टोकन देऊनही मद्य दुकानांसमोर गर्दी, आजुबाजुला जमाव, नियमांचा फज्जा
Featured

टोकन देऊनही मद्य दुकानांसमोर गर्दी, आजुबाजुला जमाव, नियमांचा फज्जा

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

शहर तसेच जिल्ह्यात मद्य दुकाने सुरू होताच होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने टोकन पद्धतीचा अवंलब केला आहे. मात्र तरीही शहरातील बहुतांश मद्य दुकानांसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अनेक ठिकाणी सामाजिक अंतर तसेच इतर नियमांचा फज्जा उडाल्याचेच चित्र होते.

जिल्हा प्रशासनाने टोकन पद्धतीनुसार शुक्रवारपासून (दि.८) पुन्हा एकदा मद्य विक्री दुकाने सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार आज शहर तसेच जिल्ह्यात मद्याची बार वगळता सर्वप्रकारची दुकाने पुन्हा सुरू झाली आहेत.

गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने एसएमस व व्हॉट्सऍप टोकन पद्धतीचा अवंलब करण्याचे आदेश दिले आहे.यासाठी प्रत्येक मद्य दुकानासमोर काही मोबाईल तसेच व्हॉट्सऍप क्रमांक असलेले फलक लावण्यात आले आहेत. त्यावरच ग्राहकाने आपली मागणी नोंदवयाची आहे. या नोंदणीची दखल घेऊन मद्य विक्री करणारे ग्राहकाला ठराविक वेळ निर्धारीत करून त्यास बोलावतील त्याचवेळेत ग्राहकाने दुकानात जाऊन मद्य घ्यायचे. यासाठी मद्य दुकानादार खाजगी सुरक्षा रक्षकांकडून सामाजिक अंतर तसेच रांगेचे नियम पाळतील असे आदेश आहे.

परंतु आज शहरातील बहूतांश दुकानांसमोर मोबाईल क्रमांक पाहण्यासाठी गर्दी जमली होती. दुरवरून आलेले ग्राहक नोंदणी केल्यानंतर पुन्हा घरी न जाता तेथेच रेंगाळत असल्याचे तसेच दुकानाच्या आजुबाजूला गल्ल्यामध्ये बसून राहिल्याचे चित्र होते. मद्य विक्रेत्याचे सुरक्षा रक्षक असले तरी गर्दी नियंत्रणात नव्हती, सामाजिक अंतर पाळले जात नव्हते. तर अनेक ठिकाणी वादही झाले. अखेर शहरात नागरीकांची गर्दी असतानाही तपासणी नाके सोडून मद्यच्या दुकानांना पोलीस बंदोबस्त द्यावा लागला.

वेळ ९ ते ५
मद्य विक्री करणार्‍या दुकानांसाठी १० ते ४ या वेळेतच मद्य विक्री करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र होणारी गर्दी कमी करण्यासाठी इतर दुकानांप्रमाणेच मद्य विक्रीची वेळही सकाळी ९ ते सायंकाळी ५ करण्यात आली आहे. परंतु दुकानात एकावेळी पाच पेक्षा अधिक ग्राहक येणार नाहीत, आलेल्या ग्राहकांना समाजिक अंतराचे पालन करावे लागेल, दर दोन तासांनी निर्जंतुकीरण करण्यासह कर्मचार्‍यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आदेश दुकानमालकांना देण्यात आले आहेत. या नियमांकडे दुर्लक्ष करणार्‍या दुकान मालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com