अंबड पोलीसांच्या कारवाईत चोरीच्या पाच दुचाकी जप्त
Featured

अंबड पोलीसांच्या कारवाईत चोरीच्या पाच दुचाकी जप्त

Abhay Puntambekar

नवीन नाशिक । प्रतिनिधी

अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केलेल्या कारवाईत एका संशयितासह विधी संघर्षित बालका कडून ५ मोटरसायकल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त अशोक नखाते यांनी अंबड पोलीस ठाण्याचे वपोनी कुमार चौधरी यांना मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.

यावरून अंबड पोलिसांनी कारवाई सुरू केली. पोलीस ठाण्याचे शिपाई दीपक वाणी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, एक विधी संघर्षित बालक एका दुचाकीसह नवीन नाशकतील बजरंग चौकात आहे. यावरून पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा कमलाकर जाधव, उपनिरीक्षक राकेश शेवाळे, हवालदार भास्कर मल्ले, मारुती गायकवाड, पोलीस नाईक चंद्रकांत गवळी, धनंजय धोबाडे, अविनाश देवरे, पोलीस शिपाई मनोहर कोळी, हेमंत आहेर, प्रमोद काशीद, नितीन फुलमाळी, संभाजी जाधव यांच्या पथकाने कारवाई करत सदर विधि संघर्षशीत बालकास अटक केली.

त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ईश्वर दशरथ पवार (वय २१) राहणार काळे मळा, महाकाली चौक नवीन नाशिक यास ताब्यात घेतले असता त्याकडे चौकशी करून त्याने ८ मे २०२० रोजी गंगा घाट परिसरामधून एक दुचाकी एक्टिवा गाडी चोरी केल्याची माहिती दिली होती. सदर गुन्ह्याबाबत पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झालेला आहे. दोन्ही संशयितांनी अंबड गंगापूर व पंचवटी पोलिस ठाणे हद्दीत तब्बल ५ मोटर सायकल असा एकूण १ लाख रुपये किमतीच्या पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून पुढील तपास पोलिस हवालदार उघडे करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com