जळगाव येथून मुलीचे अपहरण करणारा जेरबंद
Featured

जळगाव येथून मुलीचे अपहरण करणारा जेरबंद

Abhay Puntambekar

नाशिक गुन्हे शाखा १ ची कामगिरी

नाशिक । प्रतिनिधी

मुंबईहून पायी विदर्भ येथे जाणार्‍या कुटुंबियांच्या मुलांना गावी सोडून देण्याचे आमीष दाखवून १२ वर्षीय मुलीस जळगाव येथून अपहरण करणाऱ्या संशयितास नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने नाशिकरोड परिसरातून अटक केली आहे.

गणेश सखाराम बांगर (३२, रा. ता. मालेगाव, जिल्हा वाशिम) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याने १९ मे रोजी जळगाव येथून बालिकेचे अपहरण केले होते. याप्रकरणी जळगाव येथील नशिराबाद पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार लाँकडाऊन मुळे उपासमार होत असल्याने अनेक मजुर, गरिब लोक मुंबई साेडुन गावी परतत आहेत. अशाच प्रकारे विदर्भातील अकोला येथे जाण्यासाठी एक कुटूंब मुंबईहून पायी निघाले होते.

जळगाव येथील एका मंदिरात हे कुटूंब जेवन करत होते. त्यावेळी संशयित गणेश याने त्यांच्या १९ वर्षीय मुलासोबत संवाद साधत त्यांना गावी सोडवण्याचे आमीष दाखवले. त्यानुसार तो मुलगा व १२ वर्षीय मुलीसह गणेशच्या दुचाकीवर बसला. नशिराबाद ते भुसावळ महामार्गावर दुचाकी थांबवून पुढे पोलीस आहेत, आपल्यावर कारवाई होऊ शकते म्हणून तु पायी चालत ये आम्ही पुढे थांबतो असे संशयिताने मुलास सांगितले. त्यानंतर मुलगा दुचाकीवरुन उतरल्यानंतर गणेशने मुलीस दुचाकीने अमरावतीच्या दिशेेने पळवून नेले. तेथे २० मेला मुलीला सोडून तो पसार झाला.

रडत बसलेल्या मुलीस अमरावती ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली. दरम्यान, संशयित गणेश हा पुणे येथून नाशिकला येत असल्याची माहिती जळगाव पोलिसांनी नाशिक गुन्हे शाखेस कळवली. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बलराम पालकर, पोलीस कर्मचारी रवींद्र बागुल, विशाल काठे, विशाल देवरे आदींच्या पथकानेे गणेश यास नाशिकरोड परिसरातून ताब्यात घेतले. त्यास नाशिक पोलिसांनी जळगाव पोलिसांकडे स्वाधीन केले. गणेशविरोधात चोरी, अपहरण, फसवणूक, विनयभंग असे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरोधात नाशिक शहरातही गुन्हे दाखल आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com