इंजिनियरिंग असोसिएशनच्या ऑनलाईन चर्चासत्रात मान्यवरांचे मार्गदर्शन
Featured

इंजिनियरिंग असोसिएशनच्या ऑनलाईन चर्चासत्रात मान्यवरांचे मार्गदर्शन

Abhay Puntambekar

नाशिक। प्रतिनिधी

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिक्षण क्षेत्रावर झालेला परिणाम आणि त्यावर मात करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना या बाबत महाराष्ट्र असोसिएशन ऑफ मॅनेजमेंटस ऑफ अनअेडेड इंजिनियरिंग कॉलेजेस च्या वतीने बुधवार, दिनांक ६ मे रोजी महाराष्ट्रातील सर्व विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयांचे संस्थाचालक व प्राचार्य यांचे ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन केले गेले. यात राज्यभरातून सुमारे २५० जणांनी झूमद्वारे तर १७५ जणांनी फेसबुक लाईव्ह द्वारे चर्चासत्रात सहभाग घेतला.

यावेळी सिम्बायोसिस शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पद्मभुषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी सर्व शिक्षण संस्थांना आपले आर्थिक नियोजन योग्य करावे. केवळ शासकीय मदतीवर अवलंबून न राहता अन्य स्रोतांचा विचार करावा असे सुचविले. सिम्बायोसिस स्किल अँण्ड ओपन युनिव्हर्सिटीच्या प्र-कुलगुरू डॉ. स्वाती मुजुमदार यांनी प्राप्त परिस्थितीत नव्या पदव्युतर वर्गाना परवानगी देताना काही निकष शिथिल करण्याची मागणी केली. पुढे पुण्याच्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील यांनी सांगितले की, या वर्षी अनेक विद्यार्थी पदव्युतर शिक्षणासाठी अमेरिकेसह परदेशात जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ते भारतीय विद्यापीठामध्ये प्रवेश घेऊ शकतात. त्यादृष्टीने सर्वांनी तयारी करणे गरजेची आहे.

पुण्याच्या एम. आय. टी. ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. मंगेश कराड यांनी सध्याच्या परिस्थितीत येत्या शैक्षणिक वर्षात ऍडमिशनवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करून खर्चात कपात करावी लागेल असे सुचविले. नव्या शैक्षणिक सत्रात तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण पद्धती वापरली जाण्याची शक्यता असल्याने त्याला लागणाऱ्या सुविधा सर्व शैक्षणिक संस्थांनी निर्माण कराव्या असे त्यांनी सांगितले.

विश्वकर्मा विद्यापीठ, पुणे या संस्थेचे अध्यक्ष भारतकुमार अग्रवाल यांनी सांगितले की व्ही. आय. टी. ग्रुपने स्वतःची लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम निर्माण केली आहे. तसेच नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी व शिक्षकांनी कॅम्पसमध्ये आल्यावर कोणते नियम पाळावे याचे सविस्तर विवरण तयार केले आहे. .

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सध्याच्या अनिश्चित परिस्थितीचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याची गरज प्रतिपादन केली. त्यासाठी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. यावर्षीची सीईटी परीक्षा कमी कालावधीत घेऊन प्रवेश प्रक्रिया सुटसुटीतपणे राबविण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.

याशिवाय पुण्याच्या के. जे. एज्युकेशन इन्स्टिटयूटचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत अभ्यंकर, राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनीरिंगचे कॅम्पस डायरेक्टर प्रा. पी. पी. विटकर आणि औरंगाबादच्या देवगिरी इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीरिंगचे संचालक डॉ. उल्हास शिवूरकर यांनी त्यांचे विचार मांडले. सोलापूरच्या वालचंद इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी चे प्राचार्य डॉ. शशिकांत हलकुडे यांनी असोसिएशनच्या कामाची ओळख करून दिली तसेच सहभागी सदस्यांच्या वतीने सर्व मान्यवरांना प्रश्न विचारले.

या चर्चासत्राचे सूत्रसंचालन के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केशव नांदुरकर यांनी केले. चर्चासत्राचा समारोप असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्या भाषणाने झाला. त्यांनी महाराष्ट्रातील सर्व विनाअनुदानित संस्थांनी एकत्र येऊन कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करावी असे आवाहन केले आणि उपस्थित सर्वांचे आभार मानले.

यावेळी के. के. वाघ शिक्षण संस्थेचे विश्वस्त समीर वाघ, सचिव प्रा. के. एस. बंदी, महाविद्यालयाचे प्राचार्य, अधिष्ठाता आणि शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com