संगमनेरात रंगल्या युवा आमदारांच्या मुुलाखती
Featured

संगमनेरात रंगल्या युवा आमदारांच्या मुुलाखती

Dhananjay Shinde

संगमनेर (प्रतिनिधी) – संगमनेरमध्ये अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने शुक्रवारी आयोजित केलेल्या मेधा-2020 युवा सांस्कृतिक महोत्सवात नव्याने निवडून आलेल्या महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांसह सहा तरुण आमदारांशी संवाद साधण्यात आला. या कार्यक्रमात प्रसिद्ध पार्श्वगायक अवधूत गुप्ते यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, आ. रोहित पवार, आ. धीरज देशमुख, आ. ऋतुराज पाटील, आ. झिशान सिद्दकी यांना बोलतं केलं. यातून बेधडक आणि मिश्किल जुगलबंदीही रंगली. यावेळी या नेत्यांनी हजरजबाबी उत्तरं दिली आणि उपस्थितांची मनं जिंकून घेतली. दिलखुलास उत्तरांनाही उपस्थित तरुणाईने भरभरून दाद दिली.यावेळी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, युवक काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, सौ. कांचनताई थोरात, राजवर्धन थोरात, रणजितसिंह देशमुख, इंद्रजितभाऊ थोरात, विश्वस्त शरयुताई देशमुख, बाजीराव खेमनर, लक्ष्मणराव कुटे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. या मुलाखतीची सुरुवात ‘इस बंदे मे है कुछ बात, ये बंदा लय जोरात, बाळासाहेब थोरात’ या गीताने टाळ्यांच्या कडकडात झाली.

काँग्रेस – राष्ट्रवादी पक्ष जनतेचा
विचार करणारे – आदित्य ठाकरे

राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन टोकाचे पक्ष म्हटले जातात. पण वेगवेगळ्या विचारधारा एकत्र येऊन काम करतात, तीच खरी लोकशाही आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी लोकांचा विचार करणारे पक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणं सोपं आहे, असे मत शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरेंनी व्यक्त केले.
आगामी निवडणुकांचे संकेत देत मित्रपक्षांशी अशीच दोस्ती कायम असणार का? असा सवाल विचारला. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही युतीत असलो तरी खरे फॅमिली फ्रेंड आहोत. मित्र काँग्रेस-राष्ट्रवादीत होते. विलासराव देशमुखांनी कधीही ग्रेस सोडली नाही. आम्ही विरोधात असतानाही त्यांच्यासोबतच आहोत असे वाटायचे. याशिवाय शरद पवार साहेब आणि माझे आजोबा (बाळासाहेब ठाकरे) यांची मैत्री जगजाहीर आहे. या मैत्रीत वेगळच प्रेम होते. आता आमचेही वेगळे नाते निर्माण झाले आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन टोकांचे पक्ष असे म्हणले जाते, परंतु वेगवेगळ्या विचारधारा एकत्र येऊन काम करतात तीच खरी लोकशाही आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी हे दोन पक्ष जनतेचा विचार करणारे पक्ष आहेत. महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी मैत्री, नाती एकत्र आली आहेत. महाराष्ट्रानंतर झारखंडमध्ये बदल घडला आहे. देशाचे चित्र बदलत आहे. भविष्यात आणखी बदल होतील. यातून असे संकेत मिळत आहेत की राज्यात जिल्हा परिषद निवडणूकांपाठोपाठ आगामी काळात मुंबईसह इतर महानगरपालिका निवडणूकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढू शकतात.
राहुल गांधीच्या भेटीबद्दल बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मी राहुल गांधींना भेटलो, त्यांच्याशी बोललो. विचार वेगळे असतील, मात्र विकास हे ध्येय समान आहे.
बाबा लगीन ठरवणार…
आदित्य आणि अभिनेत्री दिशा पटनी यांच्या मैत्रीबद्दल कायम चर्चा होत असते. अनेकदा त्या दोघांचे फोटेही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे या कार्यक्रमातल्या मनमोकळ्या चर्चेत लग्नाचा विषय आला नसता तरच नवल. त्यावर जुगलबंदी रंगली. मात्र एका प्रश्नावर आदित्य क्लिन बोल्ड झाल्याचं बघायला मिळालं. या संवादाला तरुणाईचीही चांगलीच दाद मिळाली.
