सिन्नर : गोंदे व दातली परिसराला वादळी वाऱ्यासह गारांनी झोडपले

सिन्नर : गोंदे व दातली परिसराला वादळी वाऱ्यासह गारांनी झोडपले

सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी

सिन्नर । वार्ताहर

आज दि.30 सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील गोंदे व दातली परिसरात वादळी वाऱ्यासह गारपिटीने शेतीपिकांचे अतोनात नुकसान केले.सलग दोन दिवसांपासून सिन्नरच्या पुर्वभागात वादळी पावसाची हजेरी लागत आहे. आज सायंकाळी दातली, गोंदे, गुळवंच, दापुर, खोपडी या भागाला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले.

प्रचंड वेगाने वाहणारे वारे आणि गारांचा वर्षाव यामुळे गहु, कांदा,मका, डाळिंबाच्या पिकांसह कोबी, मेथी, फ्लावर सारख्या भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले. डाळिंब उत्पादकांनी आंबिया बहार पकडला असून बागांची सेटिंग केली आहे. गारांच्या माऱ्यामुळे बहरलेल्या झाडांवरील लालजर्द फुलांचा सडा जमिनीवर पसरला होता.

याशिवाय काढणीला आलेला कांदा, गहू यासह मक्याचे उभे पीक सपाट झाले. सलग दोन दिवसांच्या पावसामुळे पूर्व भागातील शेतकरी हादरून गेला आहे. वादळामुळे जीवित व वित्त हानी झाली नसली तरी शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com