नाशिक शहरातील भाजपा अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांची भाजपाला सोडचिठ्ठी
Featured

नाशिक शहरातील भाजपा अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांची भाजपाला सोडचिठ्ठी

Abhay Puntambekar

जुने नाशिक | प्रतिनिधी

भारताचा संविधान झिंदाबाद  घोषणा देत आज शहरातील शेकडो भाजपा अल्पसंख्यांक विभागाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली. सीएए, एनआरसी व एनपीआर सारखे काळे कायदे तयार करुन केंद्र सरकार अल्पसंख्याक समाजाला त्रास देण्याचे काम करीत आहे. आम्हाला हे काळे कयदे मान्य नसू आम्ही समाजाबरोबर राहून त्याच्या विरुध्द आंदोलन करणार असल्याची माहिती प्रदेश सचिव तथा उत्तर महाराष्ट्र निवडणूक प्रभारी असलेले इमरान चौधरी यांनी दिली.

वडाळारोड वरील भाजपा अल्पसंख्यांक विभागाचा कार्यालय होते , त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन कार्यकर्त्यांनी राजिनामे दिले. यामध्ये स्वत: भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या प्रदेश सचिव इमरान चौधरी यांच्यासह भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या माजी शहराध्यक्ष अहेमद काझी, शहर उपाध्यक्ष वसीउल्लाह चौधरी, शहर सचिव दानिश वार्सी, अब्दुल खान, राजेश सोनार, नंदुर इंगळे, प्रचिन नन्ने, नसिम चौधरी, तौफिक सय्यद, अक्बर खान, रफिक अंसारी, मुबारक खान, जावेद खान, महेराज शेख, बादशाह खान, इस्माईल चौधरी, समीर सिद्दीकी, रियाज चौधरी, हसन जहीर व सलीम खान यांनी यावेळी आपल्या पदाचे राजीनामे देत भाजपचा जाहीर निषेध केला आहे.

चौधरी यांनी सांगितले की, ‘सीएए’कायदा लागू झाला, त्यानंतर ‘सीएए’ आणि ‘एनआरसी’बाबत जनसामान्यात असलेल्या रोषाची माहिती पक्ष श्रेष्ठीसह प्रदेशाध्यांना दिली होती. गेल्या काही महिन्यात भाजप सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. ट्रिपल तलाक, कलम ३७०, मुस्लिम आरक्षण न देणे, सीएए’आणि ’एनआरसी’असे निर्णय हे एका विशिष्ट समाजाच्या विरोधात आहे. यामुळे पूर्वी जो समाज या पक्षाच्या जवळ आणण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. ते प्रयत्न अयशस्वी होत आहे.

‘सीएए’ आणि ‘एनआरसी’ हे कायदे भारतीय राज्यघटनेच्या विरोधात आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हे सामूहिक राजीनामे अल्पसंख्याक आघाडी प्रदेशाध्यक्षांसह भाजपचे शहराध्यक्ष गिरीष पालवे यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले. मुद्यांकडे दुर्लक्ष, केवळ जातीचे राजकारण होत असल्याचे चौधरी म्हणाले. आम्ही वारंवार पक्षाच्या नेत्यांना सामूहिक नाराजीबद्दल सांगत आलो. वारंवार सांगूनही काहीच निर्णय होत नसेल्याने आम्ही पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com