परप्रांतीयांची नोंदणी करा – राज ठाकरे

jalgaon-digital
2 Min Read

सार्वमत

मुंबई – परप्रांतीयांची राज्य स्थलांतरीत कायद्यांतर्गत नोंदणी करून घेण्याची हिच वेळ आहे. आतापर्यंत जो गुंता झाला आहे तो यानिमित्तानं सोडवता येऊ शकतो अशी सूचना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राज्य सरकारला अनेक सुचना केल्याचंही त्यांनी सांगितलं.

राज्यातील परप्रांतीय राज्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. या संधी महाराष्ट्रातील तरूणांपर्यंत पोहोचवाव्या. त्यामुळे राज्यातील तरुणांनाही रोजगार मिळेल, अशी सूचनाही त्यांनी केली.
ते म्हणाले, महाराष्ट्रातून जे परप्रांतीय बाहेर गेले आहेत ते परत येतील किंवा ज्यावेळी आणले जातील त्यावेळी त्यांची प्रथम तपासणी करावी, त्याशिवाय त्यांना परत घेऊ नये. संबंधित राज्यांमध्ये काय परिस्थिती आहे याची आपल्याला कल्पना नाही. आपल्याकडे चाचण्या होत असल्या तरी त्या ठिकाणी काय चाललंय याची आपल्याला कल्पना नाही, परप्रांतीय महाराष्ट्रातून बाहेर गेल्यानं राज्यातील कारखाने, उद्योगधंदे बंद होऊ नये यासाठी राज्यातील तरूण वर्गापर्यंत रोजगार उपलब्ध असलेल्या ठिकाणांती माहिती पोहोचवा, आपल्याकडे विदर्भ, मराठवाजा या ठिकाणी असलेल्या तरूणांपर्यंत अनेकदा माहिती पोहोचत नाही. त्यामुळे ती तरूण वर्गापर्यंत पोहोचवावी.
प्रत्येक ठिकाणी माणुसकी नसते
तुम्ही ज्यावेळी इतर ठिकाणी जाता त्यावेळी तुमच्याकडे माणुसकीच्या दृष्टीकोनातून पाहिले जातेच असे नाही. प्रत्येक ठिकाणी माणुसकी ही माणुसकी नसते, असेही ते म्हणाले.

एसआरपीएफची नेमणूक करा –
मागील दीड महिन्यापासून नियुक्त करण्यात आलेले पोलीस थकलेले आहेत. पोलिसही अतिरिक्त कामामुळे तणावाखाली आहेत. सध्या रमजानचा काळ सुरु आहे. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये काहीजण पोलिसांना अगदीच गृहीत धरायला लागलेत. अशा ठिकाणी राज्य राखीव पोलीस दलाची (एसआरपीएफ) नेमणूक करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. एसआरपीएफच्या तुकड्या तैनात केल्याने पोलिसांना गृहीत धरल्या जाणार्‍या भागांमध्ये दरारा निर्माण होऊन लोकं घाराबाहेर येणार नाहीत, असं मतही राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं. सध्याचा काळ हा रमजानचा असून अनेक लोकं घराबाहेर येत आहेत. आपण अनेक सण घरामध्ये साजरे केले. मुस्लीम समाजाने या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. विचार होत नसेल तर अशा ठिकाणी अतिरिक्त फोर्स लावणे गरजेचे आहे, असंही ते म्हणाले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *