तेजस पुरस्कार मुलाखत : प्रयोगशील शेतीवर विश्वासाचा फायदा-अरुण भांबरे
Featured

तेजस पुरस्कार मुलाखत : प्रयोगशील शेतीवर विश्वासाचा फायदा-अरुण भांबरे

Abhay Puntambekar

नाशिक | प्रतिनिधी 

नोकरी न करता शेती करण्याचा निर्णय
शेतीमध्ये सतत वेगवेगळे प्रयोग
फक्त आपल्याच शेतीचा फायदा व्हावा, हा दृष्टिकोन नाही
तरुण शेतकर्‍यांना शेतीसाठी प्रोत्साहन
पर्यायी पीकपद्धतीचा अवलंब

मी पिंपळवाडी तालुका सटाणा येथे राहतो. २००८ पासून शेती करतो. दहावीपासूनच शेती आणि अभ्यास असे दोन्ही करत होतो. शेती मला पहिल्यापासून आवडायची. दहावीनंतर अधिक शिकावे म्हणून मी सटाण्यातील कॉलेजमध्ये दोन वर्षांचा मोटार मेकॅनिकचे आयटीआयमधून शिक्षण घेतले.

या कोर्सनंतर मला कंपनीत नोकरी मिळत होती. परंतु ती न स्वीकारता मी शेतीकडे वळलो. पूर्वी आमचे 2 काका, काकू, आई-वडील, आजी, आजोबा भावंडे असे मोठे कुटुंब होते, शेतीपण भरपूर होती. सगळे एकत्रच शेती करत. द्राक्ष, डाळिंब होते. कांदा, मका, बाजरी, हरभरा असे घरासाठी लागणारे पीक आम्ही घेत असायचो. परंतु सगळे विभक्त झाल्यामुळे शेती वाटली गेली. काही आमच्या वाट्याला आली.

जमिनीची पोत सांंभाळण्यासाठी आणि बदलत्या वातावरणाचा विचार करता वेगवेगळी पिके घेऊन शेती करण्याचा प्रयोग सध्या आम्ही करत आहोत. या वर्षी आम्ही डाळिंब, द्राक्ष, कांदा आणि सीताफळ लावली आहेत. सीताफळाला पाणी कमी लागते आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ही ते टिकत म्हणून सीताफळाचा प्रयोग केला आहे. आमच्या गावात ३०/४० किलोमीटर परिसरात कुठेच सीताफळ नाही. आम्ही २०१८ च्या दुष्काळी परिस्थितीचा अनुभव घेतला आहे. त्यावर्षी पाण्याअभावी डाळिंबाचा बाग जळून गेला होती. सीताफळ लावली तो एक प्रयोगच आहे. हे प्रयोग जेव्हा सफल होतात, तेव्हा फार आनंद होतो, कारण उत्पादन आणि उत्पादन दोन्ही चांगले मिळते.

पण फक्त आपल्याच शेतात चांगले पीक यावे आणि आपल्यालाच फायदा व्हावा, असे मला अजिबात वाटत नाही आणि तसेही आम्ही गावातले सगळे शेतकरी नेहमी एकत्र येत असतो आणि पीक चांगले कसे येईल, नवनवीन शेती प्रयोग कशी फायद्याची ठरू शकते, जमिनीचा पोत कसा सुधारता येईल, द्राक्षबाग असेल तर अर्ली छाटणी केव्हा करायची, त्याचे फायदे, संकटांना तोंड देताना पीक बदल कसा महत्त्वाचा आहे, अशा अनेक गोष्टींवर चर्चा करतो. एखाद्या कंपनीचा माणूस गावात येणार असेल तर डोळेझाक करून खते, बियाणे वापरत नाही. त्यावर चर्चा करतो. कारण एखाद्या कंपनीच्या अभ्यासापेक्षा शेतकर्‍यांचा अनुभव मोठा आणि महत्त्वाचा असतो.
नोकरी न करता मी माझ्या आवडीची शेती निवडली, याचा मला कधीही पश्चाताप होत नाही.

यात मला माझ्या कुटुंबाची लाख मोलाची साथ मिळते. ती बळ देते. मी शेतीकडे वळलो याचे अजून एक कारण आहे. माझे आजोबा सटाणा कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करत होते, ते कॉलेजला जाण्याआधी आणि कॉलेजवरून आल्यावर नियमित शेतीत काम करायचे. सुट्टीच्या दिवशी तर पूर्णवेळ शेतात असायचे. निवृत्तीनंतर त्यांनी शेतीचे केली. ते माझे प्रेरणास्थान आहेत.

मला माझ्या तरुण शेतकर्‍यांना आणि मित्रांना हेच सांगावेसे वाटते की, शेतीत मन लावून काम केले, सतत अभ्यासपूर्ण प्रयोग केलेत आणि शेतीबरोबर एखादा जोडधंदा केला तर तुमचा नक्कीच फायदाच होईल. निसर्गचक्रामुळे जरी अडचणी येत असल्या तरी या निसर्गानेच शेतीतले पर्याय आपल्याला दिले आहेत. गरज आहे ती आपल्या कामावर विश्वास ठेवण्याची.

शेतकर्‍यांनी एकाच पिकावर अवलंबून न राहता इतर पिकांचाही विचार केला तर, होणारे नुकसान टळू शकते. शेती मनापासून आणि स्मार्ट पद्धतीने केली तर त्यातून फायदा होतो. या विश्वासाने शेती करा आणि अनुभव घ्या.

Deshdoot
www.deshdoot.com