तर एकनाथ खडसेंचे काँग्रेसमध्ये स्वागत
Featured

तर एकनाथ खडसेंचे काँग्रेसमध्ये स्वागत

Sarvmat Digital

ना.थोरात : त्यांना पक्षातून मिळणारी वागणूक जनतेला न पटणारी

संगमनेर (प्रतिनिधी)- भाजप सत्तेवर येण्यासाठी एकनाथ खडसे यांनी मोेठे योगदान दिले आहे. आम्ही सत्तेत असताना त्यांनी विरोधीपक्षनेते म्हणून चांगले काम केले. मात्र आता त्यांना जी वागणूक पक्षात मिळते आहे ती सर्वसामान्यांना न पटणारी आहे. त्यांनी काँग्रेसमध्ये येण्याचा विचार केलाच तर अशा व्यक्तिमत्वाचे आम्ही स्वागतच करू, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी एकनाथ खडसे यांना पक्षाचे दरवाजे उघडे असल्याचे संकेत दिले आहेत.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे सध्या नाराज असल्याने ते पक्ष सोडण्याचा विचार करत असल्याचे माध्यमांमधून पुढे आले आहे. जर त्यांनी पक्ष सोडला तर ते काँग्रेस बरोबर येतील का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना काल संगमनेर येथे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, भाजपाची विचार प्रणालीच वेगळी आहे. कुठलाही कार्यकर्ता हा त्याच्या राजकीय जिवनात नेता होईपर्यंत खूप कष्ट घेतो. अनेक गोष्टींना सामोरे जातो. अशा परिस्थितीतून तो नेता म्हणून पुढे आल्यावर त्याचे कर्तव्य बजावतो. भाजप सत्तेवर येण्यासाठी एकनाथ खडसे यांचे मोठे योगदान राहिले आहे. परंतू पक्षात त्यांना जी वागणूक दिली जात आहे ती सर्वसामान्यांना न पटणारी आहे. त्यांनी काँग्रेसमध्ये येण्याचा विचार केला तर अशा अनुभवी व्यक्तीमत्वाचं आम्ही स्वागतच करु.

हिवाळी अधिवेशनाचा कालखंड अल्प स्वरुपाचा का? याबाबत ते म्हणाले, निवडणूकांनंतर बराच कालखंड हा जनतेपासून लांब गेल्यासारखा वाटला अशी सर्वांची भावना होती. त्यामुळे आता जनतेशी संवाद साधू. पुढच्या अधिवेशनाला पुरेसा काळ देता येईल, असे ते म्हणाले.

चव्हाणद्वयी अनुभवी नेते
मंत्रीमंडळाच्या विस्तारात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, अशोकराव चव्हाण यांचा समावेश होईल का? या प्रश्नावर ते म्हणाले, दोन्ही व्यक्तीमत्व अनुभवी आहेत. राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहे. त्यांनी चांगलं काम केलेले आहे. त्यांच्या नेतृत्वाचा उपयोग करुन घेतला गेला पाहिजे. मात्र हा सर्वस्वी निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असेही ते म्हणाले.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com