Friday, April 26, 2024
Homeनगरनजीकचिंचोली येथील बेकायदा उत्खननाच्या चौकशीचे आदेश

नजीकचिंचोली येथील बेकायदा उत्खननाच्या चौकशीचे आदेश

दिघीतील खडी क्रशरबाबत ठेकेदार कंपनीला नोटीस

नेवासा (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील नजीक चिंचोली शिवारातील शेती गट नंबर 69/2 मध्ये बेकायदा दगड खाण उत्खननाची चौकशी करून त्वरित अहवाल सादर करण्याचे आदेश तहसीलदारांनी कुकाणा मंडलअधिकार्‍यांना दिले आहेत. त्याचबरोबर दिघी शिवारात गट नंबर 91/3 मध्ये सुरू असलेल्या बेकायदा खडी क्रशर चालवून खडी व दगडांचासाठा करणार्‍या ठेकेदार कंपनीलाही करणे दाखवा अन्यथा दंड भरा अशी नोटीस बजवण्यात आली आहे.

- Advertisement -

माहिती अधिकार कार्यकर्ते काकासाहेब गायके यांचा माहिती व तक्रार अर्ज तसेच दैनिक सार्वमतमधून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमुळे महसूल प्रशासन खडबडून जागे झाले असून तहसीलदारांनी वरील पाऊल उचललेले आहे. नेवाशाच्या तहसीलदारांनी 3 डिसेंबर रोजी सदर स्टोन क्रशर सुरू असलेल्या शेत जमिनीचे मालक नानासाहेब भाऊराव मोरे यांना नोटीस बजावली होती. त्यात त्यांनी म्हंटले की, मौजे दिघी येथिल फॉरेस्ट वाटप करुन मिळालेल्या क्षेत्रामध्ये अनाधिकृत खडी क्रशर हे आम्हा पंचानुमते एक महिन्यापासुन चालू आहे.

सदर गट नं 91/3 मध्ये खडी क्रशरसाठी लागणारे दगड हे बाहेरगावावरुन आणून या ठिकाणी खडी तयार केलेली आहे. अंदाजे 40 ते 50 ब्रास खडी तयार करुन माका ते शिरसगांव रस्त्यासाठी वाहतूक केली जाते. त्याबाबत आपणाकडेस परवानगी पास आहे किंवा कसे यासह ही नोटीस मिळालेपासून सात दिवसाचे आत समक्ष हजर राहून खुलासा करावा.खुलासा सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा संयुक्तिक न वाटल्यास आपल्याविरुद्ध रुपये 7 लाख 72 हजार 250 रक्कमेचा दंड महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48(7) अन्वये कारवाई करणेत येईल अशी नोटीस तहसीलदार कार्यालयाने बजावली होती.

ठेकेदार कंपनीला नोटीस….
नेवासा तहसीलदारांनी दि.21 डिसेंबर रोजी माका-शिरसगाव रस्त्याचे काम करणार्‍या एम. एस. देशमुख अँड कंपनी, करमाळा चौक, सुरळी रोड, पोष्ट. टेंभुर्णी, ता. माढा जि, सोलापूर या ठेकेदार कंपनीला अनधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतूक केलेबाबत नोटीस बजावली आहे.
त्यात म्हंटले आहे की, मौजे दिघी येथील फॉरेस्ट वाटप करुन मिळालेल्या क्षेत्रामध्ये अनाधिकृत खडी क्रशर हे आम्हा पंचानुमते एक महिन्यापासून चालू आहे.

सदर गट नंबर 91/3 मध्ये खडी क्रशरसाठी केलेली अंदाजे 40 ते 50 ब्रास खडी तयार करुन माका-शिरसगाव रस्त्यासाठी वाहतूक केलो जाते तसेच खडीक्रेशर हे डिझेलवर चालू लागणारे दगड हे बाहेरगावावरुन आणून या ठिकाणी खडी तयार केली असून आज अंदाजे 30 ते 40 ब्रास तवार खडी आहे व दगड 10 ते 15 ब्रास असल्याबाबत पंचनामा करुन रिपोर्ट सादर केलेला आहे.तरी आपण 40 ब्रास खडी व 15 ब्रास दगड उत्खनन व वाहतूक करुन साठा केलेला आहे. त्याबाबत आपणाकडेस परवानगी पास आहे किंवा कसे याबाबत कागदपत्रासह ही नोटीस मिळाले पासून सात दिवसाचे आत समक्ष हजर राहुन खलासा करावा. खुलासा सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा सयुक्तिक न वाटल्यास आपले विरुद्ध रुपये 7 लाख 72 हजार 250 रक्कमेचा दंड महाराष्ट्र जमिन महसुलं अधिनियम 1966 चे कलम 48(7) अन्वये कारवाई करमण्यात येईल.

