Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकसिन्नर औद्योगिक वसाहतीत कामगारांचा तुटवडा

सिन्नर औद्योगिक वसाहतीत कामगारांचा तुटवडा

स्थानिकांना रोजगाराची संधी

सिन्नर । वार्ताहर

- Advertisement -

लॉकडाऊनमुळे परप्रांतीय कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याने ते आपल्या मूळ गावी निघून गेले आहे. त्यामुळे माळेगाव, मुसळगाव येथील औद्योगिक वसाहतीत हजारो कामगारांचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यानिमित्ताने तालुक्यातील सुशिक्षीत बेरोजगार तरुणांना औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात कामांची संधी उपलब्ध झाली आहे.

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या दोन महिन्यापासून राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे तालुक्यातील माळेगाव व मुसळगाव येथील कामगारांची अवस्था दयनीय झाली आहे. हजारो किलोमीटर असलेले आपले गाव सोडून सिन्नर येथे रोजगारासाठी आलेले बिहार, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश व इतर राज्यातील कामगारांना गेल्या दीड महिन्यापासून हातात काम नव्हते. परिणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखिची झाल्याने हे कामगार गेल्या चार दिवसांत मुळ गावी निघून गेले आहे. त्यामुळे माळेगाव, मुसळगाव या दोन्ही औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांचा तुटवडा भासत आहे.

लॉकडाऊन काळात शासनासोबत चर्चा करून सुरू केलेल्या कंपनी आज कामगारांअभावी उद्योजकांना नियमीत सुरू ठेवता येत नाही.
तालुक्यात आज सुशिक्षीत बेकार असलेले फिटर, इलेक्ट्रीशियन, टर्नर, डिप्लोमा, मॅकेनिकल इंजिनिअर व हेल्पर यांना औद्योगिक वसाहतीत काम करण्याची संधी आहे. या पदावर काम करण्यास इच्छुक असणार्‍या तरुणांनी दोन्ही वसाहतीमध्ये संपर्क साधून रोजगार उपलब्ध होण्याच्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

दोन्ही औद्योगिक वसाहतीमध्ये हजारो परप्रांतीय कामगारांच्या जागा रिक्त झाल्या असल्याने व हे कामगार पुन्हा सिन्नर येथे येतील याची शाश्‍वती नाही. त्यामुळे रिक्त झालेल्या जागा तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांच्या दृष्टीने संधी चालून आल्याने गरजू तरुणांनी याचा फायदा घ्यावा.
– नामकर्ण आवारे
संचालक, सिन्नर तालुका सहकारी औद्योगिक वसाहत

- Advertisment -

ताज्या बातम्या