अवधूत गुप्ते म्हणाले की, आईने किती दिवस आता जबाबदारी घ्यायची? त्यावर आदित्य म्हणाले, आता सगळी जबाबदारी आईने मुख्यमंत्री साहेबांवर टाकली आहे. त्यावर सगळीच जबाबदारी म्हणजे? असा प्रश्न अवधूतने विचारला. त्यानंतर त्याने सोशल मीडियावरच्या चर्चेचा उल्लेख करत हिंदीत कमेंट केली. आपका उत्तर हमको ‘पटनी’ चाहिये? असं म्हणत त्याने दिशा पटनी आणि आदित्यबद्दलच्या चर्चेचा उल्लेख केला, त्यावर आदित्यनेही अवधूतला तुझ्या प्रश्नांची ‘दिशा’ चुकली असे सांगून वेळ मारून नेली. त्यांचा यावेळी झालेला लाजराबुजरा भाव तरूणाईला चांगलाच भावला.यावर प्रेक्षकांमधून तरुणांनी दिशा…दिशा…अश्या घोषणा दिल्या.

संगमनेरातून रोहित पवारांनी
केला मोदींना फोन!
महाराष्ट्रात सत्तास्थापनेवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यावरून राज्यात खळबळ उडाली होती. खुद्द मोदींनीही बारामतीतील कार्यक्रमात पवारांचे बोट धरून राजकारणात आल्याचे म्हटले होते. याच पवारांच्या नातवाने व्यासपीठावरून थेट पंतप्रधान मोदींना फोन लावला आणि ‘मोदी साहेब नमस्ते, मी रोहित पवार बोलतोय…नाव आपण ऐकलं असेल’, असे मराठीत विचारताच सभागृहात उपस्थितांनी एकच आरोळी ठोकली.
संगमनेरमध्ये अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने शुक्रवारी आयोजित केलेल्या मेधा – 2020 युवा सांस्कृतिक महोत्सवात तरुण, तरुणींसाठी मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार आणि शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. या दोघांची गायक अवधूत गुप्ते यांनी मुलाखत घेतली.

या कार्यक्रमात अवधूत गुप्ते यांनी सर्वाना एक टास्क दिला. एखाद्या व्यक्तीला फोन लावतोय असं भासवत त्यांच्याशी संवाद साधायचा, असा तो टास्क होता. या टास्कवेळी कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन लावला.
रोहित पवार नरेंद्र मोदींना काय म्हणाले?
‘नमस्ते मोदी साहेब, रोहित पवार बोलतोय. नाव आपण ऐकलं असेल. साहेब काही नाही, थोरात साहेबांनी संगमनेरमध्ये कार्यक्रम ठेवला होता. त्याठिकाणी आलो होतो. अनेक युवक-युवती आले आहेत. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. त्यामुळे गेली पाच वर्ष जो विकास झाला नव्हता तो आता होईल.
‘आमच्या युवक-युवतींना उद्याच्या काळात चांगली नोकरी मिळावी यासाठी जे इंडस्ट्रियल धोरण आहे ते गेल्या काही वर्षांमध्ये अडचणीचे झालं आहे. त्या धोरणांमध्ये आपण बदल कराल अशी इच्छा आहे. त्यामुळे राज्याच्या युवक-युवतींना नोकरी मिळेल. शेतकर्‍यांच्या अडचणींकडे लक्ष द्या. आम्ही सर्वजण खूश आहोत. इथली लोकंदेखील खूश आहेत. पण आपण केंद्र सरकारमध्ये थोडेसे बदल करावेत. चारच वर्षे राहिली आहेत. आपण लक्ष द्याल आणि देशाची जनतेची काळजी घ्याल. आपण बिझी असाल आपला जास्त वेळ घेत नाही. धन्यवाद! या फोन कॉलवर सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवत चांगला प्रतिसाद दिला.
शरद पवारांनी कोणत्याही संकटापुढे
झुकायचं नाही हे शिकवलं – रोहित पवार
दरम्यान, आजोबा शरद पवारांनी कोणत्याही संकटापुढे झुकायचं नाही असं शिकवलं असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि नातू रोहित पवार यांनी सांगितलं आहे. अनेक जणांना वाटायचं की पवारसाहेब निवृत्त होतील. पण शरद पवार यांनी कोणत्याही संकटापुढे झुकायचं नाही हे शिकवलं असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
रोहित पवार यांनी यावेळी बोलताना सांगितलं की, अनेक लोकांना शरद पवार निवृत्त होतील असं वाटलं होतं. पण ते म्हणाले आपण हार मानायची नाही. कितीही संकटं आली तरी झुकायचं नाही, प्रामाणिक वागा, लोकांमध्ये जा, मग कोणीही तुमचा पराभव करु शकत नाही, हे पवार साहेबांकडे पाहून आम्हाला कळतं.
