आ. जगताप यांना पक्षाने सुनावले खडे बोल

आ. जगताप यांना पक्षाने सुनावले खडे बोल

सार्वमत

वाढदिवसाचा उत्सव आला अंगलट : गुन्हा दाखल झाल्याने पवार यांच्यासह वरिष्ठ नेत्यांमध्ये संताप

अहमदनगर (प्रतिनिधी) – वाढदिवस साजरा करताना फिजीकल डिस्टन्स न पाळणे, मास्कचा वापर न करणे आ. संग्राम जगताप आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या चांगलेच अंगलट आले. पोलिसांनी गुन्हा दाखल तर केला आहेच, पण पक्षानेही याची गंभीर दखल घेत आ. जगताप यांना खडे बोल सुनावल्याचे सुत्रांकडून समजते. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही यास दुजोरा दिला आहे.

आ. संग्राम जगताप यांचा शुक्रवारी वाढदिवस होता. एरवी फ्लेक्स, कार्यकर्त्यांचा गोतावळा असा साजरा होणार्‍या वाढदिवसाच्या पद्धतीला यावेळी करोनाच्या पार्श्‍वभूमीवर फाटा दिला जाईल, असे वाटत होते. मात्र वाढदिवसाचा उत्सव साजरा करण्याची हौस कार्यकर्त्यांच्या माध्यमातून यावेळीही भागविण्यात आली. शहरात काही ठिकाणी फ्लेक्स लावण्यात आले. एकीकडे नगर शहरात करोनाचे रूग्ण वाढत असताना दुसरीकडे नगरकरांना वाढदिवसाच्या फ्लेक्सचे दर्शन झाले. एवढ्यावर ही हौस थांबली नाहीत, तर वाढदिवसाला उत्सवाचे स्वरूप देण्यात आले.

आ. संग्राम जगताप यांचे कार्यालय असलेल्या आयुर्वेद महाविद्यालय परिसरात कार्यकर्त्यांचा गोतावळा जमा करण्यात आला. गर्दीने येणारे कार्यकर्ते फिजीकल डिस्टन्सचा फज्जा तर उडवीत होतेच, पण चेहर्‍यावर मास्क न लावता सर्वत्र फिरत होते. एकमेकांना भेटतानाच आपल्या लाडक्या नेत्यांवर शुभेच्छांचा वर्षाव करत होते. आ. जगताप यापूर्वीही अनेक कार्यक्रमात विना मास्कचे सहभागी होत असल्याचे दिसून आले आहे. तसे छायाचित्रही अनेकदा प्रसिद्ध झाले आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे एकीकडे आवाहन करताना शहराचा लोकप्रतिनिधी मात्र विना मास्क कार्यकर्त्यांच्या गराड्यात फिरत असल्याचे पाहून नागरिकही आवाक होत असत.

आ. जगताप यांचे निवासस्थान असलेल्या भवानीनगर या भागातही मध्यंतरी करोना रूग्ण आढळळे. जिल्हा व महापालिका प्रशासनाने हा परिसर कंटेन्मेंट झोन घोषित करून सील केला होता. त्याचवेळी समाजात वावरताना काळजी घेतली जावी, असे आवाहन प्रशासनाकडून केल्याचेही सांगितले जाते. मात्र त्याकडे डोळेझाक करण्यात येत होती. दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री हसन मुश्रीफ नगर दौर्‍यावर असताना जिल्हाधिकारी कार्यालयातही ते कार्यकर्त्यांसह आले त्यावेळी त्यांच्या आणि काही कार्यकर्त्यांच्या चेहर्‍यावर मास्क नव्हता. याबाबतच्या तक्रारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत गेल्याची चर्चा होती. पालकमंत्री मुश्रीफ यांनीही पक्षाकडे बोलताना या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केल्याचे सांगण्यात येते.

याच कारणावरून आ. संग्राम जगताप आणि 25 कार्यकर्त्यांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने हे प्रकरण प्रकर्षाने पुढे आले. पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह इतर नेत्यांनीही याची दखल घेतली. लोकप्रतिनिधीच असे वागू लागले तर जनतेला कसे आवाहन करणार, असा प्रश्‍न यामुळे निर्माण झाला. ‘दोन वेळा आमदार झालेल्याने असे वागू नये’ अशी संतप्त प्रतिक्रिया शरद पवार यांनी व्यक्त केल्याचे पक्षाचे नेते सांगतात. तसेच याबाबत समज देण्याचे राज्यातील नेत्यांना सांगण्यात आले. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याची दखल घेत आ. संग्राम जगताप यांना खडे बोल सुनावल्याचे पक्षातून सांगण्यात येते.

मला माहित नाही : पालकमंत्री
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी या संदर्भात संपर्क साधून प्रतिक्रिया विचारली असता गुन्हा दाखल झाल्याबाबत मला काहीच कल्पना नसल्याचे ते म्हणाले. मी आज दिवसभर कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात होतो. या प्रकाराची संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच बोलेन, असे ते म्हणाले.

पोलिस कोणाच्या दबावाखाली
आ. संग्राम जगताप यांच्यावर शनिवारी गुन्हा दाखल झाल्यानंतर ही माहिती लपविण्याचा आटोकाट प्रयत्न पोलिसांकडून झाला. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविणकुमार लोखंडे यांनी तर चक्कपणे कानावर हात ठेवले. आपल्या पोलीस ठाण्यात शहरातील आमदारांवर गुन्हा दाखल झालेला असताना मला काहीच माहिती नाही, असे ते सांगत होते. वरिष्ठ पोलीस अधिकारीही याबाबत स्पष्टपणे बोलण्यास तयार नव्हते. पोलिसांवर नेमका कोणाचा दबाव होता, याबाबत शहरात रविवारी उलटसुलट चर्चा होती. काही मंत्र्यांनी त्यांच्यावर दबाव आणल्याचे बोलले जात होते, तर आ. जगताप यांच्या कार्यकर्त्यांकडूनच हे प्रकरण दडपण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकण्यात आल्याचेही बोलले जात होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com