‘आरटीई’ प्रवेशासाठी अर्ज करण्यास प्रारंभ;  २९ फेब्रुवारीपर्यंत भरता येणार अर्ज
Featured

‘आरटीई’ प्रवेशासाठी अर्ज करण्यास प्रारंभ; २९ फेब्रुवारीपर्यंत भरता येणार अर्ज

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आर्थिक दुर्बल व मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा हक्क कायद्याअंतर्गत राखीव २५ टक्के जागांवर प्रवेश देण्यासाठी बुधवारपासून अर्ज करण्यास प्रारंभ झाला. २९ फेब्रुवारीपर्यंत हे अर्ज भरता येणार आहे.

आरटीई (शिक्षणाचा हक्क कायदा) प्रक्रियेत आतापर्यंत नोंदणी झालेल्या जिल्ह्यातील ४४६ शाळांमध्ये ५ हजार ५४६ जागा उपलब्ध आहेत. या राखीव जागांवर प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांच्या पालकांना मोबाईल अ‍ॅपची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. आरटीईच्या संकेतस्थळावर एका विद्यार्थ्यासाठी एकच अर्ज करता येणार असून पालकांना मदत केंद्र, सायबर कॅफे अथवा मोबाईलवर आरटीईचे अ‍ॅप डाऊनलोड करून अर्ज भरता येणार आहे.

शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० च्या आरटीई प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी २९ फेब्रुवारीपर्यंत आरटीई संकेतस्थळावर संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेत सहभागी होताना पालकांना आरटीई पोर्टलवर सुरुवातीला पाल्याची जन्मतारीख व नावासह मूळ माहिती अद्ययावत करून नोंदणी करून युजर आयडी आणि पासवर्ड मिळवावा लागणार आहे.

या आहेत अटी
ऑनलाईन अर्ज भरताना पालक व त्यांच्या रहिवासी क्षेत्रापासून २ व ३कि.मी. आणि अधिक अंतरापर्यंतच्या उपलब्ध असणार्‍या फक्त दहा शाळांचे पर्याय निवडण्याचे स्वांतत्र आहे. २०१८-२०१९  या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला आदी कागदपत्रांचे संकलन आवश्यक असून आरटीईच्या सोडतीत नाव आल्यानंतर ही सर्व कागदपत्रे पडताळणी समितीकडे सादर करणे अनिवार्य असणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com