कर्जत जामखेडमध्ये तीस वर्षांपासून विकास नव्हता, त्यामुळे मतदारसंघात विकास करण्याची संधी होती. मी विकासाचे मॉडेल तयार करण्याचे ठरवले होते. त्यामुळे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. कर्जत-जामखेड मधील जनता माझ्या पाठिशी असल्यामुळे माझा विजय झाला.
तुम्ही ज्या वेळी निवडून आलात तेव्हा तुमच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आले होते हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले असल्याचा भावनिक प्रश्न रोहित यांना विचारण्यात आला. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की मी जिंकलो म्हणून माझ्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आले नव्हते. तर लोकांनी मला मोठ्या प्रेमाने, मताधिक्याने निवडून दिले त्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते.
कर्जम जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार आणि भाजप नेते राम शिंदे यांच्या कडा मुकाबला झाला होता. यात रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्या पराभव केला. खुद्द मुख्यमंत्री फडणवीस निवडणूकीच्या आखाड्यात उतरले होते. तुम्ही राम शिंदेना निवडून दिलं तर त्यांना आणखी चांगलं कॅबिनेट पद देऊ तसेच कर्जत जामखेडमध्ये बाहेरुन आलेले पार्सल परत पाठवा असे आवाहन त्यांनी केले होते. परंतु कडवी झुंज देत रोहित पवार यांनी विजय खेचून आणला.
हडपसरचे जावई असूनही कर्जत जामखेडमधून निवडणूक का ?
यावेळी अवधूत गुप्ते यांनी रोहित पवार यांनी हडपसरचे जावई असूनही कर्जत जामखेडमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला? असा मिश्कील प्रश्न विचारला. यावर रोहित पवार यांनी ज्यांचं लग्न झालं आहे, त्यांना कळेल सासुरवाडीचं गणित जमवणं किती अवघड असतं असं सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. अहमदनगर जिल्हा नावात सोपा आहे मात्र राजकारणात खूप अवघड असल्याचेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांचा मुलगा..धक्का
बसणारच नाही – आदित्य ठाकरे
प्रत्येक घटनेकडं शांतपणे पाहणार्‍या व त्यावर संयमी प्रतिक्रिया देणार्‍या उद्धव ठाकरे यांचा मी मुलगा आहे. त्यामुळं मला कुठल्याही गोष्टीचा धक्का वगैरे बसत नाही, असं राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
‘रॅपिड फायर’ फेरीत विचारण्यात आलेल्या प्रश्‍नांना आदित्य ठाकरे यांनी हजरजबाबी उत्तरं दिली आणि उपस्थितांची मनं जिंकून घेतली. अजित पवार यांनी भल्या पहाटे शपथ घेतली तेव्हाचा धक्का मोठा होता की संजय राऊत लीलावतीमध्ये दाखल झाल्याचा? या प्रश्‍नावर आदित्य यांनी खास ठाकरी शैलीत उत्तर दिलं. ‘उद्धव ठाकरे यांचा मुलगा असल्यानं मी कुठल्याही गोष्टीचा धक्का घेत नाही. त्यामुळं मला या दोन्ही घटनांचा धक्का बसला नाही. शिवाय, आमची मैत्री पक्की असल्यानं धक्का लागण्याचं काही कारण नव्हतं. धक्का बसलेले विधानभवनात आमच्या समोर आहेत, असा टोला त्यांनी भाजपला हाणला.
राज ठाकरे की नारायण राणे यांच्यापैकी कोणाचा राग जास्त येतो, असं विचारलं असता आदित्य म्हणाले, राजकारणात जे काही घडतं, तो त्याचा एक भाग असतो. त्याचा राग मनात ठेवायचा नसतो. मी सुद्धा या सगळ्याकडं त्याच दृष्टिकोनातून पाहतो.
पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे या दोन नेत्यांपैकी कोण अधिक जवळचं आहे, या प्रश्‍नावरही आदित्य ठाकरे यांनी अत्यंत हुशारीनं उत्तर दिलं. ‘महाविकास आघाडी’साठी सध्या हे दोन्ही नेते जवळचे आहेत, असं ते म्हणाले.
माझा जोडीदार मीच
निवडणार – आदिती तटकरे
आदित्य ठाकरे यांच्या लग्नाचा विषय त्यांच्या आईकडे सोपविला आहे. मी मात्र, माझा जोडीदार स्वतःच निवडणार आहे, असे बेधडक उत्तर उद्योग व खाण राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिले. ना. अदिती तटकरे म्हणाल्या, लहानपणापासूनच घरात राजकीय वातावरण होते वडिलांची दिवस-रात्र काम करण्याची पद्धत यामुळे मी राजकारणात आले. शरद पवार हे अतिशय आदर्श व्यक्तिमत्व असून तीन पिढ्यांची समरस होणारे ते एकमेव नेते आहेत. तरुण आमदारांमध्ये पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, आमदार झिशान सिद्दकी, मंत्री आदिती तटकरे या अविवाहितांना त्यांच्या लग्नाच्या विषयावर छेडण्यात आले. या प्रश्‍नावर आदिती तटकरे यांनी मात्र बेधडक उत्तर दिले.
बाबा (स्व. विलासराव देशमुख)
आमचे हिरो – धीरज देशमुख
बाबांचा प्रवास आमदारकी, मंत्रिपद ते मुख्यमंत्री असा झालेला मी पाहिलाय. एक मुलगा म्हणून खंत असायची की माझे बाबा माझ्यासोबत कमी वेळ घालवतात. मला वडिलांचा सहवास फार मिळाला नाही. पण आज निवडणूक लढताना, सभागृहात जाताना मला बाबा समजायला लागले, त्यामुळे बाबांनी समाजासाठी खूप केल्याचं जाणवलं. एखादा व्यक्ती आपल्या कुटुंबासाठी खूप काही करु शकतो, पण इतरांच्या कुटुंबासाठी किती करु शकतो. माझे बाबा माझ्यासाठी हिरो आहेत, पण असे अनेक तरुण मला भेटतात जे म्हणतात, तुमचे बाबा आमचे हिरो आहेत, त्याचा अभिमान मला आजही वाटतो असं धीरज देशमुखांनी सांगितलं.
अवधूत गुप्ते यांनी धीरज देशमुखांचं कुठल्या भावावर जास्त प्रेम आहे असा प्रश्‍न विचारला. त्यावर क्षणाचाही विलंब न करता लगेच ‘रितेश’ असं उत्तर धीरज देशमुख यांनी दिलं. त्यामुळे त्यांचं रितेश वरील प्रेम दिसून आलं. करिअर निवडताना बॉलिवूड आणि राजकारण यांच्यापैकी राजकारणाचं पारडं कसं जड झालं, असा प्रश्‍न विचारण्यात आला. त्यावर, लहान भाऊ म्हणून नेहमी माझ्यासमोर एक प्रश्‍न होता. मोठे भाऊ जे काम करताना त्यांच्या पावलांवर पाऊल टाकत समोर जाण्याचे संस्कार घरातूनच आपल्यावर होत असतात. माझ्या घरच्यांचीही हिच अपेक्षा होती. माझा एक भाऊ राजकारणात आहे एक बॉलिवूडमध्ये आहे. मात्र या दोन्ही फिल्डमध्ये लोक ठरवतात, की तुम्ही टिकणार की नाही. या फिल्डमध्ये यायचं हे आपण ठरवतो, तिकीट पक्ष देतो, पण निवडून द्यायचं की नाही हे लोक ठरवतात. लातूरच्या लोकांनी ठरवलं, मी राजकारणात यायचं आणि मी निवडून आलो असं धीरज देखमुख म्हणाले.
बाळासाहेब थोरात हे लातूरचे पालकमंत्री होते. त्यामुळे त्यांच्याशी आमचा स्नेह होता. बाबा मुख्यमंत्री असल्याने त्यांच्यासोबत विमानात फिरण्याचा छंद पूर्ण व्हायचा. बाळासाहेबांच्या आणि साहेबांच्या जेव्हाही बैठका किंवा दौरा असायचा. लातूरची कुठलीही अडचण असेल तर ते आवर्जून बाळासाहेबांना फोन करायचे, बाबांना माहीत होतं की नगरपेक्षा जास्त न्याय ते लातूरला देऊ शकतील. 1999 साली बाळासाहेब थोरात यांनी बाबांकडून कृषी खातं मागितलं आणि बाबांनी ते लगेच दिलं. कारण त्यांना माहीत होतं, की बाळासाहेब हे या खात्याला न्याय देऊ शकतील.
विलासराव देशमुख यांच्या नजरेतील मराठवाडा हा दुष्काळमुक्त मराठवाडा आहे, आमच्या महाविकास आघाडी सरकारचे काही निर्णय हे दुष्काळमुक्तीसाठी घेण्यात आले आहेत. संपूर्ण मंत्रिमंडळ त्या विचाराने चालत आहे. महाराष्ट्र हा नंबर एक होता आणि राहील हे त्यांचं स्वप्न होतं. मला खात्री आहे की महाविकास आघाडीच्या माध्यमातून यापुढे महाराष्ट्रात विकासाचाच पॅटर्न चालेलं असा विश्‍वास धीरज देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला.
आता नक्की वेळ
देईन – ऋतुराज पाटील
संसारिक व लोकप्रतिनिधी अशा दोन्ही गोष्टींवर काम सध्या सुरू आहे. घरच्यांना वेळ देणं शक्य होत नाही. पण थोडा वेळ काढून नक्की फिरायला जाऊ असं आपल्या कारभारणीला आ. ऋतुराज पाटील यांनी ‘टास्क’मधून बोलताना आश्‍वासीत केले. कोल्हापूरच्या तांबड्या रश्शाला पहिली पसंती देत आवडती हिरोईन दीपीका पदुकोन असल्याचे सांगितले. तरुणाईच्या मनातलं ओळखून त्यांच्यासाठी काय करता येईल, हा महाराष्ट्र तरुणांच्या हातात आहे. आता तर आम्ही सर्व तरुण मंडळी विधानसभेत आहोत, तरुणाईला पुरेपुर न्याय मिळेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.अहमदनगर जिल्ह्याचे नेते ना. बाळासाहेब थोरात यांनी या जिल्ह्याला एक वैभव प्राप्त करून दिले आहे. ग्राम पातळीवर जाऊन विकास कामे करण्याची त्यांची पद्धत असल्याने सलग 8 वेळा ते निवडून येऊन नम्रतेने काम करत आहेत आणि हे आम्हाला तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.
मतांसाठी शिवसेनेला
पसंती – झिशान सिद्दकी
काँग्रेस व्यतिरिक्त शिवसेना की राष्ट्रवादीला पसंती या अवधूत गुप्तेंच्या प्रश्‍नावर उत्तर देतांना आ. झिशान सिद्दकी म्हणाले, शिवसेना, कारण माझा मतदारसंघच शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मुख्यमंत्री, एक कॅबिनेट मंत्री या मतदारसंघात असताना पुन्हा मला संधी मिळण्यासाठी व ठाकरे यांचे मत मिळण्यासाठी शिवसेनेला पसंती देईन, असे ते म्हणाले. आवडता हिरो सलमान खान असल्याचे सांगत राजकारणात वडिलांनी केलेले काम डोळ्यासमोर होते. यूथ काँग्रेसमध्ये काम करतांना ग्राउंड लेव्हलपासून काम केले, त्याचा आज फायदा झाला. ना. बाळासाहेब थोरात यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हटले आहे की, अमृतवाहिनी संस्थेने शिक्षणातून मोठा लौकिक निर्माण केला असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची ही मोठी सोय झाली आहे. मेधा या उत्सवांतर्गत वैचारिक प्रबोधन, संस्कृती, कला, क्रीडा या सर्व जपल्या जात असून यामुळे तरुणांना मोठे व्यासपीठ मिळत आहे. महाराष्ट्रातील राजकारणातील तरुणांचा आपल्या विद्यार्थ्यांची संवाद घडावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले असून अमृतवाहिनी च्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी सांगितली.
यावेळी अ‍ॅड. माधवराव कानवडे, आर. बी. सोनवणे, लक्ष्मणराव कुटे, डॉ. जयश्री थोरात, प्राचार्य डॉ. व्यंकटेश, प्रा. व्ही. बी. धुमाळ, मेधाचे समन्वयक व प्राध्यापक जी. बी. काळे, डॉ. मच्छिंद्र चव्हाण, डॉ. मनोज शिरभाते, एस. टी. देशमुख, सौ. जे. बी सेठी, प्राचार्या शीतल गायकवाड, डॉ, राकेश रंजन, प्रा. विजय वाघे , प्रा. विलास शिंदे, प्रा. अशोक वाळे यांसह विविध शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नामदेव कहांडळ यांनी केले. प्राचार्य डॉ. व्यंकटेश यांनी आभार मानले. यावेळी संगमनेर तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना कार्यकर्त्यांसह तरुणांची मोठी गर्दी होती. अमृतवाहिनीतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com