार

घारगाव (वार्ताहर) – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची संख्या वाढत असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा वर्षभरात 55 अपघातांत 58 जणांचा मृत्यू झाला आहे. अतिवेग, नियम धुडकावण्याच्या वाढत्या प्रकारांमुळे गंभीर स्वरूपांच्या अपघातात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे निरीक्षण महामार्ग पोलिसांनी व्यक्त केले आहे. मात्र अपघातांच्या संख्येत गतवर्षाच्या तुलनेत वाढ झाल्याने प्रवाशांमध्ये अक्षरशः घबराट पसरली आहे.

संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाची लांबी कर्‍हेघाट ते आळेखिंड दरम्यान 64 किलोमीटर आहे. महामार्गावर होणारे बहुतांश अपघात मानवी चुकांमुळे होत आहेत. नियम धुडकावणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे तसेच भरवेगामुळे गंभीर स्वरूपाचे अपघात होत आहेत. गतवर्षाच्या तुलनेत मार्गावर अपघातांची संख्या 2019 मध्ये वाढली असून वेगामुळे बहुतांश अपघात झाले आहेत. गेल्या वर्षी 2018 मध्ये पुणे-नाशिक महामार्गावर 71 अपघात झाले.

- Advertisement -

त्यापैकी 43 प्राणांतिक अपघात झाले असून या अपघातात 45 जणांचा मृत्यू झाला. यंदा डिसेंबर महिना अखेरीपर्यंत 116 अपघात झाले. त्यापैकी 55 प्राणांतिक अपघातात 58 जणांना प्राण गमावावे लागले आहेत, अशी माहिती डोळासणे महामार्ग पोलीस निरीक्षक भालचंद्र शिंदे यांनी दिली. बहुतांश अपघात हे नियमांची पायमल्ली करण्यात आल्याने घडले आहेत.

वेगाची मर्यादा न राखणे हेही त्यातील एक कारण आहे. दरम्यान महामार्ग प्रशासनाकडून अपघाताची ठिकाणे व अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना अद्यापही करण्यात आल्या नाहीत. वाहनधारकांना महामार्गावर आवश्यक त्या सोयीसुविधा दिल्या जात नाही. मात्र दुसरीकडे टोल नित्यनियमाने वसूल केला जात आहे.

सर्वाधिक अपघात आंबीफाट्यावरील गतिरोधकामुळे…
पुणे-नाशिक महामार्गावर स्थानिकांच्या मागणीनंतर आंबीखालसा फाट्यावर उताराला गतिरोधक टाकण्यात आला. मात्र बर्‍याच वाहन चालकांना त्याचा अंदाज येत नसल्याने नित्याने अपघात होत आहे. वर्षभरात सर्वाधिक अपघात आंबीखालसा फाट्यावर झाले आहेत. गतिरोधाकाची उंची कमी करून उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशी वारंवार करीत आहे. मात्र महामार्ग प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.

पुणे-नाशिक महामार्गावर चौपदरीकरणाचे काम निकृष्ट
पुणे नाशिक महामार्गावरील सिन्नर-खेड महामार्ग वाहतुकीसाठी फेब्रवारी 2017 मध्ये खुला करण्यात आला. मात्र महामार्गावर बर्‍याच ठिकाणी अद्यापही कामे अपूर्ण आहेत. काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराने घाई गडबड केल्याने रस्त्याचे काम पाहिजे तसे झाले नाही. त्यामुळे आता बर्‍याच ठिकाणी रस्ता उखडला असून बर्‍याच ठिकाणी खड्डे पडले आहेत.

भाविकांची सतत वर्दळ..
पुणे नाशिक महामार्गावर शिर्डीला जाणार्‍या भाविकांसह देहू, आळंदीला जाणार्‍या लाखो भाविकांची पायी वर्दळ असते. भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असली तरी महामार्ग प्रशासनाकडून उपाययोजनांचा अभाव पाहावयास मिळतो.

पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील अपघात
वर्षनिहाय…अपघाताची संख्या-मृत्यू-गंभीर जखमी
2018-71-43-61
2019-116-58-58
(आकडेवारी जानेवारी ते 22 डिसेंबर 2019)

- Advertisment -

ताज्या बातम्या