मान्सूनची वाटचाल केरळच्या दिशेने
Featured

मान्सूनची वाटचाल केरळच्या दिशेने

Dhananjay Shinde

सार्वमत

नवी दिल्ली – अंदमान-निकोबारमध्ये दाखल झाल्यानंतर अम्फान चक्रीवादळाच्या प्रभावामुळे रखडलेला मान्सून आता पुन्हा सक्रिय होणार आहे. बुधवारपासून (27 मे ) त्याची पुढील वाटचाल केरळच्या दिशेने सुरू होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून देशभरात सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, आसाम आणि मेघालयासह उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये उद्या बुधवारपासून पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने मंगळवारी दिला आहे.

बुधवारपासून 30 मे पर्यंत उत्तरेकडील बहुतांश भागात धुळीचे वादळ आणि मेघगर्जनेसह कुठे मुसळधार, तर कुठे अतिवृष्टी होईल, अशी माहिती हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी दिली. बंगालच्या उपसागरातून वार्‍यांची स्थिती बदलेल आणि वादळी वारे वाहू लागतील. त्याच्या परिणामाने धुळीचे वादळ आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल. यावेळी वार्‍यांची गती ताशी 60 ते 65 किमी इतकी असेल. विशेषत: आसाम आणि मेघालयला या पावसाचा सर्वाधिक फटका बसेल, असे त्यांनी सांगितले.

अंदमानात दाखल झाल्यानंतर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यातून अम्फान चक्रीवादळ तयार झाले आणि त्याच्या प्रभावामुळे मान्सूनची श्रीलंका आणि केरळमधील वाटचाल रखडली होती. आता मात्र अतिशय पोषक वातावरण निर्माण झाले असून, बुधवारपासून त्याच्या पुढील प्रवासाला सुरुवात होणार आहे. या चक्रीवादळामुळे अंदमान-निकोबारच्या काही भागांमध्ये अद्यापही मान्सून पोहोचला नव्हता. हा भाग देखील तो काही तासांतच व्यापणार असल्याचे ते म्हणाले.

Deshdoot
www.deshdoot.com