विमान प्राधिकरणाने प्रकल्पग्रस्तांच्या हिताचे निर्णय घ्यावे : आ. काळे

विमान प्राधिकरणाने प्रकल्पग्रस्तांच्या हिताचे निर्णय घ्यावे : आ. काळे

कोपरगाव (प्रतिनिधी)- विमानतळ उभारणीच्यावेळी विमान प्राधिकरणाने प्रकल्पबाधीत शेतकर्‍यांना जी आश्वासने दिली होती त्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही करण्यात आली नाही. त्यामुळे विमान प्राधिकरणाने या प्रकल्पबाधित शेतकर्‍यांच्या व ग्रामस्थांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी विमान प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

आ. आशुतोष काळे यांनी काकडी विमानतळाचे संचालक दीपक शास्त्री, टर्मिनल व्यवस्थापक एस. मुरली कृष्णा व सहाय्यक कार्यकारी अभियंता कौस्तुभ ससाणे आदी विमान प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांसमवेत बैठक घेऊन विमानतळासंदर्भात असलेल्या अडचणींचा आढावा घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.त्यावेळी आ. काळे यांनी अधिकार्‍यांना सूचना केल्या.

शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाची विमानसेवा बंद आहे. ही सेवा तातडीने सुरू करावी तसेच रात्रीची सेवा सुरू करावी, काकडी ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची सोय करावी. रन वे वरचे पाणी वळवून काकडी गावातील पाझर तलावात सोडावे. टॅक्सी चालक, छोटे कॉन्ट्रॅक्ट स्थानिकांना देण्यात यावे. काकडी प्रकल्पग्रस्त भूमीपुत्रांचे प्रश्न मार्गी लावावेत.

स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्यात यावे. प्रकल्पबाधित ज्या शेतकर्‍यांना अजूनही मोबदला मिळालेला नाही त्या शेतकर्‍यांना त्वरीत मोबदला देण्यात यावा. नवीन भूसंपादन करताना जमिनीचा दर जास्तीत जास्त देण्यात यावा व काकडी परिसरात रस्त्याच्या दुतर्फा विजेचे बल्ब बसवावेत अशा प्रकारच्या स्थानिक प्रकल्प ग्रस्तांना आवश्यक असणार्‍या अनेक सूचना आ. आशुतोष काळे यांनी विमान प्राधिकारणाला दिल्या. यावेळी सुनील शिंदे, बाबासाहेब गुंजाळ, प्रभाकर गुंजाळ आदींसह काकडी परिसरातील प्रकल्पबाधीत शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com