दिंडोरी : वादळी वाऱ्यासह पावसाच्या हजेरीने साद्राळे येथील शाळेचे नुकसान

दिंडोरी : वादळी वाऱ्यासह पावसाच्या हजेरीने साद्राळे येथील शाळेचे नुकसान

ननाशी । वार्ताहर

ननाशी सह परिसरात पावसाने वादळी वाऱ्यांसह जोरदार हजेरी लावली असून मोठ्या प्रमाणात झालेल्या वादळामुळे दिंडोरी तालुक्यातील साद्राळे येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ननाशी परिसरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास अचानक पावसाने वादळी वारे ,मेघगर्जनेसह सुमारे एक तास जोरदार हजेरी लावली .जोरदार वादळी वाऱ्यांमुळे साद्राळे येथील जि .प . शाळेच्या इमारतीवरील सर्व पत्रे उडून गेले .तसेच किचन शेड ,स्वच्छतागृह यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले .सोबतच शाळेतील संगणक संच आणि टीव्ही संचामध्ये पावसाचे पाणी घुसल्याने त्यांचेही नुकसान झाले असून शाळेतील स्टेशनरी पूर्ण भिजून गेली आहे.

सुदैवाने शाळेच्या आसपास कोणी नसल्याने जीवितहानी टळली आहे .या नुकसानीची तलाठी गायकर , ग्रामसेवक मोरे आदींनी पाहणी करून पंचनामा केला आहे .त्यात अंदाजे दोन लाख पच्याऐंशी हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

वादळामुळे विजेचा खांब उन्मळून पडल्याने रात्रभर परिसर अंधारात होता .ननाशी येथील वीज उपकेंद्राला नाशिकवरून 33 केव्ही मुख्य वीज वाहिनीवरून वीजपुरवठा केला जातो .या वीज वाहिनीवरील खांब ,विद्युत प्रवाह वाहक तारा जुन्या झाल्याने जीर्ण झाल्या आहेत .थोडासा जरी पाऊस किंवा वादळ झाले की या वाहिनीवरील खांब उन्मळून पडतात त्यामुळे परिसरातील नागरिकांना नेहमी दोन- दोन तीन -तीन दिवस अंधारात राहावे लागते .त्यामुळे वीज कंपनीच्या वतीने या मुख्य वीज वाहिनीच्या नेहमी होणाऱ्या बिघाडावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे .पावसाळ्याच्या तोंडावर या वाहिनीवर बिघाड होणे ही नित्याची बाब झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com