तेजस पुरस्कार मुलाखत : आवडीचे क्षेत्र असेल तर प्रगतीचा वेग अफाट- प्रवीण कमळे
Featured

तेजस पुरस्कार मुलाखत : आवडीचे क्षेत्र असेल तर प्रगतीचा वेग अफाट- प्रवीण कमळे

Abhay Puntambekar

नाशिक | प्रतिनिधी 

शुन्यातून व्यवसायाची उभारणी,
केटरिंगपासून इव्हेंट मॅनेजमेंटकडे वाटचाल,
परदेशीही अनेक इव्हेंटचे आयोजन,
आवडीचे क्षेत्र असेल तर प्रगतीचा वेग अफाट.

मी मूळ नाशिकचाच. हॉटेल मॅनेजमेंट या विषयात माझे शिक्षण झाले आहे. ही पदवी मी पंचवटी महाविद्यालयातून घेतली.
खरेतर हॉटेल मॅनेजमेंटकडे मी कसा वळलो त्याची एक कथाच आहे. माझे वडील त्याकाळात हातगाडीवर भाजीपाला विकायचे. नंतर ते हॉटेलला भाजीपाला पुरवायला लागले. एकदा त्यांनी क्वालिटी इनचे जनरल मॅनेजर भट्टाचार्य यांना विचारले, माझ्या मुलाला मी काय शिकवू? ते म्हणाले, मुलाला घेऊन ये, त्याच्याशी बोलतो आणि मग तुम्हाला सांगतो. मी त्यांना भेटायला गेलो. तेव्हाच खरे तर मी त्या हॉटेलचा तामझाम पाहून भारावून गेलो होतो. भट्टाचार्य सरांनी सांगितले, तू हॉटेल मॅनेजमेंट कर. खूप स्कोप आहे.

मग मी हॉटेल मॅनेजमेंट केले. बरीचशी मुले हॉटेल मॅनेजमेंट केल्यावर केटरिंगकडे वळतात. मीही तेच केले, पण नंतर असे होऊ लागले की, लोक मलाच सांगू लागले की तू केटरिंग बघतो आहेच ना मग आमच्या हॉलचे पण बघ, फुलवालेही तूच बघ, त्यांच्याकडून सजावटही तूच करून घे. हळूहळू केटरिंगबरोबर मी अशी सगळीच काम सुरू केली. त्यातूनच इव्हेंट मॅनेजमेंटची बीजे रोवली गेली. कारण पुढे पुढे मी संपूर्ण कार्यक्रम मॅनेज करून द्यायला लागलो आणि तिथूनच खरी सुरुवात झाली माझ्या इव्हेंट मॅनेजमेंटला. काहीवेळा कामे सहज मिळत गेली, परंतु बर्‍याच वेळा लोकांना मनवायला लागायचे. कारण बर्‍याच लोकांना तेव्हा इव्हेंट मॅनेजमेंट हा फालतू खर्च वाटायचा, परंतु मी लोकांना समजून घेऊ लागलो, त्यांना समजावून द्यायला लागलो की तुमच्या बजेटपेक्षा कमी खर्चात मी तुम्हाला तुमचे कार्यक्रम करून देईल. असे करता करता तेव्हा पहिला कार्यक्रम यशस्वी झाला. त्यानंतर मी मागे वळून पाहिले नाही. मग लोक विचारायला लागले आमचे पण कार्यक्रम कराला का?

पूर्वी लग्न म्हटले की आचार्‍याला बोलवायचे, किराणा यादीप्रमाणे सामान आणायचे की झाले लग्न. परंतु नंतर नंतर लग्नाच्या कार्यक्रमाचे स्वरूप बदलत गेले. लोकांच्या अपेक्षा वाढत गेल्या आणि मग काम करणे आमच्यासाठी चॅलेंज बनले. कारण लोकांच्या अपेक्षा खूप, वेळ कमी, बजेट कमी आणि सोर्स कमी, मग अशावेळी बेस्ट रिजल्ट देणे आमच्यासाठी आव्हानात्मक असायचे. पण हे काम सुरू केल्यावर मी माझे सोेर्सेसही मोठ्या प्रमाणात वाढवले. कोणताही इव्हेंट मॅनेज करताना तुमचे स्ट्राँग रिलेशन फार महत्त्वाचे असतात तसेच तुम्हाला सतत नवनवीन गोष्टींबद्दल अपडेट राहणे गरजेचे आहे. कारण कोणत्याही इव्हेंटमध्ये संगीत, सजावट, सादरीकरण आणि वेगळेपण हा तो कार्यक्रम स्मरणीय करत असतो. म्हणून लोकांच्या अपेक्षेपेक्षा त्यांना अधिक चांगले देण्याचा आमचा प्रयत्न असतो.

हे काम करताना अनेक अडचणी येतात. चॅलेंजेसही मोठी असतात. मागील वर्षी मला रणजितदादा पाटील यांच्या मुलीच्या लग्नाचे काम मिळाले होते. साधारणत: लग्नाला २० हजार लोक येणार होते. त्या लग्नासाठी जागा मॅनेज करण्यापासून विदाईपर्यंत सगळेच अतिशय सुंदर झाले होते. त्या लग्नाला मुख्यमंत्र्यांपासून सगळेच उपस्थित होते. तसेच दुबई, पटाया, बाली येथेही आम्ही लग्न कार्यक्रम केले. नाशिकमध्ये एक दिवसात २८ लग्न केल्याचे रेकॉर्ड आमच्या नावावर आहे.

तुम्हाला सांगतो, आजकाल लोकांना प्रत्येक आनंदाच्या आणि दु:खाच्या प्रसंगीदेखील इव्हेंट मॅनेजमेंटची गरज भासायला लागली आहे. मागील वर्षी नाशिकमधील एका प्रतिष्ठित व्यक्तीचे निधन झाले तेव्हा त्याच्या घरच्यांनी सगळे काम आम्हाला दिले होते. त्यांच्या गाड्या, त्यांचे घर आणि अंतयात्रा आम्ही सुशोभित केली होती. त्यासाठी येणार्‍या पाहुण्यांच्या खानपानाचीही आम्ही व्यवस्था केली होती.
सांगायचा उद्देश हाच की, इव्हेंट मॅनेजमेंट या क्षेत्रात जगात मरण नाही. रोज किमान तीनशे लोकांना यातून रोजगार मिळतो. तसेच तुमच्या कौशल्याला येथे प्रचंड वाव आहे आणि हे जर तुमच्या आवडीचे क्षेत्र असेल तर तुमच्या प्रगतीचा रेट १०० टक्के वाढतो. फक्त एकच गोष्ट की तुमची काम करण्याची तयारी असली पाहिजे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com