Saturday, April 27, 2024
Homeनाशिकमुंबईत अडकलेल्या गावकऱ्यांसाठी कांचनगाव ग्रामस्थांची मदत

मुंबईत अडकलेल्या गावकऱ्यांसाठी कांचनगाव ग्रामस्थांची मदत

उपसरपंच सतीष गव्हाणे यांची संकल्पना.

इगतपुरी । प्रतिनिधी

- Advertisement -

करोनाचे भीषण संकट, लॉकडाऊन, संचारबंदी, बेरोजगारी आदी संकटांमध्ये इगतपुरी तालुक्यातील कांचनगाव येथील मूळ रहिवासी मुंबई भागात अडकलेले आहेत. हे ग्रामस्थ आपल्या परिवारासह कांचनगाव येथे येण्यासाठी आतुर झालेले आहेत. मात्र करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून कांचनगाव ग्रामस्थांनी गावात कोणाला सध्याच्या स्थितीत येऊ न देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे बाहेर राहणाऱ्या गावकऱ्यांनी ह्या परिस्थितीत आहे तिथेच राहावे म्हणून उपसरपंच सतीश गव्हाणे ह्यांनी पुढाकार घेतला आहे. गावातील सहकाऱ्यांच्या मदतीने मुंबई भागात राहणाऱ्या गावातल्या पंचवीस ते तीस कुटुंबांना मुबलक धान्य, जीवनावश्यक साहित्य, भाजीपाला घरपोच करण्यात आला. यासह सर्वांशी संवाद साधून आधार देण्यात आला.

नोकरी आणि व्यवसायानिमित्त इगतपुरी तालुक्यातील कांचनगाव येथील अनेक कुटुंबे मुंबई भागात वास्तव्याला आहेत. कोरोनाची महामारी आणि उद्रेक वाढल्याने ही कुटुंबे मुंबईत हवालदिल झालेली आहेत. संसर्ग टाळण्यासाठी त्यांच्याकडून काळजी घेतली जात असली तरी त्यांना आपल्या स्वतःच्या कांचनगावची ओढ लागली आहे. मात्र अशा भयाण परिस्थितीत कांचनगाव ग्रामस्थांनी गावाला सुरक्षित ठेवण्यासाठी सध्याच्या काळात कोणालाही प्रवेश न देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे उपसरपंच सतीष गव्हाणे यांना संबंधित कुटुंबे संपर्क साधत आहेत. त्यांच्याशी बोलल्यानंतर त्या कुटुंबांना सध्या जगण्याचे साधन नसल्याने उपासमारीची भीती असल्याचे श्री. गव्हाणे यांच्या ध्यानात आले. म्हणूनच सर्व कुटुंबे गावाकडे यायला इच्छुक असल्याचे दिसून आले.

त्यानुसार त्यांनी कांचनगावातील ग्रामपंचायत सदस्य विजय चंद्रमोरे, धर्मराज चंद्रमोरे, हिरामण झाडे यांच्यासह काही सहकाऱ्यांच्या मदतीने संबंधित कुटुंबांना शाश्वत मदत करण्याचा निर्णय घेतला. सतीष गव्हाणे यांनी ग्रामस्थांकडून गहू, तांदूळ, बाजरी, डाळी, तेल आदींसह विविध जीवनावश्यक साहित्य संकलित केले. जगण्यासाठीचे विविध साहित्य आणि सर्व प्रकारचा भाजीपाला ह्या उपक्रमात जमा करण्यात आला. संबंधित पंचवीस ते तीस कुटुंबांना मुंबईत जाऊन हे साहित्य वितरित करण्यासाठी साहित्य भरलेले वाहन निर्जंतुकीकरण करून वाटप करणाऱ्यांनी सुरक्षिततेची काळजी घेऊन थेट घरपोच वाटप केले.गरजू कुटुंबांनी साश्रूनयनांनी उपसरपंच सतीश गव्हाणे यांच्याकडे कृतज्ञता व्यक्त केली

.

- Advertisment -

ताज्या बातम्या