Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकसुरगाणा तालुक्यात पाणीटंचाईचे संकट

सुरगाणा तालुक्यात पाणीटंचाईचे संकट

बाऱ्हे वार्ताहर | रवी गावित

कोरोनाचा संसर्ग वाढत असतांनाच दुसरीकडे आदिवासी पाड्यांवर पाणी टंचाई ने त्रस्त केले आहे. टाळेबंदीमुळे शहराच्या विकासाची गती खुंटली असतांना गावगाडा ही थांबला. टाळेबंदीमुळे हाताला काम नसल्याने अनेकांनी गावाचा रस्ता धरला. गावातही कोणाच्या हाताला काम नाही अशी स्थिती आहे . त्यात आतापासूनच सुरगाणा तालुक्यात पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisement -

डोंगर माथ्यावरील घाट, चढ-उतार करत हंडाभर पाणी आणण्यासाठी कसरत करावी लागत आहे. गावापासून बाहेर एक दोन किलोमीटर बाहेर ऐंशी नव्वद फूट खोल विहिरीत रात्री बेरात्री उतरून तळाशी गेलेले पाणी काढण्यासाठी कसरत करावी लागते. कुटूंबातील चिमुकल्यापासून वयस्कर मंडळी विहीरीवर जमा होतात. पाण्यासाठी चडाओढीमध्ये सामाजिक अंतराचा विसर पडतो. घोटभर पाण्यासाठी तालुक्यात लढाई सुरू झाली आहे.

सुरगाणा तालुक्यातील म्हैसमाळ, गळवड, शिरीषपाडा, पांगारने, ठाणगाव, भेनशेत, देवळा, दांडीचीबारी आदी गावामध्ये पाणीप्रश्न भेडसावत आहे. काही गावात विहिरीत गढूळ पाणी असल्याने तेच स्वयंपासाठी व अन्य कामासाठी वापरण्यात येत आहे. असल्या स्थितीत हात धुण्यासाठी पाणी का वाया घालवायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. गढूळ पाण्याने उलट्या होतात. काही वेळा मळमळ होते. आरोग्याच्या तक्रारी येत आहेत. असा काही त्रास सुरू झाला की कोरोनाच्या भीतीने लोक घाबरून जातात.

मागच्या वर्षी ‘प्रोजेक्ट थर्स्ट’ या माहितीपट द्वारे विपुल सिंह तापस यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. या गंभीर पाणीप्रश्नाकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. याची तातडीने दखल घेऊन प्रशासनाने या गावांना टँकरने पाणीपुरवठा व्हावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

सुरगाणा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई मुळे नागरिक हैराण झाले आहेत. रात्री बेरात्री एक दोन किमी अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. अनेक गावांमध्ये मार्च महिन्यापासूनच पाणीटंचाईला सुरवात झाली आहे. आणि या मे महिन्यात परिस्थिती अजूनही गंभीर होणार आहे.
– एकनाथ जोगारे, सामाजिक कार्यकर्ते

मे महिन्याला सुरवात झाल्याने सुरगाणा तालुक्यात पाणीटंचाई अधिकच गंभीर होत आहे. पावसाळ्यात चारही महिने तालुक्यातील नद्या, ओढे दुथडी भरून वाहत असतात परंतु या नद्यांचे पाणी अडवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे धरण नाही, मोठे तलाव नाही त्यामुळे पाणीटंचाई जास्त प्रमाणात असते. नद्यांवर सिमेंट प्लग बंधारे बांधण्याची आवश्यकता आहे.
– प्रभास पवार, देवळा ता.सुरगाणा

- Advertisment -

ताज्या बातम्या