आमदार शंकरराव गडाख यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान द्या
Featured

आमदार शंकरराव गडाख यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान द्या

Sarvmat Digital

नेवासा (तालुका वार्ताहर) – सत्तेची पर्वा न करता शिवसेनेला पाठिंबा देणार्‍या स्वतंत्र नेवासा विधानसभेचे आमदार शंकरराव गडाख यांना राज्याच्या मंत्रिमंडळात सामावून घेऊन लाल दिवा मिळावा, अशी मागणी शिवसेनेसह क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

स्वतंत्र नेवासा विधानसभेच्या निवडणुकीत क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे नेते आमदार शंकरराव गडाखांनी भाजपचे विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटेंना अपक्ष टक्कर देऊन चितपट केले. तिकीट मिळविण्यासाठी या पक्षातून ‘त्या’ पक्षात जाऊन तिकट पदरात पाडून घेणारे उमेदवार निवडणुकीत उभ्या महाराष्ट्राने बघितलेले असताना आमदार गडाखांनी पक्षाचे तिकीट नाकारून अपक्ष उमेदवारी जाहीर करुन विधानसभा निवडणुकीत राजकीय जुगार यशस्वी केला.

निवडून आल्यानंतर सरकार कोणाचे बनणार? याची चिंता न करता थेट मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपला पाठिंबा जाहीर करत शिवसेनेचे सहयोगी आमदार झाले. शिवसेनेला आमदार गडाख यांनी पाठिंबा दिला. त्यानंतर सत्ता स्थापन होण्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या.

मात्र मातोश्रीवर असलेल्या प्रेमापोटी गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला अन् योगायोगाने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे विराजमान झाल्याने आमदार शंकरराव गडाख यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान देऊन शिवसेनेवर सच्ची निष्ठा असलेल्या आमदार गडाख यांना लाल दिवा देण्याची मागणी क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी केली आहे.

सह्यांची मोहीम राबविणार…
आमदार शंकरराव गडाख यांना मंत्रिपद मिळून तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा आणि सर्वसामान्य जनतेला तसेच शेतकर्‍यांना न्याय मिळावा यासाठी नेवासा मतदारसंघातील सुमारे 10 हजार मतदार व शेतकर्‍यांच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि इंदिरा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना देणार आहोत.
माउली सिन्नरकर, कार्यकर्ते, क्रांतिकारी शेतकरी पक्ष.

Deshdoot
www.deshdoot.com