मतदारसंघातील विकासकामांची स्थगिती उठवा- आ. मोनिका राजळे
Featured

मतदारसंघातील विकासकामांची स्थगिती उठवा- आ. मोनिका राजळे

Sarvmat Digital

आमदार मोनिका राजळे यांची नागपुर हिवाळी अधिवेशनात सरकारकडे मागणी

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी)- शेवगांव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून सलग दुसर्‍यांदा निवडून आलेल्या आमदार मोनिका राजळे यांनी मागील सरकारच्या काळात मंजूर झालेल्या लेखाशीर्ष 2515 तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, पाणीपुरवठा योजना या सारख्या लोकाभिमुख योजनांना सध्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारने दिलेली स्थगिती उठविण्यासाठी तसेच मतदारसंघातील प्रलंबित विकास कामे होण्यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात दिनांक 20 व 21 डिसेंबर रोजी मागणी केली.

यावर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मतदारसंघातील 137 गावे बाधित झाली. झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी पाथर्डी तालुक्याला 50 कोटी रुपयांच्या मागणीपैकी 19 कोटी तर शेवगाव तालुक्यातील 48 कोटी रुपयांच्या मागणी पैकी 18 कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी उर्वरीत रक्कम सरकारने लवकरात लवकर द्यावी.

आमदार मोनिका राजळे म्हणाल्या, मागील शासनाचे काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच लोकनेत्या ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून लेखाशीर्ष 2015 अंतर्गत गावांतर्गत रस्ते, स्मशानभूमी, समाजमंदिर आदी कामे झाली. तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, जलयुक्त शिवार योजना या माध्यमातून अनेक कामे झाली तर काही कामांना मंजुरी मिळून निधी मिळाला. जी कामे होणे बाकी आहेत अशा कामांना शासनाने स्थगिती देऊ नये. शेवगाव तालुक्यातील 4 व पाथर्डी तालुक्यातील 5 पाणी योजनांनावरील दिलेली स्थगिती उठवावी अशी मागणी त्यांनी केली.

पाथर्डी शहराची लोकसंख्या 27 हजारांपेक्षा जास्त आहे, तर शेवगाव शहराची लोकसंख्या 39 हजारांपेक्षा जास्त आहे. या शहरांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी मागील शासनाच्या काळात 63 कोटी व 69 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, त्यास स्थगिती देऊ नये तसेच युतीच्या काळात 1996 मध्ये झालेल्या शेवगाव पाथर्डी 54 गावे योजना तसेच बोधेगाव 7 गावे पाणीपुरवठा योजना, शहरटाकळी 22 गावे पाणीपुरवठा योजना, हातगाव 24 गावे पाणीपुरवठा योजना, मिरी तिसगाव पाणीपुरवठा योजना या सुरळीत चालू राहण्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा.

या जीवन प्राधिकरणामार्फत चालविल्या जाणार्‍या योजनांवरील व्यावसायिक ऐवजी घरगुती वापराच्या दराने पाणी द्यावे, अशी मागणी आमदार राजळे यांनी केली. यावेळी त्यांनी शेवगाव व पाथर्डी शहराचा बाह्यवळण प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. तसेच जुना 222 व सध्याचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 असलेला कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय मार्गाचे काम तीन वर्षापासून बंद असून प्रलंबित कामामुळे अनेकांना जीव गमवावे लागले आहेत.

त्यामुळे सदर काम व्हावे, तसेच पैठण पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर मतदारसंघातील पाथर्डी तालुक्यातील भालगाव, मिडसांगवी, कासाळवाडी तसेच शेवगाव तालुक्यातील मुंगी, हातगाव, बोधेगाव, लाडजळगाव, शेकटे या गावातील शेतकर्‍यांच्या जमिनी जात आहेत, त्यांना योग्य मोबदला मिळावा. या महामार्गावर शेतकर्‍यांची किती जमीन जाते याचा संभ्रम असल्याने भूसंपादन विभागाकडून संबंधित शेतकर्‍यांचा संभ्रम दूर करावा. तसेच नवगण राजुरी बीड या महामार्गाच्या मतदारसंघातून जाणार्‍या भागाचा भू संपादन प्रश्न मार्गी लावण्याची मागणी आमदार मोनिका राजळे यांनी अधिवेशनात केली.

यावेळी त्यांनी पाथर्डी येथील जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहात सध्या कार्यरत असलेल्या पाथर्डी भाग पाथर्डी उपविभागीय कार्यालयासाठी नवीन इमारत मंजूर करावी तसेच तिसगाव येथील विश्रामगृहाचे काम करण्याची मागणी केली. मतदारसंघातील जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर तसेच चौफेर विकास कामांबाबत हिवाळी अधिवेशनात आमदार राजळे यांनी आवाज उठविल्याबद्दल पाथर्डी व शेवगाव तालुक्यांतील जनतेकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

Deshdoot
www.deshdoot.com