तेजस पुरस्कार मुलाखत :  या मातीत माणूस घडवण्याची ताकद- युगंधर तुपे
Featured

तेजस पुरस्कार मुलाखत : या मातीत माणूस घडवण्याची ताकद- युगंधर तुपे

Abhay Puntambekar

नाशिक | प्रतिनिधी 

‘सौरयुथ’ एंटरप्राईज आणि ‘सौरयुथ’ एलएलपीचे संस्थापक आणि संचालक,
सौर प्रकल्पांच्या उभारणीत भरीव योगदान,
सात राज्यांमध्ये विविध प्रकल्पांचे काम सुरू,
सामाजिक कामांमध्ये कायम पुढाकार.

माझे चौथीपर्यंतचे शिक्षण नाशिकच्या मनपा शाळेत झाले. पुढे आदर्श विद्यालयात शिकलो. लहानपणापासून आर्मीत जायचे हेच स्वप्न होते. कारण माझे वडील लष्करात होते. मग त्याच दिशेने वाटचाल सुरू केली. त्यासाठी वाचन, खेळ, नेतृत्वगुण याकडे विशेष लक्ष दिले. अभ्यासातही नेहमीच पहिला असायचो. सोबतच खो-खो, कबड्डी, मार्शल आर्ट, बॉक्सिंग, बास्केटबॉल अशा वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात यश मिळवले. पुढे लष्करासाठी तयारी करत असताना के. के. वाघ कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगही सुरू केले. जेणेकरून स्वत:कडे एक पर्याय उपलब्ध असेल. पुढे एनडीए आणि आयएमए यासाठी प्रयत्न केले. पण अगदी शेवटच्या टप्प्यात अपयश आले. मग युपीएससीची तयारी सुरू केली. यासाठी चंदिगडला जाऊन अभ्यासही सुरू केला. मात्र जे काही करायचे आहे ते हे नाही, असे जाणवले. सरकारी नोकरीच्या बंधनात मुळीच अडकायचे नव्हते. त्यावेळी मी आणि माझा मित्र असे आम्ही दोघे सुमारे सहा महिने देशभर फिरलो. त्यावेळी लक्षात आले की, ऊर्जा, प्लॅस्टिकचा पुनर्वापर, इ- वेस्ट डंपिंग या क्षेत्रात काम करू शकतो.

तेव्हा माझे वय अवघे २१ वर्षे होते. या वयात मध्यवर्गीय तरुणांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल उभे करणे हे सर्वात मोठे आव्हान होते. पण आम्ही धाडस केले. २००६ च्या फेब्रुवारीमध्ये तिघा मित्रांनी एकत्र येऊन ऊर्जेच्या क्षेत्रात काम करण्यासाठी ‘सौरयुथ’ची स्थापना केली. मात्र अवघ्या काही महिन्यांत दोघा मित्रांनी माघार घेतल्यानंतर ‘एकला चलो रे चा’ नारा देत पक्का विचार करून मी ‘सौरयुथ’ पुढे नेण्याचे ठरवले. पहिल्या सहा महिन्यांत कुठलाच प्रकल्प मिळाला नाही. त्यानंतर एका पेट्रोलपंपाचे काम मिळाले. त्याचे महिन्याचे विजेचे बिल 25 हजार रुपये येत होते. तिथे सोलर युनिट उभे करून विजेची निर्मिती केल्यानंतर विजेचे बिल अवघे एक हजारावर आणले. हा प्रोजेक्ट केला तरी मी काही पूर्णपणे उद्योजक मुळीच बनलो नव्हतो. त्यानंतर रोटरी क्लब पुणे यांच्याकडून कासारी येथे जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी वीज निर्मितीचे काम केले. भारनियमनामुळे शाळा भरत नव्हती. मात्र आमच्या सोलर प्रोजेक्टमुळे वीज आली. त्यावेळी मुलांच्या चेहर्‍यावरील आनंदाने खूप शक्ती दिली.

आपल्या कामातून दुसर्‍याला आनंद मिळत असेल तर ते काम नक्कीच करायला हवे हा विचार मनात आणखीन पक्का झाला. मग खर्‍या अर्थाने पूर्ण शक्तीने कामाला सुरुवात केली. त्यानंतर वेगवेगळे प्रकल्प मिळत गेले. यापैकी सोमा विनयार्ड, के. जे. सोमय्या एज्युकेशन ट्रस्ट, संजय गांधी नॅशनल पार्क, लाईफकेअर हॉस्पिटल हे काही उल्लेखनीय प्रकल्प आहेत. याशिवाय सरकरासोबतसुद्धा सौरऊर्जेच्या विविध प्रकल्पांवर काम केले आहे. सध्या महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांत काम सुरू आहे. सोबतच काही निवासी आणि व्यावसायिक संकुले, औद्योगिक वसाहती, हॉटेल्स, प्रतिष्ठाने, शाळा, महाविद्यालये अशा विविध ठिकाणी प्रकल्प उभारले आहेत. चार वर्षांत उभारलेल्या प्रकल्पांमधून सुमारे ११९३ केव्हीची ऊर्जानिर्मिती करण्यात आली असून यामुळे सुमारे ४० हजार झाडांची कत्तल रोखली आहे.

मुळात व्यवसाय सुरू करताना तो असाच करायचा होता ज्यात देशाचा विकाससुद्धा साधला जाईल. त्यामुळे उद्योगाचा विस्तार करत असताना वेळोवेळी सामाजिक जबाबदारीसुद्धा पार पडली आहे. दिलासा वृद्धाश्रम, दिंडोरीतील दिव्यांगांसाठी असलेल्या जलाराम निवासी शाळा यांना मदत केली. ‘प्रयास’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात संगणक साक्षरतेचे काम हाती घेतले आहे. कॉलेजमध्ये ग्रामस्वच्छता, महिला सक्षमीकरण यासाठीही काम केले आहे.

या वाटचालीत माझ्या आई-वडिलांनी नेहमीच प्रोत्साहित केले. मोठा भाऊ चेतन माझा गुरू आहे. मला सगळ्यांना सांगावेसे वाटत की, या मातीमध्ये माणूस घडवण्याची मोठी ताकद आहे. त्यामुळे फक्त प्रयत्न करा, यश नक्की मिळेल. आयुष्यात ज्या काही समस्या, प्रश्न असतील तर ते सांगा. त्यावर बोला, संवाद साधा, मार्ग सापडतो. सोबतच भरपूर वाचा. त्यामधून खूप ताकद मिळते.

Deshdoot
www.deshdoot.com