मुळा व प्रवरा नदीपात्रातून वाळू तस्करी सुरू

मुळा व प्रवरा नदीपात्रातून वाळू तस्करी सुरू

महसूल अधिकारी, पोलिसांवर नजर ठेवण्यासाठी पंटर सक्रीय

राहुरी (प्रतिनिधी)- राहुरी तालुक्यामध्ये मुळा व प्रवरा नदीपात्रामध्ये विसर्ग कमी होताच बेकायदा वाळू उपशाला उधाण आले आहे. रात्री-अपरात्री मुळा आणि प्रवरा नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा होत असून वाळू तस्करांचा नदीपात्रावर राबता सुरू झाला आहे.

महसूल व पोलीस यंत्रणेवर नजर ठेवण्यासाठी वाळू तस्करांचे पंटर सक्रीय झाले असून त्यांचा जागता पहारा सुरू झाला आहे. ही बेकायदा वाळू तस्करी बंद करण्याची मागणी पर्यावरणी प्रेमींनी केली आहे. मुळा व प्रवरा या दोन्ही नद्यांचे संपन्न पात्र राहुरी तालुक्यात आहे. गेल्या काही वर्षांपासून या दोन्हीही नदीपात्रातून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करण्याचा गोरखधंदा जोमात सुरू झाला असून वाळू उपसा करण्यासाठी आधुनिक वाहनांचा व यंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.

मागील दोन महिन्यांपासून मुळा व प्रवरा नदीपात्रातून मुळा व भंडारदरा धरण ओव्हरफ्लो झाल्याने पाणी वाहत होते. त्यामुळे वाळू तस्कर पाणी ओसरण्याची वाट पहात होते. मात्र, आता विसर्ग बंद झाल्याने गेल्या आठवड्यापासून नदीपात्रामध्ये वाळू तस्कर पुन्हा बेकायदा वाळू उपसा करीत आहेत.

राहुरी तालुक्यातील मुळा आणि प्रवरा नदीपात्रातील वाळूला पुणे, मुंबई, नाशिक येथून मोठी मागणी वाढली असून वाळूला सोन्याचे मोल आले आहे. त्यासाठी जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेर वाळूचा पुरवठा करणार्‍या एजंटांची साखळी कार्यान्वित झाल्याचे बोलले जात आहे.

नव्या पाण्यामुळे नदीपात्रात वाहून आलेल्या वाळू साठ्यांवर डल्ला मारण्यासाठी वाळू तस्करांची यंत्रणा मुळा व प्रवरा नदीपात्रात कार्यान्वित झाली आहे. मुळा नदीपात्रातील बारागाव नांदूर, डिग्रस, देसवंडी, कोंढवड, आरडगाव, मानोरी, वळण आदी परिसरात अवैध वाळू उपशाला प्रारंभ झालेला आहे. तर प्रवरा पात्रातील करजगाव, लाख, जातप, सात्रळ, सोनगाव या परिसरातून वाळू तस्करांनी नदीपात्राचे लचके तोडण्यास सुरूवात केली आहे.

राहुरी महसूल विभागाकडून वाळू साठ्यांचे लिलाव अनेक दिवसांपासून रेंगाळलेले आहेत. अनेक ठिकाणी ग्रामस्थांचा विरोध तर दुसरीकडे लिलाव झाल्यानंतर स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्यांच्या जाचामुळे लिलाव प्रक्रिया होत नाही. त्यामुळे लिलाव रखडल्याचा सर्वाधिक लाभ वाळू तस्करांना मिळत आहे. बर्‍याच वर्षानंतर दोन्ही नदीपात्रामध्ये मुबलक पाणी जमा झालेले आहे. त्यामुळे वाळूही वाहून आल्याने वाळू तस्करांना अच्छे दिन आले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com