Friday, April 26, 2024
Homeनाशिकप्लॅस्टिक कचर्‍याला मिळणार दहा रुपये दर

प्लॅस्टिक कचर्‍याला मिळणार दहा रुपये दर

नाशिक । प्रतिनिधी

कचरा वेचक महिला या शहरातील प्लॅस्टिकचा कचरा वेचून महापालिकेचेच काम करत आहेत. त्यांनी गोळा केलेल्या कचर्‍याला महापालिका १० ते १५ रुपये दर देण्याचा प्रयत्न करणार असल्याची घोषणा महापौर सतीश कुलकर्णी यांनी गंजमाळच्या रोटरी हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या कचरा वेचक महिलांच्या अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून  बोलत असताना केली . उपस्थितांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अधिवेशनाचा प्रारंभ झाला. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या ज्योती नटराजन होत्या.

- Advertisement -

महापौर कुलकर्णी म्हणाले, शहरी आरोग्य व कचरा व्यवस्थापन यावर महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. शहरात कचरा वेचणार्‍या महिला दुर्गंधी, घाणीच्या ठिकाणी जाऊन आरोग्यास घातक कचरा गोळा करतात. त्या एकप्रकारे महापालिकेचे काम करत आहेत. पुण्यासह इतर महापालिका अशा महिलांसाठी विविध योजना राबवत आहेत. त्या धर्तीवर नाशिक महापालिका या महिलांनी गोळा केलेल्या प्लॅस्टिक कचर्‍याला योेग्य दर देण्यासह त्यांच्या आरोग्यासाठी विशेष प्रयत्न करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

अधिवेशनाच्या अध्यक्ष ज्योती नटराजन यांनी कचरा वेचक महिलांचे महामंडळ स्थापन करून शासनाने त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा, मुलांचे शिक्षण, आरोग्य यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली. या महिला कचरा वेचतात म्हणजे त्या घाण नाहीत. त्या या समाजाचा घटक असून समाजाच्या आरोग्यास घातक ठरणारा कचरा त्या दूर करतात. सतत कचर्‍याच्या संपर्कात असल्याने अनेकींना दुर्धर आजार होतात. समाजाने त्यांच्याकडे स्वच्छतादूत म्हणून पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.

अ‍ॅड. विनय कटारे यांनी अधिवेशनात महिलांना त्यांचे हक्क, कर्तव्य याची माहिती देतानाच महिलांसाठी असलेल्या कायद्यांची माहिती देऊन कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन न करता त्याविरोधात निर्धाराने उभे राहण्याचे आवाहन केले.

आयटकचे सचिव राजू देसले, चित्रा भवरे, राजपाल शिंदे यांनी या महिलांना स्वच्छ भारत अभियान, महिला संघटन, कचरा वेचकांचे हक्क याबाबत माहिती देऊन संघटित होऊन आपले हक्क मिळवण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी नगरसेविका वैशाली भोसले, आरोग्य अधिकारी बुकाणे, अ‍ॅक्शन अ‍ॅडच्या राधा सेहगल आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन यशवंत लकडे यांनी केले. आभार बाबाजी केदारे यांनी मानले.

असे झाले ठराव
* कचरा वेचक महिलांसाठी मंडळ स्थापन करून सामाजिक सुरक्षा द्यावी
* पुनर्वापर होणार्‍या कचर्‍यावरील बंदी उठवावी
* शहरातील सफाई, उद्यानांच्या कामासाठी या महिलांना सामील करून घ्यावे
* घरकुल योजनेत कचरा वेचक महिलांना घरकुल राखीव असावे
* कचरा वेचक महिलांसाठी स्वतंत्र आरोग्य विमा योजना सुरू करावी
* कचरा वेचण्यासाठी आयुष्य वेचणार्‍या महिलांना पेन्शन द्यावी
* प्लॅस्टिकच्या ९० टक्के पुनर्वापरासाठी ठोस उपायोजना राबवाव्यात
* एक लाख लोकसंख्येमागे एक कचरा गोळा करण्याचे ठिकाण व्हावे

- Advertisment -

ताज्या बातम्या