जमीन मालक व ठेकेदार कंपनीकडून शासनाची फसवणूकच – गायके
नेवासा तालुक्यातील दिघी येथील नानासाहेब मोरे यांच्या नावे आलेली गट नंबर 91/3 मधील जमीन ही फॉरेस्ट वाटप करून मिळालेले क्षेत्र आहे. 1980 च्या फॉरेस्ट अधिनियमानुसार या जममिनीचा वापर फक्त शेतीसाठी केला जातो. सदरची जमीन वन राखीव असल्याने त्यामध्ये फेरबदल करण्याच्या किंवा भाडे करार देताना जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घ्यावी लागते. परवानगी न घेता परस्पर बोगस भाडेकरार करून बिगरशेती कारण्यासाठी वापर करणे, एखाद्या कंपनीला व्यवसायिक कारणासाठी भाडे कराराने देणे ही शासनाची फसवणूक आहे. तसेच कुठली परवानगी नसतानाही नजीक चिंचोली शिवारातील शेती गट नवंर 69/2 मध्ये दगड खाणीचे बेकायदा उत्खनन करणे आणि त्यातील दगड खडी क्रशरसाठी व रस्त्याचे कामासाठी वापरणे ही बाब ही शासनाची फसवणूक करणारी आणि गौण खनिजाची चोरी करणारा प्रकार आहे. नेवासा तहसीलदार यांनी जमीन मालक आणि ठेकेदार कंपनीला नोटीस बजावून 7 लाख 72 हजार 250 रुपयांचा दंड वसूल करण्याची नोटीस बजावली आहे. वास्तविक पाहता दिघी आणि नजीक चिंचोली येथील दोन्ही कामे बेकायदेशीर असून नाटिशीमध्ये उल्लेख केलेल्या रकमेपेक्षा किती तरी पट जास्त रकमेचे गौण खनिजांची चोरी झालेली आहे.असे असताना तहसीलदार या लोकांना पाठीशी का घालत आहेत? तहसीलदारांनी खडी क्रेशर, वाहने जप्त करून संबंधितांवर एफआरआय दाखल करून 420 चा गुन्हा नोंदविण्याची आवश्यक असताना केवळ नोटीस बजावून वेळकाढूपणा करीत आहे.

जमीन मालकाचा खुलासा…
दिघी येथील शेती गट नंबर 91/3 जमीन मालक श्री. मोरे यांनी 17 डिसेंबर रोजी लेखी खुलासा सादर केला असून, त्यामध्ये मौजे दिघी येथील गट नं. 91/3 ही जमिन माझ्या मालकीची असून सदर जमीन ही सोलापूर येथील देशमुख अँड कंपनी यांना भाडेतत्त्वावर 11 महिने करारावर दिलेली आहे. सदर जमिनीवर सद्यस्थितीला शेतकर्‍यांना काही उत्पन्न मिळत नसून उपजीविकेसाठी दुसरा मार्ग नसल्याने तात्पुरता स्वरुपाचा करारनामा करण्यात आला आहे. आपल्या नोटिशीमध्ये दर्शविण्यात आलेली खडी व डबर संबंधित ठेकेदाराने माझ्या गट नं. 91/3 येथे आणून टाकली असून त्याची रीतसर रॉयल्टी भरलेले चलन जोडत आहे. माझ्या गट नं. मध्ये उत्खनन केलेले नाही. माझा वरील खुलासा मान्य करून प्रकरण निकाली काढण्यात यावे.

- Advertisment -

ताज्या बातम्या