विंचुर दळवी शिवारात बिबट्या जेरबंद

विंचुर दळवी शिवारात बिबट्या जेरबंद

विंचूरदळवी | वार्ताहर

पांढुर्ली-विंचुरदळवी शिवेवरील खंडोबा टेकडीच्या पायथ्याशी असणाऱ्या जुन्या पाझर तलावाच्या परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला बुधवारी दि.६ सायंकाळी यश आले.

पाझर तलावालगत सिमेंटचे बांधकाम असणारी सुमारे दीडशे फुटांची मोरी आहे. या मोरीच्या वरच्या बाजूला द्राक्ष बागेत काम करणाऱ्या मजुरांना सकाळी दहा वाजेच्या सुमारास बिबट्याच्या जोडीचे दर्शन झाले. या मजुरांनी आरडाओरड केल्यावर जोडीतील नर बिबट्या मोरीमध्ये शिरला. तर मादीने शेजारच्या मक्याच्या शेतात पलायन केले.

याबाबतची माहिती मिळतात सिन्नरचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रविण सोनवणे, वनपाल अनिल साळवे,पंडित आगळे, कैलास सदगीर यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे अवलोकन केल्यावर तातडीने सिन्नर येथून पिंजरा मागविण्यात आला. या पिंजऱ्यात शेळी सोडून सकाळी ११ वाजेच्या सुमारास मोरीच्या तोंडाशी बिबट्या पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. मात्र दिवसभर या सापळ्याकडे बिबट्या फिरकला नव्हता.

अखेरीस सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास भुकेने व्याकूळ झालेला बिबट्या मोरीतून बाहेर पडला आणि वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अलगद अडकला. या बिबट्याला जेरबंद केल्यावर त्याची रवानगी तात्काळ मोहदरी येथील वन उद्यानात करण्यात आली. तर त्याच्या जोडीच्या मादीला पकडण्यासाठी याच भागात रात्री आठ वाजता नवीन पिंजरा लावण्यात आला.

विंचूर दळवी पांडूर्ली शिवारात बिबट्याचा मुक्त संचार आहे. वारंवार दर्शन देणाऱ्या बिबट्याची एकत्र जोडी आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. नागरिकांनी सायंकाळी व रात्रीच्या वेळी एकट्याने घराबाहेर पडू नये. शेतकऱ्यांनी स्वतःची व जनावरांची काळजी घ्यावी असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com