जिल्हाधिकारी नगरच्या रस्त्यावर!
Featured

जिल्हाधिकारी नगरच्या रस्त्यावर!

Dhananjay Shinde

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गुरुवारी दुपारीच जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू केलेले होते. असे असतानाही शुक्रवारी दुपारी नगर शहरात विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍या सुमारे 100 व्यक्तींचे जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी कान उपटत त्यांच्यावर पोलिसांकरवी प्रतिबंधात्मक कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले.
कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे संपूर्ण जग दहशतीखाली आहे. नगर जिल्ह्यात दोन जणांना विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर येताच, नगर शहरासह जिल्हाभर गर्दी रोखण्यासाठी अत्यावश्यक सुविधा सोडून अन्य सर्व सेवा, खासगी संस्था, गर्दीचे ठिकाणे 31 मे पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. या आदेशाचा शुक्रवार पहिला दिवस होता. नगर शहरातील बंदच्या स्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी शुक्रवारी दुपारी शहरातील विविध भागांची पायी फिरून पाहणी केली.
यावेळी शहरातील विविध भागात नागरिक रस्त्यावर पायी, दुचाकी आणि चार चाकी वाहनातून फिरताना त्यांना दिसले. या सर्वांना अडवत जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी त्यांचे कान उपटले. तसेच रस्त्यावर फिरण्याचे कारण विचारले. ज्यांची कारणे योग्य होती, त्यांना सोडून देण्यात आले. तसेच तातडीची गरज असल्यास त्यांना घरातून बाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या. तर उर्वरित विनाकारण फिरणार्‍यांवर कोतवाली आणि तोफखाना पोलीस ठाण्यात प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडून प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करु नये अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला.

कापड बाजारात बंद
नगर शहराचे वैभव असणार्‍या आणि सदैव वर्दळ असणार्‍या कापड बाजारात जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार शंभर टक्के बंद पाळण्यात आला. या ठिकाणी मेडिकल, किराणा आणि दुग्धजन्य पदार्थांची दुकाने वगळता उर्वरीत सर्व दुकाने बंद होती. मात्र, शहरातील विविध भागांत दुचाकीवर नागरिकांची वर्दळ पहावसाय मिळाली. कापडबाजार, पारशा खूंट, सर्जेपुरा, एमजी रोड, चितळे रोड, नवी पेठ, माळीवाडा या भागात दुकाने बंद होती. मात्र, काही प्रमाणात नागरिक दिसत होते.

यांच्या जेवणाचे वांदे !
नगर शहरात प्रतिबंधात्मक आदेश असल्याने शहरातील हॉटेल, खानावळी बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे शासकीय नोकरी निमित्त शहरात एकटे राहणारे, विद्यार्थी, खासगी आस्थापनामध्ये काम करणार्‍या नागरिकांच्या जेवणाचे वांदे झाले. शहरात कोठेच खाद्य पदार्थ मिळत नसल्याने या सर्वांना बिस्कीट खाण्याची वेळ आली. तसेच साध्या चहासाठी अनेकांना वणवण करण्याची वेळ आली.

रुग्णालयातील नातेवाईकांचे हाल
बंदमुळे खासगी रुग्णालयात दाखल असणार्‍या रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण, चहापाणी मिळणे अवघड झाले होते. शहरात अनेक ठिकाणी मोठे खासगी रुग्णालय असून त्या ठिकाणी दाखल असणार्‍या रुग्णांच्या नातेवाईंकाना जेवण आणि चहापाण्यासाठी वनवण करण्याची वेळ आली. जमेची बाजू एवढीच की अनेक ठिकाणी फळांच्या गड्या सुरू होत्या. त्या ठिकाणी फळे खाण्याची वेळ या सर्वांवर आली.

सरकारी कार्यालयात शुकशुकाट
राज्य सरकारने शासकीय कार्यालयात 50 टक्के कर्मचार्‍यांची उपस्थिती ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शासकीय कार्यालयांत शुकशुकटा होता. त्यात बंद असल्याने या ठिकाणी अभ्यंगातांनी येणे टाळले. जिल्हाधिकारी कार्यालयात नगण्य कर्मचारी उपस्थित होते, तर जिल्हा परिषदेत बाहेरच्यांना प्रवेश बंदी होती. तसेच येणार्‍या कर्मचार्‍यांच्या नावाची नोंद घेण्यात येत होती. एसटी बसदेखील रिकाम्या धावत होत्या.

Deshdoot
www.deshdoot.com