उलटफेर जिल्ह्याच्या पथ्यावर !
Featured

उलटफेर जिल्ह्याच्या पथ्यावर !

Sarvmat Digital

ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या एका डावाने राज्याच्या राजकारणात मोठा उलटफेर घडवून आणला. हा उलटफेर नगर जिल्ह्याच्या चांगलाच पथ्यावर पडला, हे मंत्रिमंडळ विस्ताराने स्पष्ट केेले. राज्याच्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा जिल्ह्याच्या वाट्याला तीन मंत्रिपदे आली. नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख यांनी कॅबिनेट तर राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मध्यंतरी घसरणीला लागलेले मंत्रिमंडळातील नगरचे वर्चस्व पुन्हा एकदा निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल झाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील तत्कालीन विरोधी पक्ष चांगलेच हादरले होते. निकालात भाजपाच्या वर्चस्वाने दोन गोष्टी घडल्या. एक विरोधकांकडे गमवायला काही शिल्लक नव्हते आणि भाजपच्या मुदलात आकाराने लहान फुग्यात जास्तीची हवा भरली गेली. असा फुगा एकतर फुटतो किंवा भरकटतो. तो आधी स्वत:च्याच कतृत्वाने भरकटला आणि नंतर शरद पवारांच्या चाणाक्ष राजकारणाने फोडला. विधानसभा निवडणुकीनंतर झालेली राजकीय उलथापालथ राज्याने पाहिली. सेनेच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार आकाराला आले, तेव्हाच या सरकारसाठी 9 आमदारांचे बळ पुरविणार्‍या नगरला सत्तेचा योग्य वाटा मिळेल, याचा अंदाज आला होता. पण आज तो भरभरून मिळाला असेच म्हटले पाहिजे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासाठी जिल्ह्यातील राजकारणात वर्चस्वाचा काळ फिरून आला आहे. एकीकडे पक्ष आणि दुसरीकडे सरकार अशा दोन्ही ठिकाणी त्यांच्या शब्दाला आजच्याएवढे वजन कदाचित आधीही नसेल. मध्यंतरीची 5 वर्षे त्यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या कठीण ठरली. पण आज महाविकास आघाडीचे नेते म्हणून जिल्ह्याच्या राजकारणाचे सुकाणू आपल्या हाती असतील, अशी तजवीज त्यांनी करून घेतली आहे.

महाविकास आघाडीचे सरकार साकार करताना त्यांनी वठवलेली भूमिकाही निर्णायक होती. जिल्ह्यात काँग्रेसचे अवघे 2 आमदार असले तरी शरद पवारांचा त्यांच्यावर असलेला स्नेह त्यांची ताकद वाढविणारा आहे. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून काम करताना जिल्ह्यात ‘थोरात ठरवतील ती दिशा’ कोणी अमान्य करेल, असे वाटत नाही. आजच्या मंत्रिमंडळ विस्तारावरून एव्हाना ती अनेकांच्या लक्षात आलीच असेल. पण 2014 मध्ये सत्ता गेल्यानंतर 2019 मध्ये पुन्हा सत्ताधारी होण्यापर्यंतच ना.थोरात यांचा प्रवास संयमाची परीक्षा पाहणारा होता. तरुण राजकारण्यांना त्यातून शिकण्यासारखे खूप आहे. जिल्ह्याच्या राजकारणासाठी त्यांना आज अपेक्षित टीम मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षाही वाढल्या आहेत.

नेवाशाचे शंकरराव गडाख यांच्यासाठी आजची संधी म्हणजे राजकारणातील हनुमानउडी म्हणावी लागेल. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे मंत्रिपदाचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी त्यांना मिळाली. 2014च्या पराभवाआधीचे गडाख आणि आताचे गडाख यात जमीन-आस्मानचा फरक आहे. त्यात एकच गोष्ट बदलली नाही, ती म्हणजे त्यांचा मितभाषी स्वभाव. आज ते आधीपेक्षा अधिक खंबीर आहेत. राजकीय लाटेत बुजगावणेही धक्का देऊ शकतात, हा त्यांच्यासाठी 2014च्या पराभवातील पहिला धडा होता.

त्यासह अन्य गोष्टींकडेही दुर्लक्ष झाले. चुका मान्य करणे आणि त्याबरहुकूम सुधारणा घडवून आणणे, यासाठी ना. शंकरराव गडाखांनी 5 वर्षे वापरली. राजकारणातील बारकावे शिकण्यासाठी त्यांना हा काळ उपयोगी ठरला. ते तावूनसुलाखून निघाले आहेत. सेनेला पाठिंबा दिला, तेव्हाच ते मंत्री होणार याचा अंदाज आला होता. पण थेट कॅबिनेट मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा त्यांनीही बाळगली नसावी. राजकारणाचे वारे आपल्या दिशेने फिरले की अशक्य वाटणार्‍या गोष्टीही शक्य होतात, याचा अनुभव त्यांनी यानिमित्ताने घेतला.

नेवासा तालुक्याला त्यांच्यानिमित्ताने पहिल्यांदाच मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. कदाचित नगर जिल्ह्याचे उद्याचे पालकमंत्रीही तेच असतील. जिल्ह्यातील सेनेची काळजी वाहण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. ना. प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी आजही स्थिती चारों उंगलीया घी में और सर कढाईचे या उक्तीप्रमाणे आहे. जिल्ह्याने राष्ट्रवादीला यावेळी भरभरून मतदान केले. त्यामुळे जिल्ह्यातून एकाला संधी मिळणार, हे निश्चित होते.

यासाठी आ. रोहित पवार, आ. संग्राम जगताप अशी नावेही स्पर्धेत होती. मात्र संधीने आ. तनपुरेंच्या गळ्यात माळ टाकली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि सरकारमधील मातब्बर मंत्री जयंत पाटील यांचे भाचे असणे, एवढ्या जोरावर त्यांनी मंत्रिपद गाठले असा समज करून घेणे चुकीचे ठरेल. त्यांच्याकडे राज्यमंत्रिपद जाण्याआधी पडद्याआड अनेक गोष्टी घडल्या आहेत. त्यास जिल्ह्याच्या राजकारणाचे कंगोरे आहेत. पुढील राजकीय गणिते आहेत. 1952 मध्ये राज्याच्या पहिल्या मंत्रिमंडळात राहुरीच्या ल. मा. पाटलांना संधी मिळाली होती. त्यानंतर थेट 2019 मध्येच ही संधी पुन्हा मिळाली आहे.

एकाअर्थी ना. प्राजक्त तनपुरेंनी मंत्रिमंडळातील समावेशाचा दुष्काळ संपविला आहे. कालपर्यंत विरोधकांना त्यांच्यात आमदारकीचीही क्षमता दिसत नव्हती. आज ते मंत्री आहेत. ते तरुण आहेत. भविष्यात त्यांच्याकडून पक्षालाही अपेक्षा आहेत. त्यामुळे त्यांच्या पुढील वाटचालीवर संधी देणारे लक्ष ठेवून असतील. राजकीय मैत्रीतील ‘पथ्ये’ ते कसे पाळणार, याकडे लक्ष असेल.

ना. थोरात वगळता दोघांची मंत्री म्हणून ही पहिलीच टर्म आहे. नव वर्षाची यापेक्षा अधिक मोठी भेट त्यांच्यासाठी दुसरी असू शकत नाही. जिल्ह्याला सिंचनापासून रोजगारापर्यंत अनेक समस्या भेडसावत आहेत. त्यातून मार्ग निघावा, अशी जनतेची रास्त अपेक्षा आहे. एकमेकांच्या सहकार्यांने तीनही मंत्री त्यासाठी काम करतील, असा अपेक्षा बाळगूया !

विश्लेषण

– अनंत पाटील

Deshdoot
www.deshdoot.com